Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यकुटुंब रंगलंय काव्यात' ( १८ )

कुटुंब रंगलंय काव्यात’ ( १८ )

‘भिडे कन्या शाळा’ ही नागपूरच्या सीताबर्डी परिसरातली नावाजलेली शाळा आहे. या शाळेत झालेला माझा शालेय ‘ओंकार काव्य दर्शन’ कार्यक्रमही खूपच गाजला. तिथे माझी प्रकाश एदलाबादकर सरांबरोबर चांगली मैत्री झाली. त्यांच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यातील कवींसाठी कविता वाचन स्पर्धा भिडे कन्या शाळेच्या हॉलमध्ये घ्यायचे निश्चित ठरले. या स्पर्धेचे उद्घाटक होते प्राचार्य या. मु. पाठक आणि अध्यक्ष प्रा. वसंतराव वर्हाडपांडे होते. सर्व वृत्तपत्रातून या कविता वाचन स्पर्धेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि कवींच्या बरोबरच रसिकांनी सुद्धा या स्पर्धेला चांगलाच प्रतिसादही दिला. या स्पर्धेमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक कवी आणि रसिकांची माझी चांगली ओळख झाली.

बळवंत लामकाणे (नायक), प्रा. ज्ञानेश वाकुडकर, नीलकांत ढोले, श्यामकांत कुलकर्णी, ज्योती लांजेवार, या कवींच्या कविता मी माझ्याकडे संकलित केल्या. या सर्व कवींनी आणि नागपूरच्या रसिकांनी मिळून माझे नांव विश्वनाथ चे विसुभाऊ केले. विश्वनाथ चा विसु आणि माझ्या बाबांचे टोपणनाव भाऊ, म्हणजे विसुभाऊ हे माझे पूर्ण नाव होत असल्याने मी नागपूरकरांनी मला दिलेलं नाव स्वीकारलं आणि आजही विसुभाऊ हेच नाव प्रसिद्धीला देतो आहे.

बर्डीच्या मोदी नं ३ मधील ‘तृप्ती’ हॉटेलचे मालक देवधर नावाचे एक रसिक, त्या स्पर्धा अनुभवायला आले होते. त्यांनी त्यांच्या ‘चित्पावन ब्राह्मण संघात’ माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला. तिथे ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा प्रयोग खूपच रंगला. माझ्या शालेय आणि एकपात्री अशा दोन्ही कार्यक्रमांची नागपूर-विदर्भातील प्रसिद्धी वाढत होती.

आमचे गोपाळ कृष्ण लॉज जिथे होते त्या महात्मा फुले मार्केटच्या भव्य इमारतीतच सुरेश देशपांडे याचे आॅफिस होते. तो MSEB चा कॉन्ट्रॅक्टर होता. विदर्भावर आणि वर्हाडी बोलीवर त्याचे प्रचंड प्रेम होते. तो विदर्भ विकास महामंडळाचे कामही करीत होता. सुरेश व त्याचे संपूर्ण कुटुंब कलाकारच होते. सौ. मीना वहिनी ‘झाडीपट्टी रंगभूमीवरच्या’ प्रस्थापित कलाकार होत्या. त्याने विदर्भातील कलाकारांना संधी देण्यासाठी त्यावेळी “माणुसकी” चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याच्यामुळे विदर्भातील अनेक नाट्य कलावंतांबरोबर माझी मैत्री झाली होती. सुरेशमुळेच नागपूर आकाशवाणीवर माझी एक मुलाखत प्रसारित झाली आणि त्याचा, माझ्या कार्यक्रमांना खूपच फायदा झाला.

नागपुरातील उन्हाळ्यात तापमान खूपच जास्त होते. एका दुपारी त्या रणरणत्या उन्हात, पत्ता शोधत, मी प्रा. माणिक गोडघाटे (कवी ग्रेस) यांच्या घरी गेलो. सरांनी माझे स्वागतही केले. पण त्यांच्या कवितेबद्दल विचारताच ते मला म्हणाले, “विसुभाऊ, मी नागपूर महाविद्यालयात मराठी शिकवतो. माझ्या व एकूणच कवितेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुला माझ्या मराठीच्या वर्गात येऊन बसावे लागेल.” यावर मान हलविण्या शिवाय मी कांहीच बोलू शकलो नाही व मी त्यांचा निरोप घेऊन माझ्या लॉजवर परतलो. खरे तर मला ग्रेस कवींची एक कविता लिहून घ्यायची होती. शिवाय त्यांची एक कविता समजूनही घ्यायची होती. पण निराशा झाली.

नंतर बऱ्याच वर्षांनी माझा एक कार्यक्रम प्रा.तीर्थराज कापगतेनी त्यांच्या कुहीमांढळच्या महाविद्यालयात ठरवला होता. कापगतेसर ग्रेस कवींचे विद्यार्थी होते. कुहीतील कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर कापगते सरांच्या बरोबर मी कवी ग्रेस यांना भेटायला गेलो. (मला मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली होती.) तेंव्हा मात्र कवी ग्रेस यांच्या बरोबरच्या गप्पा खूप रंगल्या, ते कवितेबद्दल भरपूर बोलले. ग्रेस कवींची जी कविता मला समजून घ्यायची होती ती अशी..
ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता,
मेघात अडकली किरणे, ती सूर्य सोडविता होता.।।धृ।।
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो,
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता.।। १।।
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेंव्हा, कंदील एकटा होता.।। २।।

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई
(सादरकर्ते-कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं