Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यआठवणीतील राम शेवाळकर

आठवणीतील राम शेवाळकर

प्राचार्य राम शेवाळकर यांचा आज जन्मदिवस, म्हणून एक स्मृति-शलाका…

तशी त्यांची-माझी गांठ-भेट फार म्हणजे, फार उशिरा झाली याची खंत, ते अस्ताला जाऊन एक तप लोटलं; तरी मनातून जाता जात नाही ! खरं तर त्यांचं वय किंवा विद्वत्तेच्या आसपास फटकणं मला कालत्रयी शक्य नाही याची जाणीव अंतर्यामी खोलवर झिरपलेली; पण माझ्या सिंह राशीत भिनलेल्या
स्वाभिमानाची एक रास्त अपेक्षा अशी की; मी समोरच्या व्यक्तीची उत्तुंगता उमगून, तिचा योग्य तो मान राखताना तिनेपण मला अगदीच कमी लेखू नये !

शेवाळकरांच्या गुणज्ञ नजरेने माझं हे वेगळेपण हेरलं असावं; म्हणूनच आमच्या ‘गिरिशिखर -टेकडी’ विजोड नात्यातून अखेरपर्यंत आत्मियता झुळझुळतं राहिली. ते शांत, शीतल व्यक्तिमत्त्व म्हणजे- वक्ता दशसहस्त्रेषु
प्राचार्य राम शेवाळकर.

मला वाटतं आमचा पहिला आमना-सामना पुसदच्या ४० व्या विदर्भ मराठी साहित्य संमेलन प्रसंगी घडला असावा ! डाॅ. उषा माधव देशमुख अध्यक्षपदी विराजमान होत्या आणि ऐन सकाळी ९-९॥ ला ज्येष्ठ समाज वादी नेते एस्.एम्. जोशी यांच्या निधनाची अशुभ वार्ता सभामंडपात येऊन थडकली. तशात श्रध्दांजली कुणी द्यावी ही कुजबुज ; पण त्या प्रसंगाला धीरोदात्तपणे सामोरं जाणारी तिथे केवळ एकच व्यक्ती होती आणि ती केवळ भाषा-प्रभू राम ! शेवाळकर तिथे जमलेल्या ५-५० मंडळींपुढे आले, त्यांनी एकवार भोवताल दृष्टि टाकली अन् खडीसाखरेलाही लाजवेल अशी मधुर वाणी त्यांच्या जिंव्हेतून स्त्रवू लागली. फार; तर १० ते १५ मिनिटंच बोलले असतील ! मात्र ते भाषण कसं ? तर पंचपक्वांनांनी तृप्त झालेली पंगत उठताच, पाहुण्यांनी विड्यास्तव हात पुढे करावा तसं.

उषाताईंचं अध्यक्षीय भाषण आटोपल्यानंतर जेवणं झाली. मी परिसरात सहज पाय मोकळे करावे म्हणून निघालो आणि समोरच्याच छोट्या टेकाडावर प्राचार्य राम-सौ.विजयाबाई बसलेले. ओळख तर नव्हती; परंतु स्वभावातली धिटाई नकळत ओठांतून घसरलीच !
“काय अप्रतिम बोललात रामभाऊ ! तुमच्यापेक्षा वयाने लहान असूनही, तेव्हा मला तुमची पाठ थोपटाविशी वाटली.” माझे ते शब्द ऐकून शेवाळकर किंवा आसपासच्या चाहत्यांच्या चेह-यावर काय भाव उमटले ते शोधायच्या भानगडीत न पडता मी पुढे सटकलो ; मात्र त्या क्षणाने आमच्यातली ती “प्रीति परि तुजवरती” कणाकणाने घट्ट होत गेली.

त्याला आणखी एक कारण असं की; १९८५ च्या दिवाळीला मी सुरू केलेलं ‘पत्र- सारांश’ हे अभिनव अंतर्देशीय मासिक थोरामोठ्यांना विनामूल्य धाडू लागलो. त्यात प्राचार्य शेवाळकर पण असत; बरेच दिवस उलटले; तरी शेवाळ(कर)-गडावरून पसंतीची तोफ आवाजली नाही, माझा जीव कासावीस. ओढली ‘पत्रं’चा’ आणि जळजळीत खलिता पोचला “पर्णकुटी” त. “एवढे मोठे शिक्षक म्हणवता अन् कुणाचं कौतुक करणं कसं जमत नाही तुम्हाला ?
मी प्रत्यक्ष रामावर सोडलेला तो अग्निबाण अचूक मर्मस्थळी लागला. काही दिवसांतच टपालाने तहाचं पांढरं निशाण फडकावणारं पत्र हाती आलं.
“प्रिय बेडेकर, पत्र पावलं, मजकूर समजला. तुमचे ‘पत्र- सारांश’ छानच असते. कौतुक पर उत्तर धाडणार होतो ते राहिलं. सोबत आजीव वर्गणी ₹ ५००+ दण्ड १००= ₹ ६००/-चा धनादेश ठेवला आहे, पोच द्यावी.
– तुमचा, राम शेवाळकर”

पुढे ते व्याख्यानाच्या निमित्ताने इंदूरला आले तेव्हा त्यांचा मुक्काम रेसिडेन्सी कोठी त होता.अर्थात इन्दौरकरांना आमच्यातलं सूत चांगलं ठाऊक असावं !त्यामुळे शेवाळकर माझ्या घरी येतील या भयाने त्या संस्थेच्या साहित्य बाह्य सेक्रेटरी ने मला थोड्या तो-यातच फोन केला.-
“हे पाहा बेडेकर, शेवाळकर साहेब इथे आले असून, त्यांची प्रकृती काही बरी नाही; तरी त्यांना घरी येण्याची तसदी देऊ नका.”
पण मी त्याला गवत न घालता गुरकलो–
“ही अट घालणारे तुम्ही कोण ? त्यांच्याकडे माझा मोबाईल क्र.आहे व माझ्या कडे त्यांचा. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ !”
आणखी काही वेळात मला शेवाळकरांचा काॅल.
“बेडेकर, शेवाळकर बोलतोय. प्रकृती ठिकाणावर नाही; पण तुम्ही या.”
“मात्र मला तिथे आपल्या खेरीज इतर माकडं नकोत !”
“मी त्या सर्वांना हाकलून लावतो, तुम्ही या.”
एका मित्राला बरोबर घेऊन गेलो. पाहतो ते काय, रामभाऊ, त्यांच्यासोबत वणीचे स्नेही श्री.माधव सरपटवार व खास माझ्यावर नजर ठेवण्यास्तव त्या विवक्षित संस्थेतर्फे एक गुप्तहेर बसलेले. रामभाऊंनी ओलेत्या “या” ने माझं स्वागत करताच त्या गुप्तहेराने पण मला उसना “राम राम” घातला. त्यावर खवळून मी
उद्गारलो.–
“तुम्ही कोण ? मी तुम्हाला ओळखत नाही !” ते अळीमिळी गप्प !
मग प्राचार्यांनी आम्हा सर्वां करिता चहा मागवला नि नुकताच प्रकाशित झालेल्या आपल्या “पाणियावरी मकरी” ग्रंथाची स्नेह-प्रत स्वाक्षरी घालून मला दिली.

दरम्यान आमच्यातील वार्तालापाची गाडी हळू हळू गती घेऊ लागली. म्हटलं.–
“रामभाऊ, उद्याचा काय बेत ?”
“काही नाही. आजचं व्याख्यान संपलं की; उद्या शिकंजी प्यायला सराफ्यात जाणार.”
आणि त्यांच्या त्या वाक्याला माझ्या खडबडीत दणक्याने खाड्कन ब्रेक लागला.–
“काही नाही जायचं सराफ्यात शिकंजी प्यायला. सरळ विमानात बसून नागपूर गाठायचं ! तुम्हाला डायबेटीस आहे व तुमची प्रकृती बरी नसल्याचं सेक्रेटरीच सांगत होते.”
त्यावर मिनतवारीने ते उत्तरले.–
“तसं नाही बेडेकर; पण मी तुमच्या घरी येणार आहे.”

दुस-या दिवशी दिमतीला चोर-चिलटं न घेता शेवाळकर व त्यांचे सहृदय सरपटवार ऐन सकाळी माझ्या घरात पायउतार झाले.

इंदूर-नागपुरातील धनंतर अंतर लक्षात घेता सहसा आमच्या भेटी संभवत नसत; परंतु अधून मधून दूर संवाद झडत. एखाद प्रसंगी रात्री ९ वाजून गेल्यावर रामभाऊंचे मवाळ शब्द कानी पडायचे.–
“बेडेकर एखादी नवी गझल ऐकवा.”
“ऐकवतो !” म्हणत मीही सुर लावायचो.–

“सांग ना कधी ss सरेल,
वागणे तुझे ss अडेल ?
रणरणत्या या उन्हांत,
फेर चांद ss णे धरेल।।

आणि त्यात गंमत ही की; ते पण माझ्या संगत त्याच रागात गझलच्या त्या ओळी हुबेहूब आळवत.

प्राचार्य शेवाळकरांचे औदार्य मी फार नाही; परंतु त्याची चव स्मृतीत घोळत राहावी इतकं अनुभवलंय. दक्षिण अंबाझरी मार्गावरील त्यांच्या मालकीच्या ‘पर्णकुटी’ हॉटेल मधील आलेले सुरुचिपूर्ण पदार्थ मी तसेच सौ. गीताने जेवणात खाल्लेले स्मरतात.

मी संपादित – प्रकाशित केलेल्या या “स्वरांगिनी” या हिन्दी बन्दिश संग्रहाच्या प्रचार-विक्री सन्दर्भात १९९५ सालच्या राम नवमीचे नऊही दिवस मी नागपुरात माझे अभिन्न मित्र श्री.श्यामकांत कुलकर्णीं यांच्याकडे मुक्कामास असताना, रात्री ७- ७॥ च्या सुमारास रामभाऊंना घरी गाठून येण्याचं प्रयोजन विशद केलं. त्यानंतरची त्यांचा उत्साह, लगबग बघण्याजोगी होती.

आधी त्यांनी राष्ट्रभाषा हिन्दी प्रचारिणी समितीच्या मामा गंध्यांना फोन लावला.–
“मला उद्या दीड-दोन तास समितीचा हॉल हवा असून मीच (ते स्वत:) त्या होणा-या कार्यक्रमाचा अध्यक्ष असेन.”
हे सुतोवाच्य करत ते आम्हा दोघांना म्हणाले.-
“कुलकर्णी तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाची प्रेस-नोट तयार करा आणि बेडेकर तुम्ही ती सुंदर हस्ताक्षरात लिहा.”

ती लिहिताच रामभाऊंनी स्वत:च घरातल्या झेरॉक्स
मशीनवर तिच्या ५० प्रती काढून आम्हाला सोपवत सांगितलं.–
“आज रात्रीच या नागपुरातल्या सर्व दैनिकांना पोचत्या करा; मीही फोन करतो.”

स्वत: प्राचार्य राम शेवाळकरच अध्यक्षस्थानी असल्याने ठरल्या वेळी सर्व पत्रकार, मामा ग॔धे, न्यायमूर्ती तारे, संगीत विदुषी उषा पारखी, डॉ. सुलभा पंडित व शंभर एक श्रोते सभागृहात हजर होते. संगीतज्ज्ञांची समयोचित भाषणं होताच समारोपाची सूत्र हाती घेत शेवाळकर म्हणाले.–
“बेडेकरांच्या उत्साहाला सीमा नाहीत. नफ्यापेक्षा पदरी पडल्या तोट्यातच ते समाधान पावतात. त्यांचे ‘पत्र-सारांश ‘ सुरू आहेच ! आता त्यांनीच मोठ्या कष्टाने संपादित, प्रकाशित केलेला डॉ. प्रभा अत्रे यांचा ‘स्वरांगिनी ‘हा मोलाचा ग्रंथ संगीत क्षेत्रातल्या शिक्षक तद्वतच अभ्यागतांना उपलब्ध करून दिला आहे. मी त्याची एक प्रत विकत घेतोय, आपण ही घ्यावी.”

त्या नागपूर-वारीत रामभाऊंनी मला व श्यामकांत यांना घरी जेवायला बोलावलं. विशेष म्हणजे ; तिथे आम्हा खेरीज फक्त ते स्वत:, डॉ.भाऊसाहेब कोलते, डॉ. मे.पु. रेगे आणि मित्र विजय दर्डा इतकीच मंडळी आलेली.
त्यावेळी प्राचार्यांच्या खास आग्रहावरून मी माझी–
“कळीचे फूल होता ss ना,
कळीनेss काय मागावे ?
फुलाच्या रंगल्या गाssली,
दवाचेss चंद्र
लागावे ॥”

गझल गायलो. मराठी साहित्य जगतातील अशा तपोनिधीला पणजीच्या ६७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद लाभणं हे सर्वथा उचितच होतं व ती सुखद घटना १९९४ साली आकारलीही.

तेथील निमंत्रितांच्या कवि- संमेलनात मी तर होतोच; परंतु सोबत सौ. गीता पण होती. या संमेलनात शेवाळकरांची निवड होताच मी ‘पत्र-सारांश’ या दीडपानी ‘उध्वस्त अस्मिता विशेषांक’ काढून त्यात–
“रा ss म रतन धन पायो”
अग्रलेख लिहिला तो असा—
आमचे मराठी साहित्य महामंडळ मातृभाषेचा उत्कर्ष आणि तिच्या संस्कृति- संगोपना साठी इतर काही करत नसले तरी; दर वर्षी कुठेतरी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची शेकोटी पेटवून, ती वर मस्तपैकी हात शेकण्याची हातोटी त्याला उत्तमप्रकारे साधलेली आहे. ही सारी संमेलनें बहुधा थंडीच्या मोसमातच साजरी होतात याचे कारण आता आमच्या लक्षात येऊ लागलेय. एकमेकाची उणीदुणी उकरून काढणारी किंवा फटकळपणे कुणालाही झाडून टाकणारी मराठी माणसें इतर प्रसंगी एकत्र येण्याची शक्यता नसतेच; पण निसर्गनेमानुसार हिवाळ्यात त्यांच्यात बराच जिव्हाळा निर्माण होण्याची शक्यता असते या शास्त्रीय सत्याच्या आधारे यंदाचे ६७ वें अ. भा.मराठी साहित्य संमेलन पणजी(गोवा) येथे आमचे परममित्र आणि श्रुतिमनोहर वक्ते प्रा. राम शेवाळकर यांच्या अध्यक्षत्वाखाली ‘पार’ पडणार (आता नामांतराचे मांजर आडवे येण्याची शक्यता नसल्याने आम्ही वरील वाक्यातील ‘खाली’ व ‘पडणार’ या दोन धोकादायक शब्दांत ‘पार’ हा शुभसूचक शब्द उभा केलाय याचा अतिशय आनंद होतो. कारण त्यांचं भाषण ऐकताना आमच्यासारख्या निस्सीम कोक्णस्थाला जादूच्या हिरव्यागार गालिच्यावरून, हवेत तरंगत गेल्यासारखे वाटते. याचा आणखी एक फायदा असा की; तसे वाटताना आमच्या सारख्या निस्सीम कोक्ण- स्थाला ‘एअर इंडिया’ला वेगळे भाडे मोजावे लागत नाही ! तर अशा शेवाळकरांच्या वक्तृत्वा तील गोडी आणि थंडीचे गुलाबीपण एकवटून, गोडी गुलाबीने या संमेलनाचे सूप वाजावे ही शुभ कामना व ताज्यातवाण्या अध्यक्षांचे अभिनंदन.(कारण ते करून, त्यांना एकदा ‘अध्यक्षपदी’ जुंपले की; पुढील वर्षभर त्यांच्या नांवे खडें फोडायला आणि बोटं मोडायला आपण मोकळे !)” असो… आता मी या ‘राम कथेतल्या केवटाकडे न जाता शेवटाप्रत येतो.

२००४ सालच्या डिसेंबरमध्यें मला ६१ वं वर्ष लागलं. तेव्हा शेवाळकर दांपत्य भैयुमहाराजांकडील व्याख्याना निमित्त इंदुरातच असल्याने; भेटीस जाताना मी माझ्या संदर्भात खास संपादकीय टिपण छापलेला दै. म.टा.चा अंक सोबत नेला. ते वाचून रामभाऊ म्हणाले.– “नागपुरास या, तुमची एकसष्टी थाटामाटाने साजरी करतो.”

अर्थातच ते मला शक्य नव्हतं. मग प्राचार्य शेवाळकरांनी “रविवार लोकमत” च्या सर्व एडिशन्समध्ये माझ्या कार्य- कर्तृत्त्वावर विस्तृत लेख तर लिहिलाच; पण त्याच वर्षी मी सुरू केलेल्या ‘शब्द दर्वळ’ दि. वार्षिकात डॉ. जिचकर यांच्यावर योगी पावन मनाचा’ तसेच २००८ साली डॉ.भाऊसाहेब कोलते या उभयतांना श्रध्दांजली वाहणारे लेख लिहिले. (मानधन कधीच मागितलं नाही; उलट मलाच पैसे दिले.)

वर्ष २००७ मध्यें माझा ‘अंतर्याम’ हा पहिला कविता संग्रह काढला. आशीर्वाद “कुसुमाग्रज” यांचे, पहिली प्रस्तावना प्रा. इंदिरा संत यांची; तर पूरक दुसरी प्रस्तावना स्वत: शेवाळकरांची. तो संग्रह मुंबईत पद्मभूषण मंगेश पाडगांवकर यांच्याहस्ते प्रकाशित झाला व स्वत: राम शेवाळकरांनीच तो महाराष्ट्र राज्य शासनाच्या (प्रथम प्रकाशन विभाग) पुरस्कारासाठी धाडला; पण त्याला निक्षून पुर-स्कार दिला गेला नाही. ( इतकेच नव्हे; तर महाराष्ट्रातल्या इतर २१ खाजगी स्पर्धातूनही त्याला गांवकुसाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला!)

हे मी त्यांच्याशी शनिवार, २ मे २००९ ला दुपारी बोललो आणि रविवारी सकाळी त्यांचा शेजारी, माझा मित्र विनोद लोकरे माझ्या घरीच बसला असता, त्याचा मोबाईल वाजला. तो ऐकून विनोद म्हणाला–
“नागपूरहून फोन होता, इतक्यात रामभाऊ गेले.”
बरोबर एक आठवड्याने, दादर भागातील कोहिनूर हॉलला श्रध्दांजली सभा झाली. त्या सभेत प्रा.मनोहरपंत जोशी, नितीन गडकरी, हृदयनाथ मंगेशकर, अरुण साधू व इतरांची दुखवटा-मनोगतं व माऊलींचं लता दीदींच्या स्वरातलं पसायदान होतं.    कै. प्राचार्य राम शेवाळकरांचे सहकारी श्री.अनिल त्रिवेदी या श्रध्दांजली-सभेचे सूत्रधार आणि कृतज्ञतेचा भाग हा की; मी पण त्याठिकाणी उपस्थित होतो. त्या वर्षीच्या ‘शब्द दर्वळ’ मध्यें श्री. विवेक घळसासींनी माझ्या विनंतीवरून “चंद्रमा जो अलांच्छन” हा लेख लिहून त्यांचं पुण्य स्मरण केलं. इति प्रणाम कथा.

श्रीकृष्ण बेडेकर

– लेखन : श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं