पुणे महानगरीतील कोथरुडच्या सक्सेस स्क्वेअर इमारतीतील “साथी स्पोर्ट्स” ला एक वर्ष पूर्ण होत आहे…..
‘साथी’ चा जन्म व त्यांची संघर्षमय वाटचाल ही चिकाटीने आणि जिद्दीने कष्ट घेणाऱ्या ध्येयनिष्ठ खेळाडूसारखीच आहे.
उमेदीची तब्बल २५ वर्षे आघाडीच्या क्रीडा साहित्य विक्री संस्थेत काम केल्यानंतर एक दिवस मालकाकडून, “या पुढे पगारवाढ शक्य नाही,” असे सांगितले जाते. पगारवाढ खुंटण्याच्या या निर्णयाने सारेच साथीदार काळजीत पडतात. जिथे इतकी वर्षे प्रामाणिकपणे काम केले, तिथे आपलीच पगारवाढ रोखण्याचा निर्णय झाल्याने सारेच दुःखी होतात. काय करावे हे सुचत नाही, पण अल्पावधीत स्वतःला सावरून आपल्या कौशल्य आणि अनुभवाच्या शिदोरीवर स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय ते घेतात. आणि सहकाऱ्यांच्या या निर्णयातून उभे राहते ‘साथी स्पोर्ट्स.’
श्री. लक्ष्मण साळुंके, श्री. नागेश शिरसले, श्री. विजय फुलसुंदर आणि श्री. भरत शिरसले हे ते साथीचे चार भागीदार.
‘साथी’च्या या खडतर वाटचालीची माहिती साथीचे भागीदार लक्ष्मण साळुंके यांनी दिली. ते म्हणाले की, येथे कोणीच मालक नाही, आणि कोणी नोकरही नाही. गेली २०- २५ वर्षे नित्यनेमाने क्रीडा साहित्याची विक्री करणे व व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे हाच आमचा दिनक्रम. त्यामुळे क्रीडा साहित्याविषयीचे आमचे ज्ञान व जाण एखाद्या अनुभवी खेळाडूलाही लाजवणारे आहे. इतक्या वर्षाच्या वाटचालीने क्रीडा साहित्यालाच आमचे करियर करून टाकले.
साध्या सरावासाठी कोणती बॅट वापरावी, सामना खेळण्यासाठी कोणती बॅट उपयुक्त ठरते, कोणत्या खेळासाठी कोणते शूज वापरावेत, टेबल टेनिस, बँडमिंटनसाठी रॅकेटची निवड कशी करावी, त्याचे गटिंग कसे करावे इत्यादी बाबतचा बारीक सारीक तपशील आम्हा सर्वांना मुखोद्गत आहे. आमच्यापैकी काही जण क्रीडा साहित्यातील जाणकार, तर काही जण गटिंग व क्रीडा साहित्यातील तांत्रिक दोष दूर करण्यात निष्णात. त्यामुळे साथीची स्थापना करताना आपापले हे कसब हेच आमचे मुख्य भांडवल होते.
साथी सुरु करण्याचा निर्णय तर झाला, पण त्यासाठी पैसे कोठून आणायचे हा मोठा प्रश्न होता. सर्वांची परिस्थिती तशी बेताचीच. परंतु, तरीही प्रत्येकाने आपापली पत वापरून भांडवल उभे करण्याचा निश्चय केला. आणि मग सुरू झाला जागेसाठीचा शोध.
जिममधील उपकरणे दुरुस्त करण्याच्या निमित्ताने विजय फुलसुंदर यांना शहराच्या विविध भागांची चांगली जाण होती. शाळा, क्रीडांगणे व क्रीडा रसिकांचे नंदनवन असलेले कोथरूड हेच आपल्या संस्थेसाठी अधिक योग्य असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यामुळे साथीची सुरुवात कोथरुडमध्येच करण्याचा निर्णय झाला. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वांनी आपापल्या नोकरीचे राजीनामे दिले. आणि महिनाभरात म्हणजे ११ मार्चला कोथरुडच्या सक्सेस स्क्वेअर या इमारतीच्या तळमजल्यावर साथी स्पोर्ट्स या क्रीडा साहित्याच्या सुसज्ज दालनाची मुहूर्तमेढ रोवली.
“विना सहकार नही उद्धार” हे या साथीदारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. उभ्या राहिलेल्या भांडवलातून जागेचे डिपॉझिट व इंटिरियरचा खर्च केला आणि भरपूर माल भरून कामाला सुरुवात झाली. परंतु, लगेचच लॉक डाऊनचे संकट आले. परिणामी पंधराच दिवसानंतर दुकान बंद ठेवणे भाग पडले. दोन महिन्यांच्या या लॉकडाऊनमध्ये सर्वच जण खचून गेले. अशा वेळी दुकान मालक मदतीला आले. त्यांनी भाड्यात सवलत दिली. तर या काळात काही ऑर्डर्स ऑन लाईन पद्धतीने मिळाल्या. त्यामुळे तग धरून राहता आले.
सर्व व्यवहार सुरळित झाल्यावर आता व्यवसायाचा जम बसू लागला. कोथरुडमध्ये सर्व प्रकारच्या खेळांसाठी लागणाऱ्या साहित्याचे एकही दुकान नसल्याने कोथरुडकर खेळाडू व क्रीडा प्रेमींकडून वाढता प्रतिसाद लाभत आहे. या खेळाडूंना क्रीडा साहित्याचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यावरच सध्या आम्ही लक्ष केंद्रीत केले असून भविष्यात उच्च दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी खेळाडू साथीमध्येच येतील, असा विश्वास साथीचे भागीदार नागेश शिरसाले यांनी व्यक्त केला.
“साथी”च्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा💐

– लेखन : सुनील कडूसकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूप जबरदस्त
यांच्या कष्टाकडे पाहून उर भरून येते
साथी स्पोर्ट्स ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा