भेटूया गं, भेटू की, बायका कितीवेळा घोकतात ..
भेट होईपर्यंत मात्र
किती दिवस सरतात..
अशाच असतात बायका
भेटायचं ठरलं की
मग आनंदाने मोहरतात.. मनातल्या मनात
कशा उत्साहाने सळसळतात
अशाच असतात बायका
भेटताना कोंडलेली वाफ घेऊन येतात
एकमेकींशी बोलून वाफेचे दव
घेऊन जातात
अशाच असतात बायका
आषाढ मेघा सारख्या दाटलेल्या असतात भेटल्यावर धो धो बोलतात
गप्पांना पूर येतो
अशाच असतात बायका
धबधब्यासारखे हसतात
नदी सारख्या वहातात गप्पांचा उगम
कुठून झाला ? हेच विसरतात
अशाच असतात बायका
माळेतुन मोती उधळावेत तशा मुक्त मुक्त होतात
निरोपाची वेळ आली की स्वतःला
संसारात ओवतात
अशाच असतात बायका
माहेरचा विषय निघताच श्रावणसरींसारख्या रंगतात
कुठल्या कुठल्या आठवणींचे निर्माल्य जपतात
अशाच असतात बायका
मज्जा आली, पुन्हा भेटू एकमेकींना वचन देतात संसाराच्या चक्रात
पुन्हा एकदा फसतात
अशाच असतात बायका
भेटीच्या आठवणी
हळुवार कुरवळतात
पुन्हा पुन्हा साऱ्यांचे फोटो चाळतात
म्हणून म्हणते….
भेटत राहू या बायकांनो
गप्पांचे फड मांडा, हास्याचे फवारे उडवा
नवे नवे बेत आखा
वेदनांना झिरपू द्या जखमांवर फुंकर घाला
मनातले पीळ सैल करा
नव्याने नाती उमलू द्या
आनंद ऊतू जाऊ द्या
पण भेटा परत परत भेटा
मैत्रिणींना आणि स्वतःसही

– रचना : मेधा जोगदेव. पुणे