शेवटचा भाग
नमस्कार रसिक हो..
आपण भरभरून दिलेल्या प्रतिसादासाठी आणि प्रेमासाठी शतशः ऋणी आहे. आपण असाच स्नेह पुढेही ठेवावा ही विनंती. आज कथेचा शेवट करत आहोत…
धन्यवाद..
रोमी बेडरूममध्ये बसून अल्बम बघत होती..! पाच वर्षात बरच काही घडून गेलं होतं..।
पराग ने एक दिवस फोन करून रुचीला डायरेक्ट विचारलं, “माझ्याशी लग्न करशील ?”
खर तर रुचीच्या मनात ही तेच होत..। तरी ती गडबडली..। काही न सुचून तिने फोन कट केला..। तरी मेसेज केला ह..”हो” म्हणून..।
हे ऐकून रोमी अविनाश ला म्हणाली, “आजकाल ची मुलं मनातलं किती पटकन बोलतात..मला तुझी आठवण झाली..
“चिडव ह चिडव..। माझा राग आणि हे तुला चिडवण्यासाठी मिळालेलं खाद्यच आहे..।”
सहा महिन्यात दोघांच लग्न झालं..
नंतर हसत म्हणाला,
“हो ग.. खरच, आपल्या सारखी भिडस्त नाही ही पिढी..”
पराग आईवडीलांचा व्यवसाय बघत होताच. रेडिमेड कपड्यांची चार दुकान होती त्यांची नागपूरला.
त्यातलं एक विकून, थोडे पैसे टाकून इथे मुलुंड मध्ये सुरू केलं.
एक दुकान नागपूरला ठेवलं.. समजा इथलं चालायला उशीर झाला, तरी इन्कम सुरू असावा. दोन्ही मुलांच्या नावे सगळी प्रॉपर्टी अर्धी अर्धी केली होती.
“आपलं घर” चा व्याप खूप वाढला होता.
रुचीला नागपूर मध्ये जाणं शक्य न्हवत. म्हणून पराग ने इथे यायचं ठरवल..।
“आपलं घर” ची एक ब्रँच लंडन मध्ये उघडली होती. अर्थात मिताली तिथेच सेटल झाली होती. वैभव ही त्याचा व्याप सांभाळून मदत करत असे.मिताली, समीर ह्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. ते ही संस्था सांभाळत होते. तिथे तर लोकांना फार कौतुक आणि आश्चर्य वाटत होतं.
कितीतरी मुली वेगवेगळ्या प्रकारे फसवून परदेशात आणल्या होत्या ! वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या मुली. तरी समस्या एकच, स्त्री चं शोषण..ह्या ना त्या प्रकारे !
दोन वर्षांनी रुची, पराग ला गोड मुलगी झाली.
“आहना” नाव ठेवलं तिच. नागपूरच्या आजी आजोबांच्या फेऱ्या आता खूप वाढल्या.
वरुण, वैभव, विहान सगळे एका पाठोपाठ एक लग्नाच्या बेडीत अडकले.
अविनाश, रोमी, नागपुराचे आजी आजोबा ह्यांचा वेळ
“आहना” च्या बाललीला बघण्यात, तिला सांभाळण्यात जात होता. दिवस पाखरासारखे भरभर उडत होते.
सर्वात आनंद झाला जेव्हा रंजना देशपांडे च लग्न अथर्व मुळे नावाच्या मुलाशी ठरलं. ते ही सगळं खरं सांगून !
हा बदल घडायला एवढा काळ जावा लागला.
“आपलं घर” मधल्या मुलींची लग्न होणं म्हणजे समाजाच्या प्रगतीची मोठी खूण होती. तरी प्रत्येक मुलीनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असावं, हे मात्र संस्थेतर्फे समजावून देत असत.
सुखाच ताट आनंदाने, तृप्ततेने ओसंडून वाहत असताना, ते घडलं !
एक दिवस अविनाश छातीत दुखतंय अस म्हणाला..। ताबडतोब दवाखान्यात नेलं..।
उपचार सुरू केले ही. तेवढ्यात त्याला दुसरा अटॅक आला आणि क्षणार्धात खेळ खलास. जाताना रोमीचा हात हातात होता आणि डोळ्यात अपार प्रेम..!
ती नजर तिला सारखी आठवत होती.
सगळं इतक्या लवकर घडलं की विचार करायला वेळच मिळाला नाही.
रोमी तर हातात हात ठेवलेल्या अवस्थेत, तिथेच बेशुद्ध झाली. विहान होता म्हणून त्याने तिला सावरलं. शुद्धीवर आली, पण शुद्ध गेल्या सारखी ! सगळ्या संवेदना गोठून गेल्या होत्या. मिताली आली ही शॉकिंग न्युज ऐकून. तिला बघून भानावर आली आणि तिच्या गळ्यात पडून खूप रडली. तिला म्हणाली,
“अवि, अवि शिवाय मी कशी जगू ग ? ही कल्पनाच असह्य आहे. मला एकटीला टाकून तो जाऊच कसा शकतो ?”
त्याच्या जाण्याने ती खचली. त्याचे दिवस होईपर्यंत शांत राहिली.
नेहमीसारखीच आज सगळे अल्बम ती बघत बसली होती. तिचा तो आवडीचा छंद होता. कित्येकदा ती अल्बम बघताना, जुन्या आठवणी परत नव्याने जगायची. त्यावरून अविनाश तिला चिडवायचा ही. तरीही तिच्यासाठी खास छोटस कपाट केलं होतं त्याने. तिची आवड जपण्यासाठी. त्यात सगळे अल्बम जपून ठेवले होते. खराब होऊ नये म्हणून फोटोग्राफर मित्राकडून एक पावडर ही आणली होती.
अल्बम चाळता चाळता, तिला तिची आणि अविनाश ची पहिली भेट आठवली.
प्रपोज करताना उडालेली धांदल आठवली. दोघांचा प्रणय, प्रेम, अनबन सार सार आठवलं.
त्यांच्या लग्नात,
“केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर” हे गीत अविनाश च्या मावस बहिणीने गायलं होत. त्या गीताचे बोल मनी ठसले होते. ते भावफुल मनात फुलले होते अविनाशला बघून. धुक्यातून त्याचाच चेहरा दिसला होता जो तिच्या मनातल भावगीत गात होता..! “स्वप्नरंग स्वप्नीच्या” सुरासुरात सजले होते. ते सजवणारा अविनाश होता.d6dtoतिचा अवि..। तिच्यावर भरभरून प्रेम करणारा तो अल्बम आणि अविनाशच्या आठवणी उशाशी घेऊन ती निजली परत न उठण्यासाठी! परत अविच्या मिठीत विरघळून जाण्यासाठी, त्याच्याकडे गेली. कायमची. सर्वांना “अलविदा” करत !
समाप्त

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️98694848006