रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या युद्ध सुरू आहे. भारतातील २० हजार विद्यार्थ्यांपैकी खूपसे परत आले आहे. अनेक जण अजूनही तिथे अडकून पडले आहेत.
हे नेमके कशामुळे होत आहे ? जागतिक राजकारण नेमके काय आहे ? कसे आहे ? हे समजून घेणे केवळ राज्यशास्त्रापुरतेच मर्यादित नसून सर्व सामान्य माणसाने समजून घेण्यासाठी “जागतिक राजकारण” हे पुस्तक महत्वाचे आहे.
त्या दृष्टीने या पुस्तकाची प्रस्तावना महत्वाचा प्रकाश टाकत आहे. म्हणून वाचू या, डॉ. अंजली रानडे यांनी लिहिलेल्या ‘जागतिक राजकारण’ या पुस्तकाची डॉ. मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना..…
एका शतकापूर्वी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून युरोपमध्ये प्रथम मान्यता मिळाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात इतरत्र या विद्याशाखेचा प्रसार झाला. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात या विद्याशाखेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतातील उच्च शिक्षण देणाऱ्या बहुतेक संस्थांमध्ये हा विषय राज्यशास्त्राच्या चौकटीत अभ्यासला जातो. अनेक विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणावर स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. अर्थातच या विषयातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेत दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत; परंतु मराठीमध्ये मात्र सातत्याने मोठ्या प्रमाणात मागणी असूनही अशा पुस्तकांची वानवा आहे. ही कमतरता डॉ. अंजली रानडे यांच्या ‘जागतिक राजकारण’ या पुस्तकाने भरून काढली आहे.
कोणतेही चांगले पाठ्यपुस्तक वाचकस्नेही असावे लागते. ‘जागतिक राजकारण’ या पुस्तकात हा गुण प्रामुख्याने आढळतो. डॉ. रानडे यांनी व्यामिश्र संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केलेल्या आहेत, मात्र असे करताना अतिसुलभीकरणाचा दोष टाळलेला आहे. पत्रकारितेचा आणि महाविद्यालयीन अध्यापनाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे कठीण संकल्पना सहजगत्या विशद करण्याची हातोटी त्यांच्यापाशी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणासारख्या आंतरविद्याशाखीय, सतत विकसित होणाऱ्या आणि मोठी व्याप्ती असलेल्या विषयावर मराठीत लिहिणे सोपे नाही. त्यासाठी आवश्यक ती अचूक आणि सहज समजून वापरता येईल अशी परिभाषा निर्माण करावी लागते. डॉ. रानडे यांनी हे आव्हान पेलण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारण हे गतिमान क्षेत्र असून परिवर्तन हाच त्याचा स्थायीभाव आहे. गेल्या तीन दशकांमध्ये घडलेल्या शीतयुद्ध समाप्ती, मूलतत्त्ववादाचा प्रसार आणि दहशतवाद, मानवी हक्कांचे महत्त्व वाढणे, लिंगभाव, पर्यावरण, जागतिक एकीकरण आणि त्यासाठी कारणीभूत ठरलेले आर्थिक आणि तांत्रिक घटक एका बाजूला; तर परकीयांच्या देशातील स्थलांतरावर घातले गेलेले निर्बंध दुसऱ्या बाजूला, अशा विविध घटनांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास ही गोष्ट सहज लक्षात येते. या सर्व बदलांचा उत्तम आढावा डॉ. रानडे यांनी घेतलेला आहे.
पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात जागतिक राजकारणात होऊ शकणाऱ्या भविष्यातील बदलांसंबंधीची संभाव्य रूपरेषा मांडली आहे.
गेल्या काही दशकांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात आणि विविध माध्यमांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणावर भरपूर ऊहापोह घडून येत आहे. या चर्चांमध्ये जागतिक सुशासन, राष्ट्रातीत सामाजिक चळवळी, मानवी सुरक्षा आणि मानवतावादी हस्तक्षेप यांचा समावेश होतो. या समकालीन मुद्द्यांवर सदर पुस्तकात तपशीलवार आणि संतुलित विवेचन आढळते. ही कामगिरी उल्लेखनीय असून त्यामुळे पुस्तकाच्या वाचनीयतेत भर पडते.
कोणत्याही पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता त्यामधील सैद्धांतिक ज्ञानाच्या आकलन सुलभतेवर अवलंबून असते. तत्वज्ञान, राजकीय अर्थशास्त्र, स्त्री अभ्यास यांसारख्या विविध ज्ञानशाखांमधून आलेल्या सैद्धान्तिक चौकटींचा समावेश आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये होतो. उदाहरणार्थ, आदर्शवाद, वास्तववाद, व्यवस्था सिद्धांत, नववास्तववाद, नवउदारमतवादी संस्थावाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद आणि उत्तरवसाहतवाद. डॉ. रानडे यांच्या पुस्तकात या सर्व सैद्धान्तिक चौकटींचा परामर्श घेतलेला आहे.
हे पुस्तक ज्ञान आणि माहितीचे समृद्ध भांडार आहे. पुस्तकातील बॉक्सच्या कुशल वापरामुळे ते एकसुरी आणि रटाळ न होता वाचकांची जिज्ञासा टिकवून धरते. त्याचबरोबर त्यामध्ये सुयोग्य उदाहरणे, अर्थपूर्ण व्याख्या, घटनाक्रमांचा संक्षिप्त निर्देश यांचा समर्पक वापर केला आहे. पुस्तकातील संदर्भसूचीमुळे त्याची विश्वासार्हता वाढते. त्याचबरोबर ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास करायचा आहे, त्यांना यातून मार्गदर्शनही मिळेल.
‘जागतिक राजकारण’ हे पुस्तक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना खूपच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही. सेट, नेट आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी हे पुस्तक उपयोगी होईल. त्याच बरोबर विविध प्रसार माध्यमांत काम करणाऱ्या व्यक्ती तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांना या पुस्तकातून चिकित्सक परिप्रेक्ष्य प्राप्त होईल. ‘स्थानिक’ आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांना या पुस्तकातून चिकित्सक परिप्रेक्ष्य प्राप्त होईल.
‘स्थानिक’ आणि ‘वैश्विक’ यांना विभागणारी रेषा धूसर होत असल्याच्या या काळात मराठी वाचकाला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. हा ग्रंथ डायमंड पब्लिकेशन्स (पुणे), यांनी वाजवी किंमतीत आणि नेटकेपणाने उपलब्ध करून दिल्याबद्दल ते प्रशंसेस पात्र आहेत.
– लेखन : डॉ. मंगेश कुलकर्णी.
प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800.