Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्य'एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख...'

‘एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख…’

काही गाणी अशी असतात की ती ऐकताना आपल्या नकळत आपण त्या गाण्यात अक्षरशः एकरूप होऊन जातो. ते गाणे आनंदी असेल तर नकळत चेहऱ्यावर हसू फुलते, रोमँटिक असेल तर अंगावर रोमांच उमटवून जाते तर हृदयस्पर्शी असेल तर नकळतच डोळ्यातून पाणी वाहते.

‘सुखाचे सोबती’ या चित्रपटातील ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेले, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेले, आशा भोसले यांच्या मधुर स्वरातील ‘एका तळ्यात होती..’, हे हृदयस्पर्शी गाणे त्यातील एक.

‘एका तळ्यात होती..बदके पिले सुरेख..’, या गाण्याची पहिली ओळ वाचली किंवा ऐकली की डोळ्यासमोर उभे राहते ते सुंदर स्वच्छ तळे आणि त्यात शांतपणे पोहणारी बदकी पिले. नंतरच्या पूर्ण कवितेतून दिसून येते ते एक बिचारे कुरूप पिल्लू आणि त्याला मानसिक त्रास देणारी बदकी पिले..शेवटी पिल्लाला तो राजहंस असल्याचा झालेला साक्षात्कार अन त्यामुळे त्याचा जागृत झालेला आत्मविश्वास !

माझ्या मते, कवीला मात्र काही वेगळेच सांगायचे असावे. कदाचित आपण राहतो तो परिसर, आपल्या आजूबाजूचे आपल्याला श्रेष्ठ वाटणारे लोक आणि त्यात एखादी व्यक्ती, जी स्वतःला कुरूप समजते. असंच तर घडते प्रत्यक्ष जीवनात. आपल्या मनाचा कमकुवतपणा आपल्यातील आत्मविश्वास कमी करून आपल्याला कुरूप ठरवतो..स्वतःच !

पहिल्या कडव्यात कवीने पिल्लाची केविलवाणी परिस्थिती वर्णन केली आहे. ‘कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे..सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे..’. त्या पिलाला कुणीच आपल्यात सामावून घेत नसे. त्यामुळे ते बिचारे पिलू इतरांपासून वेगळे एकटेच तरंगत असे. एखाद्या व्यक्तीला लोकांनी जवळ केले नाही, त्याला आपलेसे मानले नाही की ती व्यक्ती आपल्यातील कमतरता शोधू लागते. अशा व्यक्तीचा आत्मविश्वास हळूहळू नष्ट व्हायला लागतो.. मग ती व्यक्ती खरोखर कुरूप असो वा नसो..स्वतःला ती कुरूप मानून हळूहळू स्वतःच समाजापासून विरक्त होत जाते. ‘दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक..आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक’ .. जसे जखमी किड्याला मुंग्यांनी घेरावे तसेच स्वतःला कुरूप समजणाऱ्या व्यक्तीला लोकं हिणवतात, टोचून बोलतात. ‘तो..? ..त्याला काय समजतय ? येडा आहे तो…” किंवा “कसली कुरूप आहे ती…”, अशा सारखे वाक्य कानावर पडले की त्या व्यक्तीचा उरलासुरला आत्मविश्वासही पळून जातो. आपल्यातही काही गुण असू शकतात, याचा सारासार विचारही करायची शक्ती तिच्यात उरत नाही.

पुढील कडव्यात कवीने पिल्लाची हृदय पिळवटून टाकणारी व्यथा व्यक्त केली आहे. ‘पिल्लास दुखः भारी, भोळे रडे स्वतःशी.. भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ?” एकटेच पडलेल्या पिल्लाचे दुखः शब्दातीत आहे. त्याचे दुखः वाटायला, मन मोकळे करायला त्याला कोणीच नाही..अगदी भावंडही नाहीत. सर्वांनी त्याला जणू वाळीत टाकले आहे. ‘जे ते त्यास टोची, दावी उगाच धाक..आहे कुरूप वेडे, पिल्लू तयात एक” एकट्या पडलेल्या पिल्लाला सगळेच टोचू लागलेत, उगाच धाक दाखवत आहेत. सामान्य लोकांची नैसर्गिक मानसिक वृत्ती यापेक्षा काय वेगळी असते! आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्तीलाही त्याच्यापेक्षा कमजोर असलेले मित्र किंवा आप्तही त्याच्यावर भारी ठरू लागतात. जो तो त्याला आपल्या अधिपत्याखाली ठेवू बघतो. त्याच्यासमोर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो.. स्वतःचा अहंकार जपण्यासाठी!

‘एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळले..भय वेड पार त्याचे, वाऱ्यासव पळाले..’ मात्र एक दिवस अचानक त्या पिल्लाला कसली तरी जाणीव झाली आणि त्याच्यात असलेली भीती वाऱ्यासारखी पळाली..त्याला सोडून गेली.. का? तर ‘पाण्यात पाहताना, चोरूनिया क्षणैक ..त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक’ अतिशय विमनस्क मनस्थितीत असताना, सर्वांची नजर चुकवून त्याने एकच क्षण पाण्यात पहिले आणि त्याला जाणीव झाली..की तो बदक नसून राजहंस आहे आणि त्याचा आत्मविश्वास जागा झाला.. एखाद्या आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्तीने आत्मपरीक्षण केले तर त्या व्यक्तीलाही स्वतःत लपलेले गुण दिसतील.. आपणही काहीतरी करू शकतो, याची जाणीव होईल..कदाचित आपण सामान्य नसून असामान्य असल्याचे लक्षात येईल..आणि तो भरारी घेईल..उंच..उंच..कदाचित त्याच्या अवती भवती असलेल्या त्याला टोचून हैराण करणाऱ्या लोकांपेक्षा कितीतरी दूर!…जरुरी आहे आत्मचिंतन करण्याची.. स्वतःचे गुण तपासून पाहण्याची.. बोलणार्यांकडे दुर्लक्ष करून काहीतरी करण्याची जिद्द कायम ठेवण्याची… आपल्या कोषातून बाहेर निघून स्वतःला सिध्द करण्याची… आपण आजूबाजूंच्या बदकांसारखे नाही, याचा विचार करून कुढत राहण्यापेक्षा आपल्यातील सुप्त गुणांना परखून, स्वतःला कुरूप न समजून, मनाने, कृतीने सुंदर राजहंस होण्याची! त्याचबरोबर, आपणही कुणाला कमी लेखू नये.. काय जाणो, आपल्यातील कुणी एखादा ‘राजहंस’ असायचा !

– लेखन : आसावरी इंगळे, जामनगर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. एका तळ्यात होती ..या गदीमांच्या गीताचे सुरेख रसग्रहण.
    आपणच आपल्याला ओळखावे हा सुरेख संदेश या गीतातून
    दिला आहे.
    एक आवर्जून सांगावेसे वाटते की या पोर्टलवरुन प्रसिद्ध होणार्‍यासर्वच लेखांसाठी केलेली सजावट अप्रतिम असते!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी