जागतिक महिला दिनानिमित्त आत्म परीक्षण व्हावे म्हणून आपण “महिला हुंड्यातुन मुक्त झाली आहे का ?” या वर मतं, अनुभव, निरीक्षण मागविली होती. या विषयी सिंगापूर सारख्या प्रगत व बहू सांस्कृतिक देशात काय स्थिती आहे, ते सांगताहेत लेखिका मोहना कारखानीस…..
विवाह ह्या सुंदर संस्थेला लागलेला ‘हुंडा’ हा एक भयंकर शाप आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वरवर सुधारक आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजातही हा हुंडा घेतो कोण आणि देतो कोण ? हा संशोधनाचा प्रश्न आहे. २०२२ वर्ष सुरु झाले तरी भारत देशात अजूनही हुंडा घेतला जातो, दिला जातो. यामागे कारण काही असले तरी या शापाखाली स्त्रीला मात्र असंख्य यातना भोगाव्या लागत आहेत. तिचा बळी जात आहे.
सामान्यतः गरिबी, अशिक्षितपणा आणि स्त्री पुरुष असमानता हुंडा सारख्या प्रश्नाला जन्म देते असे पाहण्यात आले आहे. याशिवाय सत्ता, मालमत्ता आणि पैशाची हाव हुंडा या भयंकर पद्धतीला जन्म देते.
सिंगापूर सारख्या प्रगत देशात, सर्वच क्षेत्रात अनेक सुधारणा होत असताना ‘हुंडा’ -ज्याला इंग्रजीत डावरी हा शब्द आहे —-अस्तित्वात आहे का ? त्याचे स्वरूप काय आहे याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
सिंगापूर आणि कायदा
सिंगापूर हा जगातील एक श्रीमंत आणि महागडा देश आहे. इतर अनेक गोष्टीप्रमाणे इथले लग्नही महागडे असते. इथेही इतर देशांप्रमाणे समाजात वेगवेगळे आर्थिक स्तर आहेत. गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत लोक सिंगापुरातही आहेत. पण इथले गरीबही खाऊन पिऊन सुखी आहेत. त्यांना पुरेसा निवारा, कपडे, अन्न मिळेल याची जबाबदारी सरकार घेते. दारिद्र्य, बेकारी, भिकारी सिंगापुरात अस्तित्वात नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी, फसवणूक खूपच कमी प्रमाणात आहे. तसेच स्त्री पुरुष समता सगळीकडे पाहायला मिळते. मुलगा मुलगी बरोबरीने सगळ्या क्षेत्रात काम करतात.
सिंगापूरसारख्या प्रगत देशात कायदा अतिशय कडक आहे आणि प्रत्येक नागरिक त्याची अंमल बजावणी मोठ्या इमानदारीने करताना दिसतो. डावरी -हुंडा ही गोष्ट अशी आहे की घेणारा ‘मी हुंडा’ घेतो अशी कबुली देत नाही. त्यामुळे कायद्याने नेमका ‘हुंडा’ कोणता यावर बोट ठेवणे कठीण असते. सिंगापुरात कायद्याने डावरी घेणे किंवा देणे म्हणजे विवाहप्रसंगी दोन पक्षांमध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध दिलेली किंवा घेतलेली रक्कम किंवा भेटवस्तू असा अर्थ आहे. हुंडा देण्याला आणि घेण्याला कोणताही कायदा पाठिंबा देत नाही.
सिंगापूर इथे जी लग्नं होतात ती मुलामुलींच्या इच्छेने होतात. प्रथम ते एकमेकांना पसंत करतात, नंतर लग्नं करण्याचे नक्की करतात. आईवडील नंतर लग्नाला येतात. इथे अरेंज्ड मॅरेज म्हणजे पालकांनी वधू- वर शोधणे हा प्रकार अस्तित्वात नाही. बहुतेक खर्च हा दोघांनी मिळून करतात. लग्न प्रसंगी जी रक्कम किंवा किमती भेट वस्तू दिली जाते ती केवळ वधूसाठी असते, रितीनुसार वराकडून वधूला काही रक्कम किंवा भेटवस्तू देण्यात यावी असा प्रघात आहे.
सिंगापुरात भारतीय विवाह पद्धत आणि हुंडा
सिंगापूरमध्ये प्रामुख्याने चिनी, मलय आणि भारतीय लोक राहतात. सिंगापूरला १९६५ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून अनेक समाज सुधारणा झाल्या आहेत. लोकांची सुरक्षा, शिक्षण, स्त्री पुरुष समानता याला खूपच महत्त्व दिले जाते.सिंगापुरात ९ टक्के भारतीय राहतात. त्यात बहुसंख्य दाक्षिणात्य, तामिळ आहेत. अनेक भारतीय मुलांची लग्नं पारंपरिक पद्धतीने होतात. काही लग्नं देवळात होतात तर काही घरी रजिस्ट्रार येऊन नोंदणी पद्धतीने होतात. लग्न जरी भारतीय पद्धतीने झाले तरी इथल्या कायद्यानुसार आधी ROM मध्ये नोंदणी करावी लागते. म्हणजे कायद्याने लग्न आधीच झालेले असते नंतर पारंपरिक पद्धतीने लग्न होते. इंडियन सिविल लॉ-इंडियन पिनल कोड सेक्शन ३०४ बी आणि ४९८ ए नुसार हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा आहे. पण ‘हुंडा’ हा कोण देते आणि घेते हे ओळखणे कठीण असते. कोणी त्या बद्दल तक्रार केल्याचे ऐकिवात नाही.
सिंगापुर स्थित असणाऱ्या भारतीय लोकांच्या पारंपारिक प्रथेनुसार लग्नाचा सगळा खर्च वधूकडून केला जातो. भारतीय समाज अनेक जातींनी बनलेला आहे. त्या त्या जातीप्रमाणे हुंडा, भेटवस्तू यांची पद्धत बदलते. उत्तर भारतीय, मारवाडी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम, भेटवस्तू या वधूकडून वराला दिल्या जातात. त्याला हुंडा न म्हणता ‘भेटवस्तू’ हे लेबल लावले जाते. मराठी समाजात दोन्ही कडचा खर्च विभागून केला जातो. परंतु अलीकडे नवरा मुलगा मुलगी हे स्वतःच लग्नात किती खर्च करायचा हे ठरवतात.
आईवडिलांकडून थोड्या प्रमाणात काही रक्कम किंवा भेटवस्तू स्वीकारतात आणि बाकी स्वतःच्याच बळावर लग्नाचा पूर्ण समारंभ पार पाडतात.
सिंगापुरातील चिनी लोक आणि विवाह -हुंडा पद्धत.
चिनी लोकांच्या लग्नात मुलाकडून मुलीला हुंडा दिला जातो. हुंडा देणे म्हणजे मुलीच्या सन्मानार्थ काही रक्कम किंवा भेटवस्तू देऊन सासरी तिचे स्वागत करणे असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. मुलीकडचे लोक मुलाकडून दोन हजार डॉलर पासून नऊ हजार डॉलर पर्यंत रक्कम मागतात. ही रक्कम यापेक्षा जास्ती सांगितली तर वधूपिता मुलीला विकतो आहे असा अर्थ होतो. म्हणून की काय ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतली जात नाही. चिनी लोकांमध्ये वेगवेगळ्या देशात हुंड्याची पद्धत वेगवेगळी आहे.सिंगापूर, हॉंगकॉंग, शांघाय, तिबेट, बीजिंग या देशात चिनी लोकांची हुंडा देण्याची पद्धत वेगळी आहे. मुलाकडून मुलीला महागड्या वस्तू देण्यात येतात. या वस्तूंची यादी मोठी आहे. मोठ्या हॅन्डबॅग्स, मोटार, कपडे, दागिने अशा वस्तू नवरीला दिल्या जातात. मनाजोगत्या वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून नवरीने भावी नवऱ्याला वाईट शब्दांची लाखोली भेट दिली अशी बातमी मध्यंतरी वाचण्यात आली. काही लग्नं मोठ्या क्लबमध्ये धुमधडाक्यात केली जातात.
सिंगापूर इथे सर्वसाधारण लग्नाचा खर्च २७००० डॉलर्स असतो.यावरून लग्नाचा खर्च, हुंडा देणे घेणे ही सर्वतः कुटुंबाची वैयक्तिक बाब असते असे दिसते. परंतु यामुळे कोणत्या मुलीला त्रास झाला किंवा तिचा बळी गेला असे कुठे नोंद केलेले नाही किंवा ऐकिवात नाही.
पिन जीन
सिंगापुरात आजच्या पिढीतील मुले मुली मात्र पूर्वीच्या रितीरिवाजाप्रमाणे हुंडा मागत नाहीत. याबाबतीत प्रत्येक कुटुंबावर ते लग्न कसे करतील हे अवलंबून असते. चिनी लोकात ‘पिन जीन’ ही रूढी अस्तित्वात आहे. पिन जीन म्हणजे वराने वधूला देण्यासाठी ठरवलेली रक्कम असा आहे. या समारंभात वराकडून वधूला पैशाच्या रूपात देणगी दिली जाते. दोन्ही घरांचे संबंध चांगले ठेवण्यासाठी पैसे, भेटी याचा उपयोग केला जातो. ही किंमत निश्चित अशी नसते. प्रत्येकाच्या इच्छेनुसार, ऐपतीनुसार ही किंमत ठरवली जाते आणि सम प्रमाणात असते. तसेच पारंपरिक प्रथेनुसार वधूकडून थोड्या प्रमाणात रक्कम वराला परत केली जाते आणि त्यात भर म्हणून काही भेटवस्तू दिल्या जातात. एकूणच हा खुशीचा मामला असतो. कोणावरही सक्ती केली जात नाही किंवा कोणी मुलगी, मुलगा या प्रकाराने त्रासल्याची घटना घडली नाही.
गुआ डा ली पद्धत (बेट्रोथल)
चिनी विवाह समारंभात काही भेटीची देवाण घेवाण केली जाते. हा समारंभ प्रत्यक्ष विवाह होण्याआधी ३ ते ३० दिवस आधी आयोजित केला जातो. नवरा मुलगा त्याच्या नातलगांसमवेत वधूला भेटायला येतो. या समारंभात मुलाकडून मुलीला अनेक मौल्यवान भेटी दिल्या जातात. या भेटी देण्याचा उद्देश वधूच्या सुखद भावी आयुष्याची सोय करणे असा असतो. १६ वर्षापेक्षा लहान मुलींना विवाह करण्यासाठी विशेष लायसन्स लागते. शिवाय मॅरेज कॉउंसेलिंगची विशेष सोय असते. वर वधुने या काउंसेलिंगचा कोर्स करणे आवश्यक असते.
गुआ दा ली समारंभात ड्रॅगन आणि फिनिक्स कॅण्डल्स, लाल रंगाचे कपडे, बिया, शुंग क्सि स्टिकर्स अशा अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. या गिफ्ट पॅकची किंमत १५० डॉलरपासून २५० डॉलर पर्यंत असते. लाल रंग हा चीनमध्ये शुभ मानला जातो.
दागिने
वराच्या बाजूने नवरीला चार ते पाच सोन्याच्या आणि ड्रॅगन फिनिक्स बांगड्यासाठी पैसे द्यावे लागतात. या दागिन्यांची किंमत ५००० डॉलर पर्यंत असते.
हुई ली -नवरीकडून भेटवस्तू परत करणे
नवऱ्यामुलाकडून मिळालेल्या भेटवस्तूंपैकी काही भेटवस्तू नवरीकडच्या लोकांकडून परत केल्या जातात. या वस्तू परत करताना त्याबरोबर आणखी काही नवीन भेटवस्तू नवरीकडून मुलाला दिल्या जातात. ही यादी अशी असते—-२ बाटल्या ऑरेंज ज्यूस, लाल छत्री, रुलर, नवऱ्या मुलाचा सूट, टी सेट, बेडशीट्स इत्यादी. हे देणेघेणे दोन्हीकडून खुशीने-स्वेच्छेने होत असते. या सगळ्या वस्तूंची किंमत १९० डॉलर पर्यंत असते.
भेट म्हणून देण्यात येणारी रक्कम $१८८८ ते $८८८८ एव्हढी असते. ती हजारात मोजता यावी अशी मान्यता आहे. म्हणजे यापेक्षा जास्त रक्कम खर्च होऊ नये असा एक अलिखित नियम आहे.
सिंगापूर आणि मलय लग्न
मलय लोक प्रामुख्याने मुस्लिम आहेत. सिंगापुरात त्यांच्यासाठी लग्नाचा कायदा वेगळा आहे. मलय विवाहात चिनी लोकांसारख्याच (पारंपरिक गुओ दा ली) भेटवस्तू आणि पैसे एकमेकांना दिले जातात. परंतु चिनी लोकांप्रमाणे या वस्तूंची यादी ठराविक किंवा मर्यादित नसते. किती वस्तू दिल्या जाव्यात यावरही मर्यादा नसते. हॅन्डबॅग्स, पर्फुम्स किंवा खाद्यपदार्थ सुद्धा भेटवस्तू म्हणून दिले जातात.
पारंपरिक पद्धतीनुसार मलय विवाहात वर आणि वधूचे आईवडील विवाहातील सर्व व्यवहार- एंगेजमेंट वगैरे स्वतःच ठरवतात. वराकडील लोक वधूच्या घरी भेटवस्तूंचा मोठा ट्रे घेऊन जातात आणि लग्नाची बोलणी करतात.
या भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीत प्रथेनुसार वराच्या कुटुंबाकडून वधूला वाडगाभर विड्याची पाने आणि मसाले भेट म्हणून दिले जातात.सोन्याची अंगठी हुंडा म्हणून दिली जाते. तसेच ‘मास काहविन’ म्हणजे हुंड्याची मान्य झालेली रक्कम साखरपुड्याच्या दिवशी (एंगेजमेंट) दिली जाते. ’रजिस्ट्री ऑफ मुस्लिम मॅरेजेस’ प्रमाणे डावरी किंवा ‘हन्तरं’ वराकडून वधूला एक ठराविक रक्कम लग्नाचा सोहळा संपन्न होण्यासाठी दिली जाते. मेहर म्हणजे एक ठराविक रक्कम (१०० $ पेक्षा कमी नाही) निकाह सोहळ्या आधी दिली जाते. ही रक्कम दोन्ही पक्षांनी एकमुखाने ठरवलेली असते. कुठेही जबरदस्ती नसते. वधूच्या लग्नाच्या तयारीसाठी ही रक्कम दिली जाते तसेच वराची ऐपत पाहून ही रक्कम ठरवतात. विवाहा आधी वधूकडे एक बैठक घेतली जाते. यात लग्नात करायची सगळी देवाणघेवाण नक्की केली जाते.
सिंगापुराचा इतिहास चाळला (गुगल केला) असता इथे हुंडाबळी किंवा छळ झाल्याचा एकही गुन्हा नोंदवलेला नाही. मॉडर्न मुले मुली पारंपरिक पद्धतीने घेण्यात किंवा देण्यात येणाऱ्या पैशाच्या किंवा भेट्वस्तूच्या विरोधात आहेत.
एकूणच सिंगापुरातील स्त्री ही हुंडा या भस्मासुरापासून मुक्त आहे असे म्हणता येईल. भारतात मात्र यातून तिची सुटका व्हायची असेल तर तिलाच खंबीर बनावे लागेल. आजच्या मुलांनी तिला निडरपणे साथ द्यावी. केवळ कायद्याने हुंडाविरोधी तरतूद करून हा प्रश्न सुटला असता तर आजपर्यंत कोणीही हुंडा घेतला आणि दिला नसता असे वाटते.
(टीप. —-प्रस्तुत लेखातील लग्न आणि हुंड्यासंबंधी पद्धती या वेगवेगळ्या साईटवरून आणि स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून लिहिल्या आहेत.)
– लेखन : मोहना कारखानीस. सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
मोहना कारखानीस.
खूप छान वर्णन केलंय आपण.
मलय हे प्रामुख्याने मलेशियाई.
China town hi china लोकांची वस्ती.
Little India ही एक भारतीय लोकांची वस्ती आहे.
सर्वात मोठे मॉल सिंगापूर मध्ये ते आहे
मुस्तफा मॉल.
तो आहे एक इंडियन मालक.
भारतीय सरदार तर खूप आहेत.
Official laungage तामिळ पण आहे.
प्रेसिडेंट पण indian तामिळ होते. Mr. जगन्नाथन.
If i am not wrong
Changi Air port. Word’s busiest port.
Next is changi Naval base
Approx 25/30 km from city.
The best city n country in the world.
Santossa island.
एक दिवास्वप्न.
Night safari.
डॉल्फिन show 🌹🌹
धन्यवाद madam.
मी सिंगापूर.
Ambassy मध्ये. Naval attachi होतो
त्यामुळे सर्व वर्णन केलंय 🌹🌹