८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. प्रत्येक वर्षी महिला सबलीकरण करण्याकडे एक पाऊल पुढे टाकण्याचा आपण ह्या दिवशी निर्धार करतो. त्याच प्रमाणे गौरवशाली महिलांचा सत्कार देखील करतो.
पण ह्या सगळ्याला एकविसाव्या शतकात गालबोट लावणारी गोष्ट म्हणजे हुंड्याची प्रथा. तसा हुंडा
प्रतिबंधक कायदा भारतात १९६१ साली लागू होऊनही ६० वर्षे झाली आहेत. परंतु हुंडाबळीचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वाढतानाच दिसत आहे. भारत देशात दर तासाला एक हुंडाबळीचा मृत्यू होतो. वर्ष २००१ ते २०१६ च्या दरम्यान या प्रकरणात खूप वृद्धि झाली. राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरोचे आकडे सांगतात की विभिन्न राज्यातून वर्ष २०१२ मध्ये ८,२३३ हुंडाबळी गेले.
हुंडा म्हणजे लग्नाच्या वेळी मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारी भेट आहे. ही भेट रोख रक्कम, बँकेत पैसे, मालमत्ता, वस्तू, सोने, इथपासून घर, गाडी, घरातल्या संसारोपयोगी वस्तू ह्या स्वरूपात घेतली जाते. लग्नानंतर मुलीचा सासरच्यांनी नीट सांभाळ करावा म्हणून दिली जाणारी ही किंमत होय आणि ती वसूल करण्यासाठी मुलाकडचे कोणत्याही थराला जातात. बहुतेक वेळा हा हुंडा मुलगी अथवा तिच्या घरच्यांकडून घेतला जातो.
मुस्लिम धर्मात मुलगा मुलीला मेहेर देतो, पण त्याला हुंडा समजता येणार नाही. कारण आपण ह्या लग्नास योग्य आहोत हे दाखवण्यासाठी मुलीच्या मर्जीनुसार जे मुलाकडून (वस्तू/पैसे) दिले जाते त्यास मेहेर म्हणतात.
आफ्रिकेतील नायजेरिया ह्या देशात मुलाने वधूची किंमत (ब्रायडल प्राइस) दिल्याशिवाय विवाह संपन्न झाला असे मानत नाहीत. हा प्रकार हुंडा सदृश वाटला तरी तसा नाही. त्यात वधूची किंमत मोजली तरी वधूला विकत घेणे नाही. वराच्या आर्थिक कुवतीनुसार तो देतो. उद्देश हाच असतो की मी तुझा सांभाळ करायला सक्षम आहे आणि आपल्या विवाहाच्या सर्व जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकतो, हे सांगणे.
चीनमध्ये सुद्धा ब्रायडल प्राइस द्यावी लागते. मुलीच्या वृद्ध माता-पित्यांना आर्थिक मदत म्हणून ह्या प्रथेची सुरूवात झाली. कारण मुलगी आपल्या पालकांची काळजी घेणार हे त्यात अध्याहृत होते. ही प्रथा अद्याप चालू आहे. मात्र आता तो मुलगा आर्थिकदृष्ट्या विवाहयोग्य आहे की नाही, हे ठरण्यासाठी ह्याचा आजकाल जास्त वापर केला जातो.
हुंड्याची प्रथा फक्त भारतातच नव्हे तर इतर देशातही आहे. हुंड्याला उर्दू मध्ये जहेज़ म्हणतात. यूरोप, आफ्रीका आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पध्दतीचा मोठा इतिहास आहे. भारतात याला दहेज, हुंडा किंवा वर-दक्षिणा ह्या नावाने ओळखले जाते.
आजच्या आधुनिक काळात देखील हुंडाबळी परंपरा सुरू आहे. भारत हुंडाबळीच्या मृत्यांमध्ये सगळ्यात आघाडीवर आहे. त्याच बरोबर पाकिस्तान, बांगलादेश, आणि इराण ह्या देशांमध्ये ही हे प्रमाण खूप आहे. हुंड्यासाठी त्या मुलीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला जाळून मारणे, किंवा तिला आत्महत्या करायला प्रवृत्त करणे तसेच वैवाहिक बलात्कार हे सुध्दा केले जाते.
हुंड्यामागची मानसिकता आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीशी जोडली आहे. मुलगा आणि त्याचे कुटुंबीय श्रेष्ठ, त्यांची बडदास्त ठेवलीच पाहिजे, शिवाय आपल्या मुलीची त्यांनी योग्य काळजी घेतली पाहिजे ही मानसिकता. म्हणून मुलीचे पालक ह्या ना त्या रूपाने हुंडा देतात.
मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा उघडपणे मागितला जातो. परंतु सुसंस्कृत घरांमधून तो लपून-छपून आडून आडून मागितला जातो. हल्ली तर मुलाच्या परदेशी शिक्षणासाठी, मुलगी लग्न होऊन परदेशी जाणार असेल तर दोघांच्या तिकिटासाठी व तिथल्या सुरुवातीच्या खर्चासाठी किंवा लग्नानंतर मुलीला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी, मुलाला धंदा सुरू करण्यासाठी भांडवल, घराची डागडुजी, मुलीसाठी एसी, इत्यादी कोणतीही कारणे सांगून कायद्यातल्या त्रुटींचा गैरफायदा घेऊन मुलीच्या पालकांकडून हुंडा घेतला जातो. ह्यात मुलीच्या पालकांच्या आर्थिक स्थितीचा अजिबात विचार केला जात नाही.
धक्कादायक गोष्ट म्हणजे बेंगळुरू शहरात, जी भारताची सिलिकॉन व्हॅली आहे तिथे २०२० च्या पहिल्या १६ दिवसात १७ हुंडाबळी आणि सलंग्न मृत्यूची प्रकरणे घडली. देशाची राजधानी दिल्ली हुंडाबळी मध्ये फार काही मागे नाही.
उच्च शिक्षित लोकांमध्येही हुंडाबळीचे प्रमाण खूप आहे. उदाहरणतः २७ वर्षीय पी.एच.डी. करणाऱ्या महिलेला शिक्षण सोडावे म्हणून छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. हुंड्यासाठी छळ सहन न होऊन विमान परिचारिका अनिसा बात्राने गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली.
नोकरी करत असली तर मुलीला तिचा सगळा पगार सासरच्यांच्या हवाली करावा लागतो. काही ठिकाणी गोड बोलून तिचे सगळे दागिने हडप केले जातात आणि पुन्हा कधीही परत दिले जात नाहीत. त्याच प्रमाणे तिचा पगार घेऊन बँकेत तिच्या नावाने एफ. डी. करण्याचे आमिष दाखवून तिचा पैसा बळकावला जातो. शिक्षित व आर्थिक दृष्ट्या सक्षम असली तरी कित्येक वेळा भारतीय नारीला आर्थिक स्वातंत्र्य आजही नाही हे दिसून येते. तिने जर सासरच्यांच्या मर्जीप्रमाणे वागले नाही तर तिला मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. ह्या आणि अशा अनेक घटना आजच्या उच्चविद्याविभूषित समाजात घडत आहेत.
हुंड्याच्या ह्या क्रूर प्रथेमुळे दुर्दैवाने आज भारत महिलांकरिता सगळ्यात धोकादायक देश बनला आहे. त्या करीता नुसता कायदा करून पुरणार नाही, तर त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. पोलिसांनी आपले काम साचोटिने केले पाहिजे. त्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या घरची मुलगी मुलाच्या घरी जात आहे, तर खर्चासाठी किंवा सुरक्षेसाठी मुलीच्या पालकांनी काहीतरी द्यायला हवे असा विचार आधी समूळ उपटून टाकला पाहिजे.
जशी मुलीला लग्न करण्याची गरज असते, तशीच ती मुलालाही असते. जसे सासरचे तिला सांभाळतात तशीच तिही सासरच्यांना सांभाळते, किंबहुना त्यांच्यापेक्षा खूप अधिक प्रमाणात ती तिचे स्वातंत्र्य, स्वत्व, स्वाभिमान आणि कष्ट करून ताकद त्यांच्यासाठी गमावते.
ती येऊन तुमच्या घरात रुजते, तुमचे घर फुलवते आणि त्याला आपलेसे करून त्याचे नंदनवन करते. हुंड्याच्या काही पैशांसाठी तिचा मानसिक, शारीरिक छळ करून त्या रुजणाऱ्या कोवळ्या रोपट्याला निर्घृणपणे समूळ उपटून टाकणारे लोक केवळ पापाचे भागीदारच नाही तर संपूर्ण समजाचे अपराधी आहेत. ही समाजाला लागलेली कीड आपण प्रत्येकाने आपल्या आचार, विचार आणि सदाचार ह्यातून काढून टाकायला पाहिजे.
– लेखन : तनुजा प्रधान. अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूपच छान लिहिले आहे.
धन्यवाद. तनुजा madam 🌹🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद! 🙏🌷🌿
खरोखरच हुंडापद्धती ही मानवतेला कलंक आहे!
खरंच! आपल्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद!🙏🌷🌿