बानो…..
मी अंजुम बानोला सहज विचारलं, “आप कितनी बार चौथी क्लास मे बैठी थी ?” माझा प्रश्न पूर्ण होता होताच अंजुम बानो अगदी उत्साहाने उठून उभ्या झाल्या आणि मला म्हणाल्या, “एक मिनिट दिदी अभी आयी”असं म्हणत त्यांनी त्यांच्या खोलीचं दार उघडलं आणि आत जाऊन परत दोन्ही कवाड टेकवून घेतली.
आतून एखादी ट्रंक खेचून काढल्याचा मग ती उघडण्याचा आणि शेवटी ट्रंकचं झाकण दणकन आपटण्याच्या जवळपास आवजा सोबतच अंजुम बानो खोली बाहेर आल्या. एखाद्या बाळाला त्याची खूप जपून ठेवलेली काहीतरी जिक्कून सापडावी असे काहीसे भाव अंजुम बानोच्या चेहऱ्यावर होते. आणि त्यांच्या हातात एक जुनी वही होती. ती वही हातात अगदी घट्ट धरून बानो माझ्या शेजारी ओसरीवर बसल्या. आणि ती वही उघडून त्यातून एक ब्लॅक अँड व्हाइट काही डाग पडलेला एक फोटो काढून माझ्या हातात दिला. त्या फोटोत दोन किंव्हा तीन खोल्या असलेल्या एका झोपडी समोर काही लहान मुली निळा सलवार कमीज घातलेल्या, पांढऱ्या ओढणीने डोकं घट्ट बांधून हातात पिशव्या घेऊन फुटलेल्या कौलारू छताखाली उभ्या होत्या. त्यात अंजुम बानो सारख्या निरागस चेहऱ्याची एक मुलगी अगदी बानो सारखीच स्तब्ध होऊन माझ्याकडे बघत होती.
मी फोटो अगदी लक्ष करून बघत असतानाच बानो म्हणाल्या ,”दिदी, देखो बताओ मैं कौंनसी वाली हुं” मी फोटोमध्ल्या एका मुलीच्या चेहऱ्यावर बोट ठेऊन म्हणाले “ये लग रही है आप जैसी” बानो अगदी खुश झाली आणि म्हणाली, “हाय दिदी आप तो एकदम सही से पहेचान गयी. मैं ही हुं ये. मैं भी तीन साल बैठी हुं चौथी मे.” असं म्हणत मनसोक्त हसून घेतलं बानो नी. मी काहीच बोलले नाही त्यांच्या चेऱ्यावरचं हसू क्षणात जादू व्हावी असं गायब झालं आणि एवढ्यातच त्यांचे डोळे गच्च भरले देखील अश्रूंनी.
मी काही बोलण्याआधीच अंजुम बानोचा आधीच भारी असलेला आवाज आणखी भारी झाला होता. त्या पुढे म्हणाल्या, “बाद में तो जिंदगी ने पढाया वो कोई किताब मे ना लिखा होगा. बाकी तो सबके निकाह हो गये और मैं….”
बानो पुढे बोलणार तेवढ्यात तिची नऊ वर्षाची मुलगी जन्नत रडत रडत तिच्या जवळ आली. जन्नत वस्ती बाहेर जवळच झोपडपट्टीत तिच्या मानलेल्या आजीकडे राहत असे तिथूनच ती शाळेत जात असे. तिथे आणखी दोन मुली राहत होत्या वस्ती मधल्या. त्या पण शाळा शिकत होत्या.
बानो झटकन भानावर आली आणि डोळ्यात भरून आलेले अश्रू आतल्या आत गिळून जन्नत ला जवळ घेऊन तिला विचारू लागली, “क्या हुआ रो क्यू रही है, और अकेली क्यू आयी है तू ?” जन्नत आपले घारे, टपोरे डोळे अधिक मोठे करून रडत रडत बोलू लागली, “अम्मा वो टीचर ने मेरा बस्ता रख लिया स्कूल मे” असं म्हणत ती आणखी जोराने रडू लागली.
मला पण आश्चर्य वाटलं टीचर ने जन्नत च दप्तर का ठेऊन घेतलं असावं ? जन्नत तशी फार शांत पोर होती. आणि समजूतदार पण. जन्नत ही बानो ची पाचवी मुलगी होती.
जन्नत चा जन्म होण्यापूर्वी बानोची चार मुलं वारली होती. कुठल्याही आईचं हृदय पिळून निघणार अश्या तिच्या बाळांच्या मरण कथा होत्या. अंजुम बानो फार हिमतीची बाई म्हणावी लागेल. म्हणून जन्नत म्हणजे तिचा जीव की प्राण होती. जन्नत ला रडताना बघून बानो चा जीव कासाविस होत होता. मी बानो ला शांत केलं….
क्रमशः
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210731-WA0006-150x150.jpg)
– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800