मित्रहो, महाराष्ट्रात जशी मराठी साहित्य संमेलने होत असतात, तशी इतर देशातही मराठी भाषा संमेलने होत असतात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमधून काही कलाकार मंडळी मराठी नाटकेही बसवत असतात. तिथे गणेशोत्सव देखील होत असतात. अमेरिकेप्रमाणे जर्मनीतही मराठी संस्कृतीचा जागर करण्यासाठी महाराष्ट्र मंडळांतर्फे विविध उपक्रम होत असतात. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन येत्या ऑगस्टमधे तर ऑस्ट्रेलियात मराठीजनांचे संमेलन हे सप्टेंबरमधे होत आहे.
२००५ साली ऑस्ट्रेलियात जयंत ओक यांच्या ‘गप्पागोष्टी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकलाकार म्हणून गेले असताना, सिडनी व मेलबर्न येथील महाराष्ट्र मंडळातील मराठी जनांचा सहवास मिळाला. महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांना ते अतिशय प्रेमाने आपल्या उपक्रमांबद्दल सांगत होते. महाराष्ट्रातील विविध भागांतील मराठी मंडळी तेथे येऊन स्थायिक झाली आहेत. हनुमानाने आपली छाती उघडून रामाचे दर्शन द्यावे, त्याच भक्तिभावाने आपल्या हृदयात जपलेले मराठीचे प्रेम ही मंडळी सहजपणे दर्शवित असतात.
तेथील मराठी माणूस नाट्यवेडाही आहेच. एकदा ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक तेथे तालीम करून बसवण्यात आले. मात्र त्याला लागणारे कॉस्टुम ऑस्ट्रेलियात कसे मिळणार ? म्हणून भारतातून (पुण्यातून) ते आणण्यात आले होते.
सिडनी, मेलबर्न येथील मंडळातील लोकांनी आजवर अनेक मराठी नाटके बसवली आहेत. एवढंच काय पुढील पिढीलाही मराठीशी जोडून ठेवण्यासाठी इथे मराठी शाळाही सुरु झाल्या आहेत.
सिडनी मराठी मंडळ आणि जागतिक मराठी साहित्य, संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे विश्व सावरकर संमेलन २७ मे २०१७ रोजी संपन्न झाले होते. अभिनेते श्री शरद पोंक्षे, प्रवचनकार डॉ सच्चिदानंद शेवडे, श्री दीपक दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनात महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” हा सावरकरांचा वेगळा पैलू उलगडून दाखविणारे व्याख्यान सर्वांना भावले. पुढे या विषयावर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.
ऑस्ट्रेलियाचा ‘ओर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा भारताच्या पद्मश्री समान किताब मिळालेले, संशोधक, उद्योजक डॉ विजय जोशी आणि सिडनी मराठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी हिरीरीने भाग घेतला होता.
२०१८ साली सिडनी येथील कलाकारांचे नाटक ‘सुखांशी भांडतो आम्ही’ चा प्रयोग भारतात होणाऱ्या थिएटर ऑलिंपिकसाठी निवडला गेला. भोपाळ आणि दिल्ली येथे त्यांना प्रयोग करण्याची संधी मिळाली. तेव्हा नाटकातील कलावंतांनी स्वखर्चाने येण्याची तयारी दर्शवली. नाटकाचे लेखक अभिराम भडकमकर हे स्वतः नाटकाला उपस्थित होते.
नेपोलियन अल्मेडा हे नाटकाचे दिग्दर्शक अभिमानाने आपल्या टीमबद्दल बोलत होते. “ऑस्ट्रेलियात राहूनही आपल्या भाषेशी आणि संस्कृतीशी जोडून रहाण्याची येथील लोकांना फार निकड वाटत असते.”
१९९० पासून सिडनी मराठी मंडळाचे सभासद झालेले नेपोलियन आल्मेडा ऑस्ट्रेलियातील मराठी जगात हळुहळू सामावून गेले. नाटकांचे दिग्दर्शन करू लागले. आणि ऑस्टेलियातील मराठी रंगभूमीच्या कक्षा त्यांनी अधिक विस्तृत केल्या.

ते ‘सिडनी मराठी असोसिएशन’ कार्यकारिणीचे सभासद आणि नंतर अध्यक्षही झाले. अध्यक्ष असताना, सिडनीतील पहिल्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाची धुरा त्यांनी आणि कमिटीच्या सर्व सभासदांनी यशस्वीपणे वाहिली.
त्यांचे आणखीन एक कार्य उल्लेखनीय म्हणजे आनंदवनासाठी त्यांनी एक छानसं नाटक बसवलं. स्मरणिका छापली. पैसे देणगी स्वरूपात गोळा करून आनंदवनाला चक्क ३५००० डॉलर्सचा धनादेश पाठवला. अशी परदेशात राहूनही मायदेशासाठी सामाजिक भान ठेवून काम करणारी माणसं पाहिली की खूप कौतुक वाटतं.
आता या वर्षीचे, म्हणजे २०२२ चे अखिल ऑस्ट्रेलिया (मराठी) संमेलन २३, २४, २५ सप्टेंबरला ‘महाराष्ट्र मंडळ व्हीक्टोरिया’ तर्फे मेलबर्न येथे आयोजित होत आहे. अर्थात, ऑस्ट्रेलियातील इतर मराठी मंडळेही सहभागी होणार आहेतच. तीन दिवसांच्या कालावधीत दररोज अंदाजे १२०० च्या आसपास मराठी प्रेमी यात सहभागी होतील अशी अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे संयोजक श्री. यशवंत जगताप यांनी व्यक्त केली. या संमेलनाच्या वृतांकणासाठी पत्रकार ही येतील अशी अपेक्षा आहे.

“या संमेलनाचा उद्देश काय असतो ?” असे संमेलनाचे आयोजक श्री. यशवंत जगताप यांना मी विचारले असता, त्यांनी सांगितले की “स्थलांतरित समुदायामध्ये मराठी संस्कृती आणि तिचा वारसा टिकवणे, जोपासणे आणि संस्कृतीचे संवर्धन करणे, तसेच तो भावी पिढ्यांपर्यंत पोचवणे हे आमचे ध्येय आहे.”
सप्टेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या या संमेलनाला भारतातील विविध मान्यवर कलाकार उपस्थित रहाणार आहेत. आर्थिक बाबींवर आयोजक सध्या काम करीत आहेत. उद्योजकांना त्यांनी आवाहन केले आहे की येथे येऊन, संमेलनात सहभागी होऊन आपला ग्राहकवर्ग वाढवण्याची संधी त्यांनी घ्यावी. निरनिराळ्या सोशल मीडियाद्वारे संमेलनातील स्टॉल्स भारतात आणि भारताबाहेरील लोकांना पहाता येतील. त्यामुळे उद्योजक त्यांच्या ब्रॅण्डचा प्रसार करण्यासाठी संधी घेतील. याशिवाय कार्यक्रमांसाठी संमेलनाच्या वेबसाईट्स असतीलच.
देशोदेशीच्या रसिकांना जोडण्यासाठी जून महिन्यापासून ऑनलाईन (झूम वर) कार्यक्रम सुरू होतील. त्यात साहित्य, संगीत यातील मंडळी पाहुणे असतील. रसिकांना याचा फायदा घेता येईल.
ज्यांच्यामुळे ऑस्ट्रेलियातील सध्याच्या मराठी जगाचा कानोसा घेण्याची संधी मला मिळाली, त्या सिडनी येथील अभिनेत्री निलिमा बेर्डे यांची मी आभारी आहे. दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथे झालेल्या जागतिक मराठी संमेलनात त्या ऑस्ट्रेलियातर्फे आल्या होत्या तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली होती. अभिनय, लेखन हे त्यांचे छंद आहेतच पण महाराष्ट्र मंडळातही त्यांनी काम केले आहे. २०१३ साली सिडनी येथे झालेल्या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनात सिडनीच्या साऊथ वेस्ट झोनच्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली होती. समन्वयक म्हणून १६५ कलाकारांना सहभागी करून घेऊन दिमाखदार कार्यक्रम बसविला होता. त्यासाठी अनेक दिग्दर्शकांनी काम केले होते. नीलिमा बेर्डे तेव्हापासून हरहुन्नरी कलाकार म्हणून प्रसिद्ध झाल्या.

२०१८ साली भारतात झालेल्या थिएटर ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियातर्फे सादर झालेल्या अभिराम भडकमकर लिखित ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकात त्या अभिनेत्री म्हणून सहभागी होत्या. मायमराठीबद्दल त्यांना अतिशय आदर आहे.
भारतातून परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा विरह जास्तच जाणवतो. आपली नोकरी, व्यवसायाची व्यवधाने सांभाळून ही माणसे मराठी संस्कृती रुजवण्यासाठी धडपड करताना मी गेली २०वर्षे पहात आहे. त्यांनी लावलेल्या रोपाचा आता बहारदार वृक्ष झालेला पहायला मिळत आहे.

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +919869484800
महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते आणि सदस्य यांनी मराठी संस्कृतीचा वारसा ऑस्ट्रेलियामध्ये टिकवून, जोपासून, तो भावी पिढीपुढे जो आदर्श निर्माण केला आहे त्या बद्दल, सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!!!!
ऑस्ट्रेलियामध्ये होणारे त्रैवार्षिक अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हा मराठी भाषाप्रेमी मंडळींचा येथील सगळ्यात मोठा सण .पैठणी आणि फेटे , कोल्हापुरी साज आणि नथी ,लेझीम आणि ढोल अशा अनंत रूपांनी हा मराठी सण आकारतो .ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधून मराठी मंडळी खूप मोठ्या प्रमाणात संमेलनास आवर्जून येतात . अनंत क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला ऑस्ट्रेलियन मराठी समाज त्याच्या भारतीय मराठी उगमाशी सण संपर्क प्रस्थापित करू इच्छितो आणि वृद्धिंगत करू पाहतो आहे . या मनोवृत्तीचा लाभ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायवृद्धीकरिता उपयोगी होईल .या संमेलनांमध्ये व्यावसायिकांनी प्रत्यक्ष येणे ,त्यांच्या जाहिराती करणे , आणि आपला व्यवसाय विस्तार करणे अशा संधी नक्कीच उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखक २०१० अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे अध्यक्ष होते .
महाराष्ट्र मंडळाच्या कार्याच कौतूक करावे तितके कमीच आहे.
Corona च्या काळातही केले गेलेले कार्यक्रम अप्रतिम आहेत.
अध्यक्ष यशवंत जगताप अणि कार्यकारी यांचे मनापासुन आभार
सुंदर लेख
मेघनाताईं तुमचे आणि वाचकांचे मन:पुर्वक आभार
मेघना खूप छान लेख आणि मराठी मनाची माहिती सगळ्यांपर्यत तू पोहोचवली आहेस.माणसं व्यवसाय, नोकरी निमित्ताने जगाच्या कोणत्याही भागात असली तरी त्याची नाळ मराठी मातीशी,इथल्या परंपरा, सणवार,मराठी भाषेशी घट्ट जुळलेली असते.मनाने ते इथेच असतात..पण जाँबसाठी त्यांना मराठी वातावरणाचा त्याग करावा लागतो….हे मराठीवरच प्रेम, संधी मिळेल तेव्हा अनेक माध्यमातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण, मेळावे,स्नेहभेट,
संमेलनातून मराठीपण जपतात,मराठी संघटना सर्वदूर होत आहेत हे खरोखर अभिमानास्पद आहे…आणि तू परदेशस्थ मराठी माणसांच्या मराठीपणाची प्रसिध्दी देत आमच्या पर्यंत ती माहिती आणलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद….
मी माझ्या मुलीकडे बफलोला गेले होते तेव्हा बफलो मराठी मंडळाच्या गेटटूगेदरला गेले होते…मुलांपर्यत मराठी संस्कार, संस्कृती संक्रमीत व्हावी ही इच्छा बाळगणाऱ्या तमाम परदेशात स्थाईक झालेल्या मराठी बांधवांना माझा मानाचा मुजरा
प्रा.सौ.मानसी जोशी. ठाणे
खरंच मराठी माणसांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. परदेशात राहूनही ही माणसे आपली मराठी भाषेप्रती असलेली नाळ विसरली नाही. भारतात आम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. तिकडे प्रदेशात मात्र ही मंडळी मराठी भाषेचा जागर करत आहेत हे खरोखरच अभिमानास्पद आहे. मेघना मॅडम मुळे ब-याच नवनवीन लोकांना न भेटता उमजून घेण्याचा योग येतो त्यांचे शतशः आभार
– दीपक म कांबळी
मेघनाताई संपूर्ण लेख वाचला.
महाराष्ट्रातून बाहेर परदेशात गेल्यानंतर मराठी भाषा आणि मराठी संस्कृती किती महान आहे हे दुसऱ्या संस्कृतीत गेल्यानंतरच लक्षात येते. येथील कला, क्रीडा, साहित्य, संस्कार उत्सव या गोष्टींना जपणारी तेथील मराठी मंडळी मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यासाठी खूप मोठे मोलाचे काम करत आहेत बाहेर गेल्यावरही त्यांना आपली संस्कृती, आपली भाषा, आणि आपले संस्कार जपावे असे वाटतात यातच महाराष्ट्राचे आणि मराठीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. परदेशातील सर्व मराठी मंडळांचे यासाठी धन्यवाद करायला हवेत. त्या निमित्ताने आपले जे काही चांगले आहे उत्तम आहे उदात्त आहे त्याची ओळख परदेशातील लोकांना ही होते आहे. तुमचा लेख खुप छान झालाय. मला खूप आवडला. अभिनंदन
नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात राहावं लागलं तरी आपल्या मायभूमीची ओढ असते, आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं त्यांना भान असतं. मेघनाताई, आॅस्ट्रेलियातील मराठी माणसाची ही भावना आणि त्यानिमित्ताने ते करत असलेले कार्य आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद !!
धन्यवाद श्रद्धा!
मेघना ताई, संपूर्ण लेख वाचला….आवडला….मराठी भाषेची आवड, अभिमान आपल्या मातृभाषेचा विरह होतो त्यावेळेस जास्त जाणवते. आपल्या मातृभाषेचा अभिमान म्हणजे साहित्य संमेलन जे आज परदेशात मोठ्या हौसेने भरवलं जातं आहे ….हे संमेलन आयोजित करणाऱ्या सर्व मराठी कलाकारांना व त्यांची ओळख करून दिल्याबद्दल तुम्हालाही खूप खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद विकास भावे!
धन्यवाद राधिका मॅडम!
धन्यवाद पंकज!
खूप छान
ऑस्ट्रेलिया येथे मराठी भाषा आणि संस्कृती चे जतन व संवर्धन करणारे सर्व कार्यकर्ते, कलावंत संयोजक यांचे अभिनंदन व प्रशंसा.
धन्यवाद भुजबळ महोदय
मराठी माणूस हा ऊत्सवप्रियच..जिथे जाईल तिथे आपली कला संस्कृतीची बीजं पेरत असतो..ही खूप अभिमानाची गोष्ट आहे