‘आम्ही सिध्दलेखिका’ ठाणे जिल्हा, या संस्थेने नुकताच ‘मराठी ग्रंथ संग्रहालय,’ नौपाडा येथे या वर्षाचा महिला दिन अतिशय कलात्मकरित्या साजरा केला. विविध क्षेत्रातील महिला या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तवनाने झाली. शारदेला नृत्य कलाविष्कारात वंदन केले.
सुप्रसिध्द स्री रोग तज्ञ डाॅ. माधुरी साखरदांडे यांनी “हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे मानसिक बदल” या विषयावर मार्गदर्शन करुन महिलांच्या शंकांचे निरसन केले.
प्रगत महिलादेखील बऱ्याच वेळा अर्थाजन करीत असतात. पण बचत कशाप्रकारे करावी याबद्दल त्या अनभिज्ञ असतात म्हणून महिलांनी बचत कशी आणि का करावी याबद्दलचे मार्गदर्शन टी.जे.एस्.बी.बॅंकेच्या व्यवस्थापक शिल्पा गडकरी यांनी केले.
ज्या समाजात आपण राहतो, त्याच्या सुरक्षिततेची धुरा ज्या खांद्यांवर असते, अशा २५% महिला पोलीस खात्यात आहेत. पोलिस निरीक्षक अरुणा वामन यांनी ‘स्री संरक्षण’ या विषयावर अनुभव संपन्न भाषण केले. प्रत्येक महिला समाजात वावरताना जागरुक असायला हवी यामुळे कितीतरी गुन्हे घडायचे आपण वाचवु शकतो ही मोलाची सूचना त्यांनी केली.
मार्गदर्शनपर भाषणांनंतर महिलांनी ‘विविध गुणदर्शन’ सत्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जुनी लोकगीते, संगीत नाटकातील प्रयोग, नाट्यवाचन, एकपात्री प्रयोग अशा विविध रंगाढंगात नटलेल्या आविष्काराने कार्यक्रमाला रंगत आली. यावेळी खानपानाचीही छान व्यवस्था करण्यात आली होती.
अध्यक्षा प्रा.सौ. पद्मा हुशिंग यांनी ज्येष्ठ लेखिकांचे सत्कार केले. तसेच पुढील उपक्रमांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे निवेदन सौ.अस्मिता चौधरी यांनी केले. संस्थेच्या महिला आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमामुळे नानाविध रंग, गुण व कलाविष्कार यांची उधळण प्रेक्षक महिलांनी अनुभवली.
– लेखन : शुभा खांबेकर पाणसरे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800