श्री हरीचा परम भक्त ।
हिरण्य कश्यपू तनय शक्त ।।
भक्त प्रल्हाद प्रभु नाम गर्जला ।
नारायण नामे अमर जाहला ।।
पिता मातला अहंकाराने ।
पुत्र समजावी हर प्रकाराने ।।
बाळ मारण्या पिता यत्न करी ।
फेकी गिरीहून, तप्त तेलात सत्वरी ।।
देव तारी तया कोण मारी ।
क्षणोक्षणी प्रभू तयास तरी ||
होलिका आत्या पुढे आली ।
म्हणे मज अग्नी ची कृपा झाली ।।
मज सवे प्रल्हाद घेते अग्नीत ।
जळेल तो मी असेल सुरक्षित ।।
घेई होलिका बाळ मांडीवरी ।
अग्नी लावला दैत्ये भयंकर ।।
श्रीहरी कृपा बरसे प्रल्हादावर ।
होलिका जळे बाळ दिसे शुभंकर ।।
होळीची हि कथा श्रीभागवती ।
सद् भक्ती ची देते प्रचिती ।।
होळीमध्ये सर्व अमंगल जाळू।
माणुसकीचे नियम पाळू ।।
– रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर