पत्रकारिता शिकविताना
पत्रकारिता विभागात १९६९-७० मध्ये माझे शिक्षक मुळात पत्रकार होते. श्री ग मुणगेकर, प्रसन्नकुमार अभ्यंकर, ल ना गोखले आणि नी म सिधये आदी आपापल्या वर्तमानपत्रात पूर्ण वेळ पत्रकार होते. वेळ काढून ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रम शिकविण्यासाठी रानडे इन्स्टिटयूट इमारतीत यायचे. जगभर सर्वत्रच हीच पद्धत होती.
विद्यापीठ शिक्षणाचा विकास होत गेला, पूर्णवेळ प्राध्यापक नेमायला सुरुवात झाली, तरी अजूनही व्यावसायिक पत्रकारांना आपापले विषय शिकवायला आमंत्रित केले जाते. वर्ष १९७० मध्ये मी पदविका प्राप्त केली. विभागप्रमुख ल ना गोखले यांनी १९८० मध्ये सुरु केलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला मला शिकवायला निमंत्रित केले. आता वर्ष २०२२ मध्ये देखील पत्रकारिता आणि पत्रकारिता शिक्षण या दोन्ही क्षेत्रांशी माझा ऋणानुबंध कायम आहे, हे सांगताना मला आत्म गौरव वाटतो.
पत्रकारिता व्यवसायाने, विशेषत: बातमीदारी ने माझे आयुष्य समृद्ध केले. समाजात प्रतिष्ठा मिळाली. तद्वतच बातमीदारी करीत असताना, त्या सोबत पत्रकारिता हा विषय शिकवतांना रोज नवनवीन अनुभव मिळत गेले.
पुणे विद्यापीठाच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि पी एचडी साठी शिकवलं त्या त्या वेळी मला स्वतःला शिकविण्याचा आनंद मिळाला. विद्यार्थी अनेक वर्षांनी परत भेटतात तेव्हा ते मोठमोठ्या पदावर काम करणारे संपादक तरी असतात, नाहीतर माध्यमाच्या इतर क्षेत्रात याच पद्धतीची कर्तबगारी गाजवत तरी असतात. आपुलकीने आणि आदराने बोलतात तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.
कोणत्याही विषयाच्या कोणत्याही शिक्षकाची, आपली स्वतः ची काही वैशिष्ट्ये असतात.
माझीसुद्धा शिकवण्याची एक पद्धत विकसित झाली होती. वर्गात प्रवेश केल्यानंतर पहिली दहा-पंधरा मिनिटं पुण्यातल्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली एखादी स्थानिक बातमी प्रत्येकाने सांगितलीच पाहिजे असा माझा दंडक होता. एखाद्याला सांगता आले नाही तर आमच्या ग्रंथालयात जाऊन वर्तमानपत्र उलगडून बातमी वाचायची, लक्षात ठेवायची आणि वर्गात परत येऊन सर्व विद्यार्थ्यांना सांगायचे अशी पद्धत होती.
मुलांनी सांगितलेल्या बातम्यांच्या तपशीलवरून मग राजकारण, इतिहास, भूगोल, विज्ञान, क्रीडा असा कोणताही विषय सुरू करून मुलांना बोलतं करायचं, त्यांच्याकडून मीही काही शिकायचं आणि मग दोन तासाच्या माझ्या लेक्चर मध्ये आधी ठरवून, तयारी करून आणलेला अकॅडमीक -अभ्यास -विषय शिकवायला घ्यायचा अशी माझी पद्धत होती.
अनेक वेळा विद्यार्थ्याला स्वतःविषयी, गावाविषयी तेथील काही वैशिष्ट्ये याविषयी, असं विचारत त्याला बोलतो करत असे.
एकदा आपण एम ए फर्स्ट क्लास असून एम ए चा विषय पॉलिटिकल सायन्स होता असं सांगणारी मुलगी उभी राहिली. तिच्या गावाविषयी विचारलं. तिनं ‘कराड’ सांगितल. मग कराड मधील कोणत्याही एका प्रसिद्ध व्यक्तीचं नाव आणि तिच्या विषयी थोडी माहिती एवढंच सांग अशी तिला सूचना केली. मला वाटलं पटकन दोन मिनिटात सांगून ती मोकळी होईल. बराच वेळ विचार करीत बसली. तिला काही सांगता येईना. मी आग्रह धरला तेव्हा “कराडमध्ये कोण कुठं प्रमुख प्रसिद्ध व्यक्ती आहे ? कोणीच तर नाही,” असंच तिनं सांगितलं.
“कोणीतरी, एक यशवंतराव चव्हाण असं नाव ऐकतो, ते कोण आहेत ?” असं मी प्रॉम्प्ट करून पाहिलं. काही उपयोग झाला नाही.
ही हकीकत मी त्यानंतर अनेक वेळा अनेकांना सांगितली. कोणाचाही विश्वास बसत नाही. पण त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना अजूनही ही घटना आठवते.
ही मुलगी म्हणाली “यशवंतराव चव्हाण हे प्रसिद्ध वगैरे काही नव्हते. त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये खूप बिजनेस केला. त्यांनी आपल्या नावाचे नाट्यमंदिर पुण्यात कोथरूड मध्ये बांधलं, कराडमध्ये नाही, असं तिने निक्षून सांगितलं. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे नाव तिला माहित नव्हतं. ही गोष्ट १९७५-७६ मधली.
पुण्यातल्या दुसऱ्या एका नव्या खाजगी विद्यापीठातल्या विद्यार्थिनीने मला असेच थक्क करून टाकले होते. ही विद्यार्थिनी परभणीची. स्वतः च्या गावाविषयी विचारलं तेव्हा तिने आमच्या शहरात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे असं मोठ्या अभिमानाने सांगितलं. तिचे वडील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास विभागात सध्या कार्यरत आहेत असे तिने सांगितले.
वसंतराव नाईक यांचं नाव विद्यापीठाला दिलं त्याचं कारण काय असेल असा माझा खुप छोटा सोपा पुढचा प्रश्न होता. तिने प्रांजळपणे “मला माहिती नाही” असे सांगितलं. महाराष्ट्राचे अकरा वर्ष मुख्यमंत्री असणारे वसंतराव नाईक हे शेतकरी होते म्हणून त्यांच्या प्रती आदर म्हणून त्यांचं नाव या विद्यापीठाला दिले हे लक्षात ठेवशील का असं म्हटल्यावर तिने कृपावंत होऊन “हो ठेवेन“ असं आश्वासन दिलं.
एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे की शहरातून येणाऱ्या या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना सामान्यज्ञान, स्थानिक इतिहास, भूगोल, राजकारण हे विषय माहीत नसतात. पण त्यांना दिशा दाखवली आणि माहिती कशी मिळवायची हे शिकवलं तर खूप चमत्कार घडू शकतो हा माझा अनेकदा आलेला अनुभव आहे.
एक नमुना.
महाराष्ट्राबाहेरून आलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनीला सावित्रीबाई फुले कोण होत्या असं त्यांच्या जन्मदिनी मी विचारलं. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचा नाव देण्यापूर्वीची गोष्ट आहे. त्या विद्यार्थिनीला सांगता आलं नाही. मग तुला माहिती कुठे मिळेल, ग्रंथालयात कोणते पुस्तक पाहा हे सांगितलं. दुसऱ्या दिवशी या विद्यार्थिनीने सुमारे वीस मिनिटाचं अस्खलित इंग्रजीत सुंदर प्रेझेंटेशन सादर केलं. ते इतकं चांगल झालं की माझ्या सकट वर्गातल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या !
आणखी एका वर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मला शिक्षक म्हणून किती मोठा पल्ला गाठायचा आहे याची दृष्टी दिली. विकासप्रवण संज्ञापन (डेवलपमेंट कम्युनिकेशन) या अभ्यासक्रमाच्या तासाला त्यांना एक छोटी असाइनमेंट मी दिली. दूरवरच्या डोंगर दऱ्यात वसणाऱ्या शंभरेक झोपड्याच्या वस्तीसाठी प्राधान्यक्रमाने पहिल्या वीस गोष्टी कोणत्या असाव्यात याविषयी लिहा अशी असाइनमेंट दिली. वर्गातल्या 30 पैकी किमान आठ दहा विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या रकमा च्या कामाची यादी सादर केली. त्यात एक मॉल, थिएटर, पन्नास बेडचे हॉस्पिटल, शाळा, कॉलेज अशा गोष्टी ठळकपणे होत्या. त्या याद्या वाचल्यानंतर हे लक्षात आले की यांना खेड्यामध्ये जाण्याचा कधी संबंध आलेला नव्हता. त्यावेळच्या हिंदी सिनेमांमध्ये हुन्दडणारा नायक नायिका आणि त्यांची गाणी हे पाहणे इतपतच त्यांचा ग्रामीण वास्तवाशी संबंध आला होता. त्यांना ग्रामीण विषयाची तोंडओळख सुद्धा नव्हती. हा दोष त्यांचा नव्हता. याच भागात राहणा-या एक -दोन विद्यार्थ्यांच्या मदतीने मी एक स्टडी टूर काढली. या रूटवर असणारे एक अभागी गाव आणि अजून विकास होत असलेले गाव निवडले. गरीबी काय असते याचा त्यांना नमुना दाखविला अर्धपोटी राहणारं एक शेतमजूर दांपत्य आणि त्यांची मुलं यांच्या सोबत आम्ही थोडा वेळ राहिलो.
या माझ्या प्रयोगामुळे खूप क्रांती या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आली असेल असे अजिबात नाही. परंतु या पुढच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना आपण काय शिकवले पाहिजे हे मात्र मला निश्चित करता आले !

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
बातमीदारी करताना …हा डॉ. किरण ठाकूर यांचा लेख अतिशय वाचनीय आहे.विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांना आलेले अनुभव वाचून खरोखरच थक्क झाले.कमीतकमी विद्यार्थ्याला स्थानिक
ज्ञान तरी असावे ही त्यांची किमान अपेक्षाही पूर्ण होउ नये ,हे खूपच लक्षवेधी आहे!