१) सृष्टी निराळी भासते….
रंगीत संगीत सृष्टी मजला
आज निराळी भासते,
खुणावूनी समीप मजला
उधळूनी रंग हासते..❤️
गळून पर्णे पडता पडता
तरू भासती नवखे,
सुकलेल्या करड्या रंगाची
भुरळ मजला पडते….🍃
पोपटी रंगात चहूकडे
नाजूक कोवळा कोंब,
हळूच डोकावतो, सांगतो
मी सृजनाचा रंग…..💚
उंच तरूच्या छायेमध्ये
मन पहुडते शांत,
हिरवीकंच पांघरते दुलई
नसे कुठलीही भ्रांत…🌳
अल्लड कलिका खिदळत पहाते
जणू षोडश बाला ती,
तिचे रूपांतर फुलात होता
खुलतो रंग तिचाही….🌸🌺
सोनेरी रंगाची पखरण
अवनीवरती करीतो,
जाता जाता नीळा, केशरी
रंग उधळूनी जातो…..💙🧡
रंगीत सुमनांवरती रंगीत
फुलपाखरे गुणगुणती,
मधुकण अलगद वेचूनी घेता
रंगांमध्ये नहाती…..🦋🌻
शोभते धरेला रंगसंगती
लाजून होते चूर,
ग्रीष्म ऋतूतील सृजन सोहळा
पालटतो अवघा नूर…..🌞🍁
रंगांची या पडते भूल
मन पाखरू होते,
टिपून घेते सारे रंग
रंगबिरंगी होते…..
🧡💙💚❤️💜🤎
– रचना : डॉ सुचिता पाटील. मुंबई
२) सप्तरंग…..
सण असे रंगाचा
रंगुनी या रंगात
विविध अंगाचा
खेळूया दंगात
विविध तेच रंग
लागताच अंग
मोहरले नभांग
त्या श्रीरंगासंग
सप्तरंग भासती
काय ती महती
पिचकारी हाती
खेळास न गणती
गोप गोपी हासती
गो वनचर संगती
तालावर नाचती
रंगांमध्ये रंगती
वृक्ष तेही रंगले
पाण्याने भिजले
स्वप्न मनी दाटले
सख्यारे भिजवले
नभाने पाहिले
मन माझे जुळले
जगात वाहीले
रंगुनीया गुंगले
– रचना : सौ माधवी ढवळे. राजापूर
🔴🟠🟡🟢🔵⚪
३) रंग आनंदाचे…..
पंच रंगे सजली ग
रंगपंचमी अंगणी,
पाच रंगांचे महत्व
जाण सखे ग साजणी.!!
लाल रंग प्रखर तो
उत्तेजना देई छान,
वाढे प्रतिष्ठा नि मान
लाभे आरोग्याचे दान.!!
प्रेम, सौंदर्य सद्गुण
सदाचार, सात्विकता,
निराशेला दूर सारी
पिवळ्यात धार्मिकता.!!
प्रेम,समृद्धी अपार
हिरव्याची हीच शान,
आरोग्यास वृद्धी देई
प्रगतीचे वरदान.!!
तमोगुणी ,न्यायप्रिय
निळा रंग बलवान,
आरोग्य हो वृद्धिंगत
सुरक्षेचे राखी भान.!!
उत्साहाचा, सामर्थ्याचा
कला साहित्यात मान,
आनंदास ये उधाण
जांभळ्यास द्या सन्मान.!!
दाहकता शमविण्या
जल शीतलता देई,
पिचकारी मारताना
भर जल्लोषास येई.!!
अशी महती रंगांची
शोभा वाढे उत्सवाची,
धुलीवंदन सौख्याचे
नांदी ठरते प्रेमाची.!!
– रचना : प्रणाली म्हात्रे. विक्रोळी, मुंबई.
४) 🔥🔥रंगात रंग🔥🔥
रंगात रंग होऊनि दंग श्रीरंग
खेळतो राधेसंग होळीचे रंग,
उत्साहाचे येई भरते, आनंदतरंग
उत्सवाच्या पर्वात भरले सप्तरंग
🔥🔥
वर्ष सरते परी उधाण आनंदाचे
फाल्गुनमासी वेध ते होळीचे
हर्षोन्मादी सारी तरुणाई नाचे
सानथोरही गीतगाती स्वागताचे
🔥🔥
संध्याकाळी लगबग सारी तयारी
एरंडीचे झाड उभेमधेचवाटेभारी
लाकूड फाटे, फांद्या, पेंड्यासरी
पूजेची करिती सारे पूर्व तयारी
🔥🔥
आम्रपर्णे, झेंडूच्या माला चढती
नारळतोरणे, साखर्माळाशोभती
सुवासिनी मंगलफेरे पूजिती
हाळी मारित होळी प्रज्वलिती
🔥🔥
या मंगलसमयी आनंदाचे भरते
दुःख, संकटे, दारिद्र्य ते जळते
दिले पेटवुनि क्रोध मत्सरी घर ते
आदरांजलीने यावे प्रेमाचे भरते
🔥🔥
आठवण आल्यावर केली रचना
🌹🌹🌹🌹🌹🌹
– स्वप्नगंधा सतीश आंबेतकर. विरार
सुष्ट्री निराळी भासते.
Dr. सुचिता पाटील.
खूप छान
🌹🌹👌👌
सर्व कवयत्री
Nice
🌹🌹🙏🙏❤👌