अनपेक्षित कोरोना ने सर्व जगावर दूरगामी परिणाम झाले, होत आहेत. आपल्याच घरात आपल्याला कैद व्हावे लागले. २ वर्षे घरात बसून राहिल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या नाशिक येथील जेष्ठ प्राध्यापक, २३ पुस्तकं प्रकाशित झालेल्या साहित्यीक प्रा सुमती पाटील सांगताहेत त्यांच्या सीमोल्लंघनाचे अनुभव……
– संपादक
हो, सीमोल्लंघन,
आपण दसऱ्याला करतो ना ते, आता पंधरा दिवसांपूर्वीच मी केले. दोन वर्षांचा मार्च ते मार्च बंदिवास मोडून मी प्रथम घराबाहेर पडले.
तशी मी लस घ्यायला बंद गाडीतून जाड मास्क लावून सिव्हिलला दोनदा गेले, पण थोड्याच अवधीत पुन्हा घरात बंद झाले होते. माझा माझ्यावर विश्वास बसत नाही..
दोन वर्ष म्हणजे ३६५ + ३६५ इतके दिवस मी फक्त घरातच होते. तसं ही मी काही फार भटकणारी बाई नसले तरी इतके दिवस अंगणातही न उतरता निघून गेले याचे अजून आश्चर्य वाटते. हो, जीव सलामत तो फिरणे पचास .. असे म्हणू या ना !
काय वाताहत केली हो या कोरोनाने ? काही घरात कायमचे
महाभयंकर दु:ख्ख ठेवून गेला तो, कधी ही न विसरण्यासाठी !
पर दु:ख्ख फार शीतल असते हो ! ते जेव्हा खरोखर आपल्या
उंबरठ्याच्या आत येते तेव्हाच त्याची खरी तिव्रता व चटके
आपल्याला कळतात. एरव्ही आपण दुसऱ्याच क्षणाला आपल्या कामाला लागतो .
पण हा दोन वर्षांचा वनवास संपवून जेव्हा मी बाहेर पडले, तेव्हा जणू नव्याने मी जगात वावरते आहे असे वाटले. दोन वर्षात रस्त्यात सुद्धा खूप काही बदल झालेले मला दिसले. काही रस्ते नि वस्त्या तर मला ओळखू येत नव्हत्या. प्रसंग होता भुजबळ साहेबांच्या घरी चहा पानाचा …
सरांचा फोन आला, मॅडम मोजक्याच लोकांना मी बोलावले आहे, या … त्यांना नाही तरी कसे म्हणायचे ? प्रश्न पडला.
म्हणाले, सर मी दोन वर्षात बाहेरच पडले नाही हो ..
म्हणून म्हणतो या आता, बाहेर पडा … कोरोना संपला आहे.
ठीक आहे म्हटले येते.
ड्रायव्हर सोबत असतांना ड्रायव्हिंग सीटवर बसले. दोन वर्ष गाडी चालवली नव्हती. येईल का चालवता ? विसरले असेन का मी ? भीत भीतच मी चावी
फिरवली नि काय ? …
अहो, जणू मधला दोन वर्षाचा काळ गळून गेला की काय ?
अशी सराईतपणे मी गाडी चालवत साहेबांचे घर शोधून काढले. भुजबळसाहेब हसतमुखाने सामोरे आले. अलकाताई ही दारात आल्या. मला खूप आनंद झाला. हळू हळू मंडळी जमली. येईल त्याला आधी चहा.. ताईंच्या किचनमध्ये फेऱ्या चालूच होत्या. प्रत्येकाचे दोघेही जण हसतमुखाने स्वागत करत होते. हळू हळू गप्पांची मैफिल रंगली. ओळखी झाल्या.
आणि मग, जमली कवितांची मैफिल. मी माझ्या “नजराणा” पुस्तकातली स्रियांचे दु:ख्ख मांडणारी कविता गाऊन दाखवली व अजय बिरारी यांनी मग एक टची गझल सादर केली नि..
मंडळी जोडीला गरमागरम पोटभर पोहे, चिवडा मिठाई ..!
वा रे वा .. काय मजा आली म्हणून सांगू तुम्हाला …
या यशस्वी सीमोलंघना नंतर दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक वाचनालयात आलेली मुले, आम्हा बालसाहित्यिकांना त्यांच्या मनातील प्रश्न विचारणार होते. त्या तयारीला मी लागले.
दुसऱ्या दिवशी वेळेच्या आतच मी तेथे पोहोचले. कार्यक्रम सुरू झाला. मुलांचा उत्साह अगदी ओसांडून वहात होता.
दीपप्रज्वलन, स्वागत झाले नि पहिलाच प्रश्न मुलांनी मला विचारला. तुम्हाला कविता कशी सुचते..? आणि त्यांच्या या कुतुहलाला शमवणारे थोडक्यात पण समर्पक असे उत्तर मी त्यांना दिले. सर्वच कवींनी छान उत्तरे दिली. शाळेच्या एका ग्रूपने शिवरायांवर सुंदर पोवाडा सादर केला.
पसायदान होऊन कार्यक्रम संपला नि उत्तम प्रकारे माझे सीमोलंघन पार पडले. दोन वर्षानंतर जणू मी नव्या जगात नव्याने परत आले असे मला वाटले !
धन्यवाद …

– लेखन : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
