आज जागतिक वन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने प्रत्येक व्यक्तीने आदर्श घ्यावा, अनुकरण करावे असे वृक्षमित्र सूर्यकांत नरसु ठाकूर यांची ही प्रेरणादायी सत्यकथा……
अनेकांना वेगवेगळे छंद असतात तिवरे ता. कर्जत जि. रायगड येथील सूर्यकांत ठाकूर यांनी तिवरे गावाच्या परिसरात स्वखर्चाने शेकडो झाडे लावली व जगवली आहेत .
ठाकूर १९७३-७४ मध्ये इयत्ता पाचवीत होते. त्यावेळेस त्यांना “निसर्गवेडा तात्या” हा धडा होता. त्या तात्याला झाडे लाऊन जगवण्याची आवड होती. म्हणून त्याला “निसर्गवेडा तात्या” असे म्हणत असत. ठाकूर यांना हा धडा खुप आवडायचा. त्यांना खरी प्रेरणा त्याचवेळेस मिळाली. त्यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी घरच्या शेतीत लक्ष घातले. त्यांचा शेती हाच व्यवसाय होता.
ठाकूर यांनी २००७ साली पहिले झाड लावले. त्यानंतर सतत पंधरा वर्षें ते झाडे लावत आहेत. त्यांनी वड, पिंपळ, उंबर, चिंच, साग, जांबुळ, आंबा, पळस, आवळा, सीताफळ, गुलमोहोर, कडुलिंब, अशोक, बांबू इत्यादी प्रकारची झाडे लावली आहेत.
सूर्यकांत शेतीची कामे आटपल्यानंतर रोपं तयार करण्याचे काम करतात व जून महिन्यात झाडे लावण्यास सुरुवात करतात. रोपं स्वतः तयार करत असल्याने तो खर्च वाचतो. ज्या झाडांना संरक्षण देण्याची गरज आहे त्यांना ते काटेरी झाडे लावून जगवतात.
त्यांचा पंधरा वर्षात जो खर्च झाला तो स्वतः त्यांनी केला असून त्यांच्या कामात त्यांना त्यांच्या पत्नीचे सहकार्य लाभते. इतर कोणीही स्वतःहून सहकार्य करत नाही अथवा ठाकूरही ते मागत नाही. त्यांनी आजपर्यंत वन विभाग अथवा ग्रामपंचायतीकडे सुध्दा सहकार्याची अपेक्षा केली नाही. झाडे लावल्यामुळे त्यांना खुप समाधान वाटते.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तिवरे ग्रुप ग्राम पंचायतीने त्यांना सन्मान पत्र दिले आहे.
जिल्हाधिकारी, वन खाते, लोकप्रतिनिधी यांनी सुध्दा सूर्यकांत नरसु ठाकूर यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना सन्मानित केले तर त्यांना तर प्रोत्साहन मिळेलच परंतु ईतर अनेकजण वृक्ष लागवड व संगोपन मोहिमेत सहभागी होतील यात शंकाच नाही.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी.
कर्जत जि. रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

🌹nice 🌹
All the best