सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था अकोला आणि मराठी विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय महिला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नुकतेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ साहित्यनगरी स्व. भाऊसाहेब गोडबोले सभागृह शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला येथे करण्यात आले होते.
संमेलनाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शोभा रोकडे अमरावती, उद्घाटक डॉ. स्मिता निखिल दातार मुंबई , स्वागताध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनिता सुभाष मेटांगे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा डॉ. तारा हातवळणे कार्याध्यक्ष पदी लाभल्या होत्या.
उद्घाटन सोहळ्याला डॉ. कौमुदिनी बर्डे-क्षीरसागर, डॉ. मंदा नांदूरकर (अमरावती), सौ. सीमा शिवाजीराव शिंदे (सोलापूर), आणि डॉ. स्वप्ना लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“लेखणीचे सामर्थ्यच या देशाला संस्कृतीहिन होण्यापासून रोखू शकते. परखड आणि वास्तव लिहिण्याची ताकद साहित्यिकांच्या लेखणीत येणे ही काळाची गरज आहे.” असे संमेलनाध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाल्या.
“सामाजिक, मानसिक अंगाने आज माणूस उध्वस्त झाला आहे. हे उध्वस्तपण मांडण्याचेच नव्हे तर या उध्वस्तपणाला सावरण्याची ताकद देणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. स्रियांनी समकालीन वास्तवाचे भान ठेऊन निर्भयपणे लिहावे असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ शोभा रोकडे यांनी केले.

उद्घाटक डॉ स्मिता निखिल दातार म्हणाल्या,
“स्त्रीला गर्भाशय दिलय. तिला पुढची पिढी तिच्या उदरात वाढवण्याचा मान दिलाय. इतकी मोठी जबाबदारी जर स्त्रीला दिलीये तर ती दुबळी असून चालणारच नाही. स्त्रीचं जे रूप समाज माध्यमांवर दाखवलं जातंय त्याचं अंधानुकरण तरुण स्त्रिया करत आहेत, जे चूक आहे. हातात मद्याचा प्याला, तोंडात सिग्रेट, तंग कपडे घातले की पुरुषांवर मात केली का ? खरं तर पुरुषांनाही व्यसनापासून परावृत्त करणं स्त्री शक्तीचं काम आहे. करण, जे उत्तम ते आत्मसात करून आणि आचरणात आणून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे ही फक्त आपली शक्तीच करू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सौ. सुनिता सुभाष मेटांगे यांनी आपल्या भाषणात, महिलांची आर्थिक सक्षमता यावर विचार व्यक्त केले. “महिलांच्या सामाजिक शैक्षणिक प्रगती सोबत आर्थिक सक्षमता अतिशय महत्त्वाची आहे. बचत गट हे महिलांना आर्थिक सक्षम व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे नेण्याची अतिशय चांगली वाट आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी साहित्यिकांनी त्यांना लिखाणातून प्रेरित केले पाहिजे” असे मत व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि संमेलनाच्या कार्याध्यक्ष डॉ. तारा हातवळणे यांनी, “साहित्य संमेलनांमध्ये पुरुष साहित्य आणि त्यांच्या लिखाणाचा बोलबाला असतो त्यामुळे महिलांसाठी वेगळे विशेष साहित्य संमेलनाचे आयोजन ही महिला सक्षमीकरणाची सकारात्मक सुरुवात आहे” असे मत व्यक्त केले.
डॉ. मंदा नांदूरकर यांनी, “स्त्रियांनी एक तरी पुस्तकांचे कपाट जपायला हवे” असे वक्तव्य केले… तर स्त्रियांनी हात सशस्त्र करण्याअगोदर मेंदू सशक्त करणे काळाची गरज असल्याचे मत डॉ. स्वप्ना लांडे यांनी व्यक्त केले. “स्त्रियांनी संधीचे सोने करून स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली पाहिजे” असे मत सीमा शिवाजीराव शिंदे यांनी व्यक्त केले.

संमेलनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याला कौमुदिनी बर्डे-क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाचे प्रास्ताविक कु. सृष्टी संतोष इंगळे यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा. डिंपल मापारी आणि प्रा. राजकन्या खणखणे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यामध्ये शब्दसृष्टी संमेलन विशेषांक (अतिथी संपादक- डॉ. स्वाती पोटे, मूर्तीजापूर), मंगलम कविता संग्रह (कवयित्री ऍड. मंगलाताई नागरे) चे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
◆ परिसंवाद
ऍड. रजनी बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली “मुलीचे लग्नाचे वय २१ योग्य की अयोग्य” या विषयावर परिसंवाद झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मुलींचे शारीरिक आणि वैद्यकीय दृष्ट्या १८ वर्षे लग्नाचे वय योग्य असल्याचे मत व्यक्त केले. परिसंवादामध्ये विषयाच्या दोन्ही बाजू तात्विक मुद्द्यांच्या आधारे वक्त्यांनी पडताळल्या. आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ त्यांनी विविध वास्तविक उदाहरणांचा आधार घेतला. मुलींनी स्टेटस, मेकअप यामध्ये अडकून न राहता आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असे मत
ऍड. विशाखा बोरकर व्यक्त करून मुलीचे लग्नाचे वय २१ होत असेल तर त्याचे आपण स्वागत केले पाहिजे असे प्रतिपादन केले. बोरकर यांच्या मनोगतातून शहरी स्त्रियांची बाजू मांडल्या गेली तर ज्योती धंदर यांनी मुलीचे लग्नाचे वय एकवीस केल्यापेक्षा विशेषता ग्रामीण भागातील मुलींना सक्षम कसे करता येईल याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या देशाची सामाजिक रचना लक्षात घेता १८ हेच महिलांसाठी लग्नाचे योग्य वय आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले. तर आम्रपाली गोपनारायण यांनी स्त्रियांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या सत्राचे सूत्रसंचालन लता बहाकर यांनी केले
◆ गझल मुशायरा
ज्येष्ठ गझलकार देवका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा संपन्न झाला. अध्यक्षीय मनोगतात देवकर देशमुख यांनी गझल एक साधना आहे, साधनेशिवाय गझल होऊ शकत नाही. उत्तम गझल लिहली जाण्यासाठी गझल कार्यशाळांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. मुशायऱ्यात धनश्री पाटील, चित्रा कहाते, मीना सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती या सत्राचे संचालन निशा डांगे आणि प्रियंका गिरी यांनी केले. स्वाती पोटे सुनीता इंगळे ,रोहिणी पांडे, निर्मला सोनी, दिपाली सुशांत, उज्वला इंगळे ,अनुराधा दाणी, अश्विनी बोंडे, काव्या शिरभाते आणि अलका देशमुख या राज्यभरातील महिला गझलकारांनी दमदार सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
जखमांवर मी किंचित फुंकर मारत गेले
संसाराला कौशल्याने फुलवत गेले
-दिपाली सुशांत
झोपले आहेत जे घेऊन सोंगे
जाग त्यांना आणण्याची जिद्द माझी
-निर्मला सोनी
मिठीचा तुझ्या हा उबारा हवासा
मला मोरपंखी पिसारा हवासा
-डॉ मीना सोसे
उभे आयुष्य फुलले हे तुझ्या प्रेमात पडल्याने
मनाचा मोगरा झाला तुझ्या अलवार स्पर्शाने
-लिना साकरकर
अशा दमदार शेरांनी मुशायऱ्याची रंगत वाढवली होती.
◆ कवी संमेलन
कवी संमेलन सत्राचे अध्यक्षस्थान विजया मारोतकर यांनी भूषवले. कवयित्री असो वा कवी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. कविता केवळ साधन नसून परिवर्तनाचे माध्यम आहे. शब्दांचे सामर्थ्य जाणून लिहलं पाहिजे. असे मत विजया मारोतकर यांनी व्यक्त केले.
कवी संमेलन सत्राला मीराताई ठाकरे , मधुराणी बनसोड , नेहा भांडारकर , कविता राठोड , वनिता गावंडे आणि संघमित्रा खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन वृषाली देवकर आणि राधिका देशपांडे यांनी केले. कवी संमेलनामध्ये प्रांजली काळबेंडे, साधना काळपांडे, प्रा. वर्षा कावरे, प्राची मोहोड, प्रियंका वाडेकर, श्रावणी टेकाडे, योगिता वानखडे, विमल सरोदे, उमा गवई, सीमा भगत, रीना दुधे, अनिता देशमुख , मीना नानवटकर सविता काळे, भारती सावंत, अलका माईनकर, रजनी चौखंडे , वंदना साळवे आणि नयना देशमुख यांचा समावेश होता. कवी संमेलनाच्या माध्यमातून स्त्री जाणिवांवर आधारित तसेच जगण्यास बळ देणाऱ्या कवितांचे सादरीकरण झाले. कवितांचे विषय जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारे होते.
◆ मातृशक्तीचा गौरव आणि सत्कार समारंभ
महिला साहित्य संमेलनादरम्यान डॉ. निलिमा लखाडे (सरप)- राजमाता जिजाऊ पुरस्कार, डॉ. स्वप्ना लांडे-सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार, अंशुला अशोकराव सरोदे-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, देवकाताई देशमुख-इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार, मीराताई ठाकरे – बहिणाबाई चौधरी काव्यगौरव पुरस्कार, शीलाताई राजपुत -सुषमा स्वराज नारीरत्न पुरस्कार, सुमित्राताई काशिनाथ वानखडे- रमाई जीवन गौरव पुरस्कार, नयनाताई पोहेकर-स्व. उषाताई घुगे समाजकार्य पुरस्कार, ज्योतीताई देशमुख- वीरस्त्री लताताई देशमुख ‘स्वामिनी पुरस्कार आणि विद्याताई राणे -मदर टेरेसा समाजकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नेहा चक्रधर राऊत संध्या संजय शिंदे अवंती अरविंद शिंगाडे भाग्यश्री संतोष इंगळे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
◆ समारोप
संमेलनाचा समारोप डॉ. सूचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. समाजामध्ये अनेक प्रतिभावंत साहित्यिक आहेत अशा साहित्यिकांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या महिला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक नव प्रतिभावंतमहिला साहित्यिक पुढे आलेल्या आहेत यासाठी आयोजकांचे अभिनंदन केले पाहिजे. एकंदर महिला साहित्य संमेलन हे महिलांचा सन्मान वाढवणारे ठरले असे मत डॉ. सूचिता पाटेकर यांनी व्यक्त केले. समारोपीय सत्राला प्रा. शोभाताई रोकडे संमेलनाध्यक्ष, डॉ. स्मिता दातार, प्रा. डॉ. अनघा सोनखासकर (अकोट), रसिका रमेश वाजगे (मुख्याध्यापक मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय), विद्या बनाकर ( सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार प्राप्त) आणि सौ. दिपाली किशोर बळी (शिक्षिका) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन मीना कवडे यांनी केले.
◆ अभिजात मराठी चळवळ
महिला साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांना पत्राद्वारे विनंती करण्यासाठी विशेष जागर करण्यात आला. सविता काळे यांनी डॉ. शिवाजी नागरे आणि निलेश कवडे यांच्या सहकार्याने संमेलनामध्ये उपस्थित सर्वांनी छापील पत्रावर स्वाक्षरी करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठिंबा दिला.
◆ महिला साहित्य संमेलनासाठी पुरुषांचा पुढाकार :
साहित्य संमेलनाला पूर्णवेळ रसिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. संमेलनाची एकंदर व्यवस्था आणि आयोजन दर्जेदार असल्यामुळे संमेलन उंचीचे झाले. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिस्तबद्ध आणि दर्जेदार आयोजनाचे कौतुक केले. साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी डॉ. प्रा. शिवाजी नागरे (मराठी विभाग प्रमुख), प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे, संतोष इंगळे (अध्यक्ष, सृष्टि बहुद्देशिय युवा संस्था), निलेश कवडे (उपाध्यक्ष अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंच) संमेलन मुख्य आयोजन समितीचे सदस्य पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई) प्रा. सदाशिव शेळके (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल) डॉ. मनोहर घुगे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) या पुरुष मंडळींनी पुढाकार घेतला.
– लेखन : निलेश कवडे. अकोला
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूपच छान उपक्रम
🌹🌹🌹🌹