गध्देपंचविशी, ‘स्वभाव-विभाव’ ही डॉ. आनंद नाडकर्णी यांची दोन पुस्तके आणि मासिकांतील त्यांचे ललित लेख आतापर्यंत वाचले अन् बरोबर एक वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेले ‘आकाश भाषिते’ हे पुस्तक मला मिळाले आणि मी ते समग्र वाचून काढले.
डॉ. आनंद नाडकर्णी हे गेली चार दशके मानसिक आरोग्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्याबरोबरच साहित्य, कला, नाटक, चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या मुशाफिरीमुळे ते सर्वांना ‘आपले’ वाटू लागले आहेत.
या ‘आकाश भाषिते’ पुस्तकात त्यांच्या खेळकर आठवणी आहेत. आरस्पानी व्यक्तीचित्रे आहेत, प्रवासवर्णने आहेत. जीवनशैली विषयक प्रश्नांवरचे चिंतन आहे. इतकेच नव्हे तर ते उत्कृष्ट रेखाचित्रकार आहेत.
या पुस्तकात ‘रेषामैत्री’ मधून जन्म घेतलेली रेखा चित्रे देखील आहेत. त्यांच्या लेखणीतून उतरलेले ही ‘आकाश भाषिते’ आहे. त्यांच्या अष्टावधानी ज्ञानवृत्तीची सहज ओळख या पुस्तकामुळे निश्चितच होऊन जाते.
“दुबई : ओअँसिस की म्रुगजळ ? “या लेखात शेवट करतांना डॉ. नाडकर्णी यांनी या पर्यटन प्रवासावर जे चिंतन केले आहे ते फार मनोज्ञ आहे. तो लेख समग्र वाचलाच पाहिजे.
‘कसा, कुठे शोधावा… आनंदाचा ठेवा’ या लेखात भुतान प्रमाणे ‘हॅपिनेसवर काही प्रोजेक्ट करायचे आहेत असे एका सरकारी अधिकाऱ्याने डॉक्टरांना सांगितले. त्यानुसार सर्व तयारीनिशी संपूर्ण आराखडा अगदी पॉवरपाँइटपर्यंत बरेच परिश्रम ओतून केला. त्या प्रोजेक्टचा बर्यापैकी काळ लोटल्यावर शेवट कसा झाला हे रंजकपणे लिहिले आहे.
‘पैसा आणि मानसिकता’, ‘मातीचा कस आणि पिकाचे वाण’ निराधार आभाळाचे घर’ ! हे लेख डॉ. नाडकर्णींच्या ललित लेखन कौशल्याची साक्ष देतात.
तसे या पुस्तकात एकूण २६ लेख आहेत. विनोबाजी, गोनिदा, इंदुआजी ही व्यक्ती चित्रे उत्तम आहेत. अध्यात्मिक गुरू शोधाची मार्गदर्शक तत्वे या लेखाच्या कच्च्या खर्डाची भट्टी छान जमली आहे. आपण सारी माणसं, बुध्दीने आणि अनुभवाने कमीजास्त कशीही असली तरी ‘गोंधळून जाण्याचा’ आणि संभ्रमात पडण्याचा’ हक्क सर्वांसाठी आहे अशी सुरवात करुन मनोविकार तज्ञ असलेले डॉक्टरांनी उपयुक्त सल्ला गंभीरपणे दिला आहे.
सर्वात महत्वाचा म्हणता येईल असे ‘माझी रेषा मैत्री आणि ‘स्केचिंगः रेखाटने कागदावरची आणि मनातील’
हे दोन लेख त्यांची रेषाचित्र कला कौशल्य सार्थकतेची
प्रसन्नता घडवितात. त्यापैकी त्यांनी काढलेली काही रेषा चित्रें या लेखाच्या अनुषंगाने देत आहे..
‘आकाश भाषिते’ हे पुस्तक जीवनशैलीच्या चिंतनामुळे वाचनीय, अनुकरणीय व संग्राह्य झाले आहेत. ते जीवन जगण्याची उत्तम ‘शिदोरी’आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

– लेखन : सुधाकर तोरणे
निवृत्त संचालक. माहिती व जनसंपर्क. नाशिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800