Wednesday, September 17, 2025
Homeबातम्यापत्रकारिता आणि साहित्याने सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन दिला - सुधीर गाडगीळ

पत्रकारिता आणि साहित्याने सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन दिला – सुधीर गाडगीळ

लेखन – भाषा हे संवादाचे माध्यम आहे. लेखन करत असताना भाषेचं सामर्थ्य, सौंदर्य, शब्दांचा वापर याचं भान साहित्य प्रेमानं दिलं तर समाज, जीवन, माणूस यांकडे पहाण्याची समज पत्रकारितेने दिली. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात एकत्र नांदल्याने सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन आपल्यात निर्माण झाला, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व फलटण शाखा यांच्यावतीने श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने, फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात 27 व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, भारत सासणे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून सुधीर गाडगीळ बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सौ.सुनिताराजे पवार, सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, मसाप पत्रिका संपादक पुरुषोत्तम काळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी तानसेन जगताप, विश्‍वस्त प्रमोद आडकर संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके) आदींची उपस्थिती होती.

सुधीर गाडगीळ पुढे म्हणाले, समाजाची साहित्यिक अभिरुची वाढवण्यात, साहित्य आणि साहित्यिक यांच्या प्रसारात वृत्तपत्रांचं मोठं योगदान आहे. वृत्तपत्रांचे हे योगदान लक्षात घेऊनच आपण पत्रकारितेत काम करु लागलो. घटना – व्यक्ती याबाबत सतर्क बनत गेलो आणि पुढे स्तंभलेखन करत पुस्तक लेखनाच्या क्षेत्रात आलो असे सांगून, सुधारणावादी, पुरोगामी विचारांचे अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व सहज वाणीतून अवघे मराठी मन जिंकलेल्या कै.प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या फलटणमध्ये पार पडत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संयोजकांना गाडगीळ यांनी धन्यवाद देत पत्रकारिता, मुलाखतकार व साहित्य क्षेत्रातील आपला जीवन प्रवास विषद करुन, संमेलन उद्घाटक भारत सासणे यांनी, आज शब्दांच्या अभिव्यक्तीसाठी योग्य वातावरण आहे की नाही ? असा प्रश्‍न पडत आहे. अभिव्यक्तीवर कुणाचा तरी पहारा आहे, यातून स्वातंत्र्य संकुचित होत आहे. लेखकांनी यावर चिंतन करुन स्पष्टपणे बोलावे अशी आपली भूमिका आहे, असे सांगितले.

प्रा.मिलींद जोशी यांनी, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या परिसस्पर्शामुळे फलटणशी आपली नाते जुळले असल्याचे सांगून फलटणला आगामी काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी प्रसिद्ध पटकथा लेखक प्रताप गंगावणे यांना यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्काराने तर महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने भारत सासणे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना फलटणच्या पावन व ऐतिहासिक भूमित समृद्ध व्यासपीठावर होत असलेला सन्मान आपल्यासाठी खूप मोठा आहे असे प्रताप गंगावणे यांनी सांगितले तर आपल्याला मिळालेला पुरस्कार कामाला धर्म मानणार्‍या आपल्या मातोश्रींना आपण सपर्मित करत असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी शेतकरी संस्कृतीचे प्रतिक असलेल्या बैलगाडीतून प्रमुख पाहुण्यांचे संमेलनस्थळी आगमन झाले. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रतिमा पुजनाने संमेलनाचा शुभारंभ झाला. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘साहित्य जागर’ स्मरणिकेचे प्रकाशन सौ.सुनिताराजे पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रविंद्र बेडकिहाळ यांनी संमेलनाची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. मसाप फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी प्रास्ताविक तर शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ.हेमलता गुंजवटे यांनी केले. कार्यक्रमास साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, फलटणकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं