प्राचार्य राम शेवाळकर यांचे निरूपण व गझलसम्राट सुरेश भट (दादा) यांचे गझल सादरीकरण असा एक कार्यक्रम नागपूरातील धरमपेठ कन्या विद्यालयाच्या ग्राऊंडवर मी प्रत्यक्ष अनुभवला आणि कार्यक्रमानंतर दादांनी माझा शेवाळकर सरांच्या बरोबर परिचय करून दिला.
दादांनी माझ्या कवितांच्या कार्यक्रमांबद्दल सांगताच शेवाळकर सर मला म्हणाले, “विसुभाऊ, एकदा वेळ काढून आमच्या वणीला सुद्धा या. आमचे वणी रसिकांचे गाव आहे. त्यांच्यासाठी आपण तुमचे दोन्ही कार्यक्रम आयोजित करूया.”
सरांच्या सांगण्यानुसार मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तालुक्याच्या गावी पोहोचलो. लो. टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य होते राम शेवाळकर.! त्यांना भेटायला मी महाविद्यालयात गेलो आणि सरांनी माझे स्वागत केले. सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला. सर्वांनीच दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लो. टिळक महाविद्यालयातील तो प्रयोग तूफान रंगला, परिणामी शेवाळकर सर माझ्या एकपात्रीवर बेहद्द खूष झाले.
तिथेच प्रा.पुंड, प्रा.दिलीप अलोणे व सरांचे स्नेही श्री. ना.म.सरपटवार यांच्याशी माझा चांगला परिचय झाला. या सर्वांच्या सहकार्याने शेवाळकर सरांनी माझ्या एकपात्रीचा एक प्रयोग वणी शहरातील रसिकांसाठी शेवाळकर सदन जवळील जैताई मंदिराच्या प्रांगणात आयोजित केला होता. विशेष म्हणजे वणीच्या सर्वच विद्यालयातील शिक्षक त्या प्रयोगासाठी आले होते. तो प्रयोग यशस्वी झाला तेंव्हा शेवाळकर सरांनी सर्व शिक्षकांना ‘ओंकार काव्य दर्शन’ या माझ्या शालेय कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि त्यांच्या विद्यालयात माझा शालेय कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहनही केले.
प्रा.अलोणे आणि सरपटवार सर यांच्या सहकार्याने वणी शहरातील शाळा शाळांतून माझे शालेय कार्यक्रम मी सादर केले. सर्वांनी थोडे फार मानधनही मला दिले.
वणी जवळील मुकुटबन हे गाव व त्याचा सर्व परिसर आदिवासी परिसर म्हणून ओळखला जात होता. मुकुटबनच्या शाळेत आणि जवळच्या तीन आदिवासी आश्रम शाळांमध्ये मी माझे शालेय कार्यक्रम विनामूल्य सादर केले. वणी एसटी स्टँड समोरच्या एका लॉजवर मी मुक्काम ठोकला होता.
दरम्यान एका सायंकाळी सरपटवार सरांच्या घरी एक कवी गोष्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता. परिसरातील बरेच चांगले कवी आणि रसिक त्या कवी गोष्टींना हजर होते.
सरपटवार सरांप्रमाणे कृष्णा लाडसे, गौतम सुत्रावे, दिलीप अलोणे या कवींच्या कविता त्यांच्या हस्ताक्षरात मी माझ्याकडे संकलित केल्या. अलोणे सर चांगले शेतकरी आहेत. फक्त सेंद्रीय खतांचाच वापर करून ते उत्कृष्ठ पिके घेतात. भरपूर शेंगांनी लगडलेले तुरीचे पीक पाहण्यासाठी आम्ही एक दिवस अलोणे सरांच्या शेतावरही गेलो होतो. तुरीच्या शेंगांची हुर्डापार्टी चालू असताना दिलीप अलोणेंनी नकला सादर करून स्वतः चांगले नकलाकार असल्याचे दाखवून दिले होते.
वणीतील कार्यक्रम झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, पांढरकवडा, आणि महाराष्ट्र आंध्र प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या पाटण या गावांमध्ये सुद्धा माझे दोन्ही कार्यक्रम मी त्यावेळी सादर केले होते.
पाटण नंतर आंध्र प्रदेशातील आदिलाबाद हे पहिले मोठे गाव येतें. तेथील बहुसंख्य लोक मराठीच असल्याने आदिलाबादच्या कात्यायनी देवी मंदिराच्या सभागृहातही माझा एकपात्री कार्यक्रम मी त्यावेळी सादर केला होता. मंदिराचे पुजारी श्री. जोशी गुरुजींनी तो प्रयोग आयोजित केला होता. जोशी गुरुजींचे मोठे कुटुंब, एकत्र कुटुंब होते.
त्याचे वैशिष्ट्य म्हणजे पेटी, तबला, ढोलकी, संबळ-डुंबळ वाजवणाराऱ्यां पासून अभिनय करणाऱ्यांपर्यंत सर्वच कलाकार त्यांच्या कुटुंबात होते. त्यामुळे हे जोशी कुटुंबीय दरवर्षी एक नवीन दर्जेदार वगनाट्य तयार करायचे. त्यांच्या वगनाट्याला विदर्भातील गावागावात प्रचंड मागणी होती आणि तो त्यांचा वगनाट्याचा प्रयोग ते फारच चांगला सादर करायचे. कलाकाराच्या कलेची प्रचंड जाण असल्यामुळेच त्यांनी माझा एकपात्री प्रयोग आदिलाबाद शहरातील मराठी रसिकांसाठी आयोजित केला होता.

– लेखन : विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800