Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्य"ओठावरलं गाणं"

“ओठावरलं गाणं”

नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन भरभरून स्वागत ! ज्येष्ठ कवी मधुकर जोशी यांचं एक गाणं रेडिओमुळे आपल्या कानावर येत राहिलं आणि तेच गाणं आपल्या ह्रदयात सहजपणे जाऊन पोचलं, त्या सुंदर गाण्याचे शब्द आहेत –

“अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती”

खरं तर शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असणारी ही गोष्ट. मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये बरोबर आणलेल्या लूटीबरोबर कल्याणच्या सुभेदाराची ही रूपवान सून लुटीचा एक भाग म्हणून महाराजांसमोर पेश करण्यात आल्यानंतर तिला पाहून शिवाजीराजांनी हे उद् गार काढले. परस्त्री कडे पहाण्याची नजर जणूकाही शिवाजी महाराजांनी त्यांच्या रयतेला दिली स्त्री देहाची राजरोसपणे विटंबना करणाऱ्या यवनांच्या डोळ्यात या शब्दांनी झणझणीत अंजन तर घातलंच पण परस्त्री ही मातेसमान आहे हा आदर्श वस्तुपाठ शिवाजी महाराजांनी स्वत:च्या वागणुकीतून घालून दिला आणि त्या काळात मराठी राज्यात स्त्रियांच्या अब्रूला जराही धक्का लागणार नाही याची ग्वाही स्वतः च्या वर्तणूकीतून दिली. (आज मात्र दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या या शिकवणुकीचा आम्हाला विसर पडला आहे.)

शिवरायांच्या दरबारी त्या, युवती मोहक ती
सुभेदाराची सून लाडकी, भयकंपित होती
शब्द ऐकता चकित झाली, हरीणीसम ती रती

मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटला आणि त्या खजिन्यातील लुटीचा एक भाग म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला महाराजांसमोर उभं करण्यात आलं. आता आपलं काय होणार, किती वेळा आपल्या शरीरावर अत्याचार होणार या भीतीपोटी ती रमणी खूप घाबरली होती. घाबरल्यामुळे तिची फुलासारखी कोमल आणि नाजूक काया थरथरत होती. कानात प्राण आणून ती महाराजांच्या आदेशाची वाट बघत थरथर कापत उभी होती. पण महाराजांचे शब्द ऐकताच भरून आलेलं आभाळ अचानक स्वच्छ निरभ्र व्हावं तसं तिच्या मनावरचं मळभ दूर झालं.

वसंतातले यौवन होते नयनी मादकता
रम्य अलौकिक मनमोहक ती कोमल बाहुलता
सौंदर्याची प्रतिमा परी ती प्रभू माता मानिती

या सूनेच्या सौंदर्याचं वर्णन करताना कवि मधुकर जोशी यांनी अतिशय चपखल शब्द योजना केली आहे जी कुठेही अश्लीलतेकडे झुकणार नाही तरीही तिचं सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. वसंत ऋतूमध्ये सृष्टी जशी फुलाफळांनी बहरली की मोहक दिसते तोच मोहकपणा या सुंदरीच्या कोमल तनूवर दिसत होता. मासोळीच्या आकाराच्या तिच्या डोळ्यातली मादकता कोणत्याही पुरुषाला घायाळ करायला पुरेशी होती. सौंदर्याचा एक अस्सल नमुना शिवाजी महाराजांना मावळ्यांनी सादर केला होता. अशा या सौंदर्याच्या पुतळीकडे पाहून शिवाजी महाराज म्हणत होते माझी आई जर इतकी सुंदर असती तर मी ही तितकाच सुंदर झालो असतो…… धन्य तो शिवकल्याण राजा !

अलंकार ते वस्त्रभूषणे देऊन मानाने
परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने
रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती

शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेची खणानारळाने ओटी भरून तिचा यथोचित सत्कार केला. निरनिराळी आभूषणं आणि साडी चोळी देऊन सन्मानाने तिला तिच्या सासरी सुखरूप पाठवलं आणि मगच राजे निश्चिंत झाले. रायगडाच्या पत्थरांमधून अजूनही राजांचे हे बोल ऐकू येतात जे आजही या प्रसंगाची गाथा अभिमानाने गातात.

गायक आणि संगीतकार दशरथ पुजारी यांच्या मार्दवपूर्ण आवाजात शिवस्तुतीचं हे गीत ऐकताना आपली छाती नकळतपणे अभिमानाने फुगते.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. विकास खरोखर वाचताना मन भरून आणि धन्य झाल्या सारखे वाटले. असे महाराज पुन: होणे नाही

  2. मधूकर जोशी यांच्या लेखणीतून उतरलेल्या गाण्यापैकी हे एक सुरेख गाणं आपण रसग्रहणासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद. सुंदर शब्द व दशरथ पुजारी यांनी संगीत देऊन स्वतः त्यांच्या सुरेल आवाजात गाऊन हे गीत अजरामर केले. हे गीत मधुकर जोशी यांच्या गीतशिवायन मधील आहे असे मला स्मरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments