Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यक्रांतिकारकांच्या कथा (१)

क्रांतिकारकांच्या कथा (१)

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचे अत्यन्त महत्वाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण आजच्या शहीद दिनाचे औचित्य साधून इतिहासाच्या अभ्यासक, लेखिका स्मिता भागवत लिहिणार असलेली “क्रांतिकारकांच्या कथा” ही लेखमाला दर बुधवारी प्रसिद्ध करणार आहोत.

आजच्या पहिल्या भागात वाचू या, लेखमालेची पूर्वपीठिका….

इतिहासाचे विस्मरण घडते तेव्हा वर्तमान खुजा होतो ! तरुणाईचा चहु अंगाने विकास होण्यासाठी मुळांना खोलवर फैलावण्याची संधी मिळावी लागते असे माझे स्वातंत्र्यसेनानी वडील म्हणत. माझी आईही स्वातंत्र्य सेनानी होती. म्हणून मी दिड महिन्याची असताना, सरदार पटेलांचा आशीर्वाद आणि डोक्यावरून हात फिरण्याचे सौभाग्य मला लाभले. नंतर काही दिवसांनी आईस अटक झाली. तिच्या अंगावर असलेली मीही तुरुंगात गेले, तेव्हा सरदार सर्वात छोटी स्वातंत्र्य सेनानी विजया कप्तान असे म्हणाले होते, हे ऐकत मी मोठी झाले. स्वाभाविकच जन्मदात्यांचे विचार आणि महानुभावांविषयी प्रेमादर मला रक्तात नि बाळकडूत मिळाला! सरदार पटेलांचा उजवा हात असलेले गोविंदराव भागवत माझ्या वडीलांचे गुरू! त्यामुळे त्यांनाही दिग्गजांचा सहवास लाभला. तरी ते व्यक्तीपूजक नव्हते. प्रसंगी त्यांचा महात्माजींशी मतभेद होई. तरी माझ्या वडिलांच्या लेखातील तटस्थ तौलनिक विचार सर्वांना पटत. स्वातंत्र्य मिळाल्यावर राजकारण ‘खेळण्यात’ स्वारस्य नसल्याने ते नेमस्तपणे संसाराला लागले. त्यांनी आम्हाला लेखन-वाचनाची सवय लावली. रसाळ भाषेत कथन करण्याची त्यांना आवड होती नि हातोटीही! त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामाच्या खऱ्या कथा ऐकण्याचे आम्हाला भाग्य लाभले.

‘वाचाल तर वाचाल’ हे आता लोकप्रिय झालेले पण सयाजीराव महाराजांनी जन्माला घातलेले बोधवाक्य ऐकत नि शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेल्या विविध वाचनालयाचा लाभ घेत आम्ही मोठे झालो ! अनेक भाषातील दिग्गजांची पुस्तके आम्ही संस्कारक्षम वयात वाचली. माझे वडील वारंवार एक श्लोक म्हणत…

‘इदं अंधम् तम: कृत्स्नं जयते भुवनत्रयम् ।
यदी शब्दाह्याम ज्योति: आसंसारं न दीप्यते ।।

समस्त जगतात शब्द नावाची ज्योती प्रगटली नाही तर त्रिभुवनात गाढ अंधार दाटेल, हा विचार बालवयात रूजल्याने आम्ही बालपणीच शब्दब्रह्मावर प्रेम करू लागलो. सर्व गुणीजनांचा आदर करण्यास शिकलो. तरी मराठी-गुजराती देशभक्त ठाऊक होते, त्या तुलनेत इतरांची माहिती कमी होती. पुढे बदलीची नोकरी करणाऱ्या नवऱ्याच्या बदलीमुळे दिल्लीस वास्तव्य घडले.

दिल्लीचे वास्तव्य मला अनमोल खजिन्यापुढची ‘तिळा उघड’ असा घाट वाटला! रोमांचक माहितीचे दरवाजे उघडल्याने सशस्त्र क्रांतीचा अनुरोध करणाऱ्या वीरांच्या कार्याच्या कथा-व्यथा कळल्या. इतिहासात नोंद असलेल्या नि ‘नाही चिरा नाही पणती,’ अशा अवस्थेतील वीरांचा सहवास लाभलेल्या, वृद्धांच्या भेटी घेता आल्या. त्यांच्याकडून आगळ्या वीरकथा ऐकण्याचा अनुभव खरोखर अनमोल ! हे अनुभव कधी रोमहर्षक, कधी दु:खद, कधी बोचरे वा प्रसंगी दाहकही!

क्रांतिवीरांनी देशभक्तीचे ना मोल मागितले की निवडणूक ‘लढवून’ मानाचे पद बळकावले! तुरुंगातून सुटलेल्या क्रांतिवीरांना स्वतंत्र भारतात पोटाची खळगी भरण्यास पारावार कष्ट करावे लागले. तरी प्रसंगी भेटी घडत तेव्हा त्यांच्या मुखी स्वातंत्र्यपूर्व काळातील स्मृती असत. मी गप्पिष्ट! दिल्लीच्या वास्तव्यात संबंधित वृद्धांकडून त्यांचा हा स्मृतीगंध (नॉस्टॅल्जिया) नि विविध वीरांच्या हाल-अपेष्टा ऐकताना हळवी झाले. त्यांचे रोमहर्षक पराक्रम ऐकताना देहावर काटाही फुलला. मनात अकळ चुटपूट दाटली !

अत्यंत लहान वयात भगतसिंगने जगातील सर्व प्रकारच्या सशस्त्र क्रांतींचा अभ्यास केला होता. गुरुदेव टागोर यांच्या परिसस्पर्शाने बंकिमचंद्र लिखित ‘वंदे मातरम्’ या काव्यास स्वातंत्र्य सूक्ताचे महात्म्य प्रदान केले. ग्लानीत हरवलेला देश खडबडून जागा झाला. समस्त हिंदी प्रजा ‘वंदे मातरम्’ उच्चारून कारावास निमंत्रित करू लागली. त्यात भगतसिंगने भर घातली. तो वंदे मातरम् म्हणत मातृभूमीस वंदन करत होताच; त्याबरोबर ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्ली असेंब्लीत बाँब फेकताना त्याने सिंहगर्जना केली “इन्किलाब ज़िदाबाद!” “मातृभूमीस वंदन करून मी क्रांती चिरायू होवो असा जयजयकार करतो.” वंदे मातरम् प्रमाणे ‘इन्किलाब ज़िंदाबाद’ हा मंत्र हिंदी प्रजेने तितक्याच सन्मानाने स्वीकारला.

आर्थिक इतिहास नावाची इतिहासाची शाखा आहे. त्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भातील शोधनिबंधात प्राध्यापक निऑल फर्ग्युसन लिहितात, ‘हिंदुस्थानास अहिंसा आंदोलनाने स्वातंत्र्य मिळवून दिले असे म्हणणे चुकीचे आहे. दुसऱ्या विश्वयुद्धाने इंग्रजांवर पारावार कर्ज लादले नसते तर आजही हिंदुस्थान ब्रिटिशांचा गुलाम असता. हिंदुस्थानची प्रजा विदेशी आक्रमकांपुढे सहज हात टेकते, याचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. सशस्त्र वीरांचे प्रयत्न इंग्रज हाणून पाडत असले तरी क्रांतीवीर त्यांची डोकेदुखी बनले होते. अहिंसेचा अनुरोध करणारे विनाविरोध धरपकड स्वीकारत असल्याने राज्यकर्त्यांना त्यांचा त्रास नव्हता! तरी असहकार आंदोलनामुळे देश स्वतंत्र झाला, असे समजणे हास्यास्पद आहे !’

दुसऱ्या विश्वयुद्धात इंग्रजांना अमेरिकेचे ४० अब्ज डॉलर्स कर्ज झाले. त्याना हिंदुस्थानवर राज्य करणे जमेना तरी देशास स्वातंत्र्य देणे त्यांना पसंत नव्हते. १९४५ साली त्यांनी कर्जापोटी हिंदुस्थान अमेरिकेस देण्याचा विचार मांडला. स्वातंत्र्याचा अनुरोध करणाऱ्या अमेरिकेस कुणास गुलाम करणे पटले नाही. तरी १९४७ साल उजाडेतो इंग्रज अमेरिकेस गुलाम राष्ट्रास कसे वागवावे याचा वस्तुपाठ देत होते. म्हणून तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट कडाडले, ‘अमेरिकन विचारप्रणालीत स्वातंत्र्य अग्रभागी आहे. आम्ही कुणाला गुलाम राष्ट्र बनवणे केवळ अशक्य आहे !’ म्हणून रुझवेल्टमुळे देश स्वतंत्र झाला, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. त्यांच्या ठामपणामुळे इंग्रजांना हिंदुस्थानास स्वातंत्र्य देणे भाग पडले. तरी ते मॅनर्स आणि एटिकेट्सचं स्तोम माजवणारे! त्यांनी अहिंसा आंदोलनापुढे हात टेकत असल्याचा आव आणला. देशाची फाळणी करून हिंदुस्थानात अखंड जळती काडी टाकण्याचा क्रूरपणा केला ते वेगळेच !’

स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत-पाकिस्तान या देशात सतत होणाऱ्या चकमकी, विचारात घेता, अहिंसा आंदोलनाचे अपयश आणि प्राध्यापक निऑल यांचे मत योग्य असल्याचा पुरावा ठरतात. यात महात्माजींना कमी लेखण्याचा अजिबात उद्देश नाही. मातृभूमीस पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा त्यांचा अथक प्रयत्न नि निष्ठा अजोड ! पण क्रांतिवीरांची देशभक्ती अजोड असून त्यांनी त्यास विकृती ठरवले. गांधी-सरदार मतभेद जगजाहीर ! तरी गुजरात दोघांचे महत्व स्वीकारते! गुजरात आपपरभाव टाळून सर्व गुणीजनांची कदर करणारे राज्य ! तरी त्यांनाही सशस्त्र उठावात सर्वनाश ओढवून घेणारे भगवती भाई व त्यांची पत्नी दुर्गादेवी यांचे विस्मरण झाले. भगवतीभाई ‘फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब’ या पुस्तकाचे लेखक! देशास पारतंत्र्याच्या बेडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात हौतात्म्य पत्करलेले! त्यांची पत्नी दुर्गादेवी देशासाठी भगतसिंगच्या पत्नीची भूमिका करण्याचे दु:साहस करू शकणारी धाडसी स्त्री ! तरी या दांपत्याची कदर करण्यात कदरदान गुजरात राज्य कमी पडले. आपल्या पिढीकडून घडलेल्या या अपराधाचे पुढच्या पिढीने क्षालन करावे, असे मला सतत वाटत होते. म्हणून….

भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवी वर्ष संपन्न होत असताना त्यात आपले अर्घ्य असावे या विचाराने भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी झाली त्या शहीद दिनाच्या निमित्ताने मी दर आठवड्यास एक लेख लिहून क्रांतीवीरांच्या अंधारातील माहितीवरील पडदा उचलण्याचा प्रयास करणार आहे. शुभम् भवतु.

स्मिता भागवत

– लेखन : स्मिता भागवत. कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. फार सुंदर व माहितीपूर्ण लेख स्मिताताई. देशप्रेम तुमच्या प्रत्येक शब्दात उमटलेले दिसून येते. 🙏🙏🙏

  2. मनापासून धन्यवाद, स्मिताताई…! मुद्देसूद मांडणी आणि अमोघ युक्तिवाद..!
    .. प्रशांत थोरात
    9921447007

  3. स्मिता भागवत यांचा अतिशय सुंदर लेख.
    एका प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण..जे पिढ्यानुपिढ्या आवश्यकच आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments