कुणाला गणिती उकल वाटते मी
कुणाला कवाफी गझल वाटते मी
युगे लोटली वाट सरता सरेंना
तरीही मजल दरमजल गाठते मी
कधी द्रौपदी लाडकी ? पांडवांची
सीता आज्ञाधारी मी रघूनंदनाची
पहा कौंतयाला जळी लोटते मी
तरीही मजल दरमजल गाठते मी
मनी आस घ्यावी आकाशी भरारी
परि बद्ध पंखास कैसी उभारी ?
जरी अंतरी मानिनी कोंडते मी
तरीही मजल दरमजल गाठते मी
म्हणे जन्म लाभे तुला बाईचा हा
जगी मानसन्मान ना आईचा हा !
किती जाच तो सासरी पेटते मी
तरीही मजल दरमजल गाठते मी
विखारी नजर भोवती श्र्वापदांची
क्षणी कोणत्याही झडप वासनांची
अशी लक्तरे पाहुनी गोठते मी
तरीही मजल दरमजल गाठते मी
जमाखर्च ना मोल या वेदनांना
उपेक्षित कायम अपेक्षित क्षणांना
उरी शेवटी.. स्वप्न कवटाळते मी
तरीही मजल दरमजल गाठते मी…

– रचना : भाग्यश्री खुटाळे. फलटण