वैद्यक क्षेत्रात कार्यरत राहून अनुभवसिद्ध झालेल्या निष्णात डॉक्टरांनी विविध वैद्यकीय गरजा आणि शंकांचे समाधान करणारे साहित्य लिहिण्याची मोठी गरज आहे.
डॉ. अनुराधा पंडितराव यांचे “आई व्हायचेय मला” हे पुस्तक त्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व कायदेतज्ज्ञ ॲड. श्रीपाद क्षीरसागर यांनी येथे केले.
पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर व कवयित्री डॉ. अनुराधा पंडितराव यांच्या ‘आई व्हायचयं मला’ या पुस्तकाचे प्रकाशन ॲड. क्षीरसागर यांच्या हस्ते नुकतेच झाले, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मिलिंद पंडितराव, सौ. नीलम कडूसकर, सौ. वृषाली उर्फ कालिंदी क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुण्यातील नवी पेठ आणि परिसरातील नागरिकांना रुग्णसेवा देण्याचे काम डॉ. पंडितराव गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ करीत आहेत. पुण्यातील विविध वर्तमानपत्रातून त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. या वेळी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मातृत्व हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. निरोगी माता होण, हे जसं आनंदाचं आहे, तशीच ती एक मोठी जबाबदारी देखील आहे. ही जबाबदारी आनंदाने कशी पेलायची याची इत्थंभूत माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न आपण केला आहे.
किशोरवयीन मुलांची काळजी कशी घ्यावी, स्त्री- पुरुषांची शरीररचना कशी असते, गर्भनिरोधक साधने, मासिक पाळी, ओव्हूलेशन डे कसा ओळखावा, गर्भधारणा कशी होते, गर्भधारणा होण्यातील समस्या व त्यावरील उपचार, गर्भावस्थेतील तसेच बाळंतपणातील तपासण्या, आहार व उपाययोजना, नैसर्गिक व सिझेरियन प्रसूती अशा विविध विषयांची हाताळणी या पुस्तकात करण्यात आली आहे. नव विवाहितांना तसेच आई होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ती उपयुक्त ठरेल.
पुण्यातील शुभ क्रिएशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून ते विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध केले आहे.

– लेखन : सुनील कडूसकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

Khup chan pustak ahe. Ani hya lekha madhe hi surekh varnan kela ahe.