कोणे एकेकाळी शासकीय अधिकारी, बँक मॅनेजर आणि अन्य कितीतरी जणांच्या कामकाजात ३१ मार्च अनन्यसाधारण महत्त्व असायचे.
जानेवरीपासूनच ३१ मार्चचे वेध लागायचे. शेवटी शेवटी तर रात्रीचा दिवस करावा लागायचा.
बँकेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या श्री ओमप्रकाश शर्मा यांनी ३१ मार्चच्या सांगितलेल्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत. आणि त्यांनी केलेला शेवट तर सर्वांनीच आचरणात आणावा, असा !
३१ मार्च म्हणजे पुर्ण वर्षांचा जमा खर्चाचा हिशेब करून ताळेबंद मांडण्याचा दिवस.
वर्ष भरात किती आणि कशासाठी खर्च केला, पैसा कुठून आणि कसा आला तसेच संपत्ती मध्ये वाढ वा घट झाली याचं आकलन करण्याचा दिवस. प्रत्येक व्यवस्थापन, कंपन्या, संस्थांबरोबर नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा अशाच मांडणीचा दिवस व सरकारला टॅक्स बरोबर लाखोली वाहण्याचा एकमेव दिवस.
३१ मार्चला “मार्च एंड” हा एक पर्यायवादी समर्पक शब्द. सध्या आधुनिक संगणक तंत्रज्ञानामुळे काहिसा म्हणण्यापेक्षा खुप खुप सरळ व टेंशन फ्री झाला आहे.
मार्च एंड चे टेंशन काय असायचं हे ८०- ९० च्या काळात बँक मॅनेजर म्हणून ज्यांनी ज्यांनी कार्य केले आहे त्यांना विचारायला हवे. जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील वातावरणातील थंडी हळूहळू कमी होऊ लागायची. गर्मी उर्फ उष्णता जाणवू लागत असे. तशी मार्च एंडची काळजी वाढु लागायची. बचत खातेदारांना व्याज प्रदान करण्यासाठी कर्मचारी वर्गाची जी हुजुरी असो वा कर्ज थकबाकीदारांकडून कर्ज वसुलीची चिंता. सुर्य नारायण जसा आपला ताप वाढवत जाई तसं झोनल वा रिजनल मॅनेजर आपला पारा चढवत असे.
वेगवेगळे चार्ज लावणं, स्टेशनरी व फिक्स ॲसेटचे डिप्रिशिएशन काढणं, विविध खर्चाच्या तरतुदी करणं अशी अनेक कामे मॅन्युअल करून घ्यावी लागायची. मग त्यासाठी ओव्हर टाईम, ज्यादा रजा, पार्टी अशी अनेक गाजरं दाखवून कार्य साधले जायचे.
प्रबंधकांमध्ये एक चुरस लावली जायची अन् ती म्हणजे विविध टार्गेट साध्य करण्याची. अर्थात काही प्रबंधक हा टारगटपणा आहे असं समजून दुर्लक्ष करायचे. रिजनल कार्यालयात तर विशेष जाॅकी नेमलेले असत जे टार्गेट मागे धावणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन धमकीची छडी फिरवत असायचे. प्रमोशन वगैरे गोष्टी असे जाॅकी टार्गेटमागे धावणाऱ्या घोड्यांपेक्षा अलगद मिळवून घेत.
नंतर धावपळ कोण आधी बॅलन्स शीट सादर करून पाठ थोपटून घेतोय त्याची, किंवा सी. ए. कडून ऑडिट करवून निवांत उन्हाळ्याची सुट्टी मंजूर करुन घेण्याची.
आता मात्र संगणकाने मार्च एंड हा चित्तथरारक प्रकार मागे टाकला अर्थात टार्गेट शिवाय.
मला मात्र ३१ मार्चला एका वेगळ्या एंडचा विचार चाटून गेला आणि तो म्हणजे आयुष्याच्या ह्या वळणावर आपल्या जीवनातील हिशोबांचा, जमा खर्चाचा आणि तो म्हणजे विविध प्रकारच्या केलेल्या कर्माचं तुलनापत्र उर्फ बॅलन्स शीट मांडण्याचा.
प्रत्येकाने आपणच आपला लेखा परिक्षक
व्हायचं आणि आपल्या जीवनातील केलेल्या, न केलेल्या कर्माचा आढावा घेऊन कुठलं टार्गेट साध्य केले वा नुसत्या टारगट पणात आयुष्य निघून जात आहे हे बघायला पाहिजे. परमेश्वराने दिलेल्या आयुष्यात शेवटी काय साध्य केले वा काय साध्य केले नाही ह्या वर स्वतः लेखा परीक्षक होऊन एक दृष्टिक्षेप टाकायला हवे !
आपल्याला काय वाटतं ?

– लेखन : ॐप्रकाश शर्मा. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.