चंद्रशेखर आझाद
जो गुण बाळा तो सर्व काळा…
“तुम्हारा नाम ?”
“आझाद !”
“बापका नाम ?”
“स्वाधीनता !”
“ठिकाना ?”
“जेलखाना !”
काशी न्यायालयात मॅजिस्ट्रेट आणि १५ वर्षीय कुमार यांच्यातील ही जुगलबंदी ! पहिले उत्तर आडनाव असल्यागत त्याचा परिचय नि दुसरे त्याची महत्वाकांक्षा ठरले. पण तिसरे उत्तर खोटे ठरवण्याचा त्यानेच चंग बांधला. त्याने त्याचे ठिकाण कधीही जेलखाना ठरू दिले नाही. अटक टाळण्याचा त्याचा संकल्प दृढ असल्याने तो अटक टाळू शकला. जेव्हा अटक अटळ ठरण्याची वेळ आली तेव्हाही तो एक गोळी शिल्लक असेतो गोळ्यांचा वर्षाव करत राहिला. शेवटची गोळी मात्र त्याने स्वत:साठी राखून ठेवली ! ठिकाना जेलखाना बनू न देण्यासाठी ! स्वतःवर गोळी झाडून त्याने आझाद हे नाव (विशेषण) सार्थ केले.
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील भाबरा गाव ! २३ जुलै १९०६ सीताराम आणि जागरानीदेवी तिवारी यांना पाचवा पुत्र प्राप्त झाला. आधीची चार दुबळी मुले जन्मताच दगावली होती. म्हणून हे गुटगुटीत पोर पाहून जन्मदाते फार आनंदले ! पौर्णिमेच्या चंद्रासारखा बाळाचा चेहरा पाहून मातेस प्रेमाचे भरते आले. पित्याने त्यास चंद्रशेखर म्हटले. तिवारी कुटुंबच नव्हे तर संपूर्ण भाबरा गावात कुणी देशभक्त नव्हते. बाळाच्या बाळगुटीत देशप्रेम नि देशभक्ती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. तरीही चंद्रशेखऱ आझाद क्रांतीवीरांचे प्रेरणास्थान बनले. सशस्त्र क्रांतीच्या चीफ कमांडरचे पद त्यांनी भूषविले, हे कल्पनेपलिकडचे लोभस सत्य !
बालपणापासून त्याच्या मनात अन्यायाविषयी चीड ! त्याच्यासह चुलत भावंडांना शिकवण्यास घरी मास्तर येत. ते त्या काळानुसार छडीप्रेमी ! छोट्या चुकीसाठीही ते मुलांना यथेच्छ बडवून काढत. मुलांचे जुजबी शिक्षण झाल्यावर मास्तरांनी सीतारामजींकडे आगळी परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मांडला. मास्तरांनी चूक करायची नि मुलांनी ती शोधायची, असा परीक्षेचा बेत त्यांनी ऐकवला ! सीतारामजींना तो पसंत पडला. उत्सुकतेपोटी कसोटीवेळी ते जातीने उपस्थित राहिले. बालपणापासून चंद्रशेखरची हुशारी आणि चातुर्य सर्वांच्या नजरेत भरत असे ! त्याला चूक उमगणे अपेक्षितच होते. पण चूक कळताच त्याने जे केले ते मात्र अत्यंत अनपेक्षित ठरले.
मास्तरांनी चूक केल्याचे जाणवताच तो वाऱ्याच्या वेगाने मास्तरांकडे धावला. मास्तरांची छडी परजून त्याने मास्तरांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. मास्तर कळवळले. हे अत्यंत अनपेक्षित असल्याने सीतारामजी स्तब्ध झाले. पण लगेच त्यांनी डोळे वटारले. यावर चंद्रशेखर शांत पण कणखर स्वरात म्हणाला, “फार मोठी चूक केली त्यांनी ! छोट्या चुकीसाठी ते आम्हाला कित्येक छड्या मारतात. तरी त्यांना स्वतःला एका छडीत इतका कांगावा करणे शोभते का ?”
पित्याने मास्तरांना मारणे पाप असल्याचे म्हणत ही चूक त्यांनी मुलांचे ज्ञान पारखण्यासाठी मुद्दाम केल्याचे सांगून मास्तरांची क्षमा मागण्यास सांगितले. पण चंद्रशेखरला ते पटले नाही. चूक करणाऱ्या मास्तरांची क्षमा मागण्यापेक्षा त्याने शिक्षण सोडणे पसंत केले. पित्याने समजावले, तरी !
त्याकाळी बाल वयातील मुलांनी अर्थार्जन करणे गुन्हा ठरत नसे. कुटुंबातील स्त्रिया चंद्रशेखरला घरात सांभाळू शकतील अशा सक्षम नव्हत्या. म्हणून सीतारामजींनी पुत्रासाठी सरकारी कचेरीत नोकरी शोधली. कचेरीत गोऱ्या अधिकाऱ्यांचा राबता ! येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गोऱ्या अधिकाऱ्यास सलाम करण्याचा प्रघात ! चंद्रशेखरला न आवडणारा ! तो फार काळ ही नोकरी करू शकला नाही.
मग त्याला मुंबईविषयी माहिती मिळाली. त्याने मुंबईस जाण्याचा धोशा लावला. मुलाच्या हट्टापुढे बापाचे चालले नाही.
मुंबईस काम करणाऱ्याचे पोट भरते पण राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही, अशी मुंबईची ख्याती ! चंद्रशेखरने भैयांच्या वस्तीत राहून रोजगार मिळवला. हाती पैसा आला. मोठ्यांची रोक-टोक नसलेले स्वातंत्र्य! चंद्रशेखरला हे जीवन आवडले. सहा दिवस काम नि एक दिवस रजा ! रजेच्या दिवशी तो सकाळी शर्ट-चड्डीचा जोड विकत आणत असे. कपडे धुणे आवडत नसल्याने सहा दिवस तेच कपडे ! सातव्या दिवशी नवी जोडी आणून आधीची जोडी फेकण्याचा त्याचा परिपाठ ! कुणी विरोध करणारे नसूनही तो व्यसनाच्या आहारी गेला नाही, हे विशेष !
पुढे त्याच्या निर्व्यसनीपणाचा इतका बोलबाला झाला की भूमिगत आझादांना ओळखण्यास सरकार त्याचे निर्व्यसनीपण वेठीस धरू लागले. म्हणून पोलिसांना चकवण्यास ते बिडी वा सिगारेटचा कश घेतल्याचा अभिनय करू लागले. पण हे फार पुढे !
काही दिवसात चंद्रशेखर मुंबईच्या कलंदर जीवनासही कंटाळला. जागरानीदेवींना आपला मुलगा संस्कृत पंडित व्हावा, असे वाटे ! मुलगा मुंबईस कंटाळताच त्यांच्या इच्छेने उचल खाल्ली. त्यांनी पतीस लेकराला बनारस विद्यापीठात दाखल करायचा आग्रह धरला. सुदैवाने चंद्रशेखरने विरोध केला नाही. तोवर एक सक्षम बालक दिशाहिन पाचोळ्यागत परिस्थितीचा वारा नेईल तिकडे भरकटत होते.
बनारसच्या वास्तव्यास त्याच्या जीवनास दिशा लाभली. त्याच्या मनात देशप्रेमाची पेरणी झाली. मुळात मनोभूमी सुपीक ! वयाच्या मानाने समजही अधिक! तिथल्या शेतकरी आणि आदिवासी प्रजेच्या समस्या त्यास आपसूक कळल्या. मुंबईत असताना त्याचा मजुरांच्या समस्यांशी परिचय झाला होता. कुशाग्र विचारशक्ती आणि न्यायाची आस असलेल्या चंद्रशेखरला मजुरांनी संघटना निर्माण करून एकजुटीने न्याय मिळवावा, असे वाटलेही होते. तरी त्या लहान वयात त्यास स्वतः काही करण्याचा उमज पडला नव्हता. पण चंद्रशेखर बनारसला पोहोचला तेव्हा असहकार आंदोलन भरास आले होते. इथेच पाचोळ्यात वाऱ्याच्या दिशेने दिशाहिन भरकटणाऱ्या बालक चंद्रशेखरच्या जीवनाने अनोखे वळण घेतले…..
क्रमशः

– लेखन : स्मिता भागवत. कॅनडा
– संपादन:देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800