कॅन्सरपासून बचावासाठी आपली जीवनशैली सुधारणे आवश्यक असून ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे शिकवण्यात येणाऱ्या राजयोग मेडिटेशन द्वारे आपली जीवन शैली
सकारात्मक बनत जाते. त्यामुळे ब्रह्माकुमारी संस्थेचा साप्ताहिक राजयोगा मेडिटेशन कोर्स सर्वांनी करावा असे आवाहन ब्रह्माकुमार डॉक्टर राजेश जावळे यांनी कॅन्सर जनजागृती व्याख्यान देताना केले.
नाशिकरोड येथील ब्रह्माकुमारीं सेवाकेंद्र, ब्रह्माकुमारी संस्थेचे मेडिकल विंग व जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर व कॅन्सर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते त्या प्रसंगी डॉ जावळे बोलत होते.
उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सचिन परब यांनी सांगितले की, आज कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र ब्रह्माकुमारी संस्था व जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या या कार्यक्रमामधून लोकांपर्यंत कॅन्सरची जागृती होण्यास निश्चितच मदत होईल. समाजात कॅन्सरचा प्रादुर्भाव बघता अशा कॅन्सर तपासणी व कॅन्सर जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता असून ज्याप्रमाणे आपण आज दिपप्रज्वलन करीत आहोत तसेच कॅन्सर जनजागृतीचा ही दीप प्रत्येकाच्या मनात उजळू द्या, असे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नगरसेवक संभाजी मुरस्कर यांनी सांगितले की, अनेक जण कॅन्सर तपासणी ला घाबरतात. मात्र तपासणी ही योग्य ती काळजी घेण्यासाठी असते. जेणेकरून आपल्याला कॅन्सरला पहिल्याच स्टेजवर थांबवणे शक्य होते. कॅन्सर तपासणी ला घाबरण्याचे काही एक कारण नसून प्रत्येकाने विशेषतः चाळीशी पुढील महिलांनी या तपासणीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहनही
त्यांनी केले.
समन्वयक विकास गुजर पगारे यांनी कॅन्सर मुक्ती अभियाना ची माहिती दिली. ब्रह्माकुमारी शक्तीदीदी यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तर ब्रह्माकुमारी गोदावरी उमेश दीदी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने उपस्थित ब्रह्मकुमारी साधकांनी व परिसरातील नागरिकांनी कॅन्सरच्या विविध तपासण्या करून घेऊन या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी कॅन्सर बसचे व्यवस्थापक डॉक्टर उमाकांत उपाध्याय, रेडिओग्राफर डॉ. लता राघव होते.
– टीम एनएसटी. 9869485800