श्री. सुधाकरराव गोपीनाथराव काटकर अर्थात आमचे अण्णा, शिरूर कासार या छोट्याशा गावातून वयाच्या अवघ्या चौदा पंधराव्या वर्षी काम धंद्यासाठी पुण्यात आले. एका प्रतिष्ठित भांड्याच्या दुकानात काम करत लहानाचे मोठा झाले. वीस एकविसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. वडिलांची आई सीताबाई, मोठा भाऊ मधुकरराव व ते स्वतः आणि माझी आई सौ. रत्नमाला या सर्वांबरोबर त्यांचा संसार सुरू झाला. घरातले सगळेच राबत होते. कष्ट करत होते. तशातच आम्हा भावंडांचा जन्म झाला.
तेव्हा आम्ही सगळे एका छोट्याशा खोलीत रहात होतो. अश्या कठीण परिस्थितीत एका दिव्य पुरुषाचे पाय आमच्या घराला लागले. आई वडिलांनी त्यांना गुरू केले. त्यांचे नाव प. पू. ह.भ. प. रघुनाथ बाबा. (आळंदी) बघता बघता आई वडिलांचे कष्ट, आजी, नानांचा आशीर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन आणि दत्तगुरूंची कृपादृष्टी या सर्वांमुळे भाग्य बदलले. हळूहळू सुखाचे दिवस दिसायला लागले. शून्यातून जग निर्माण करणे म्हणजे काय असते हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, अनुभवलं.

अशक्य कोटीतील गोष्टी माझ्या आईवडिलांनी शक्य करून दाखवल्या. पण हे सगळं करत असताना गुरूंचा शब्द तळहातावर झेलून सर्वांत आधी आळंदीला दत्त महाराजांच्या मठाची स्थापना दत्तभक्त मंडळी यांच्या साथीने केली. त्यांच्या विधिवत गुरूंचा समाधी सोहळा सप्ताह, दत्तजयंती सप्ताह, असे कार्यक्रम तेंव्हापासून ते अजूनही करीत आहेत.
प्रत्येक गुरुवारी आळंदीला मठात दत्तमहाराजांच्या दर्शनाला जायचं हा तर त्यांचा नेमच आणि तिथे गेलं की काही हवं नको ते बघून आणुन द्यायचं हे नित्याचच. आता तर तिथे भक्तमंडळींनी रोजच वारकरी विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र चालू केले आहे.
अण्णांनी कोरोनाच्या काळात काही लोकांना पैशांची तर काहींना धान्याची मदत पण केली.

कोरोनाच्या काळात त्यांना आळंदीला जाता येत नव्हतं. म्हणून माझा धाकटा भाऊ प्रत्येक गुरुवारी आळंदीच्या दर्शनाला जायचाच आणि अजूनही तो जातोच. अधून मधून वडील देखील गुरुवारी आळंदीला दत्तमहाराजांच्या दर्शनाला जात असतातच. आणि हो रोज पण संध्याकाळी रास्ता पेठेतल्या रास्ते वाड्यातील दत्त मंदिरात दर्शन घायचं ते कधीही चुकवत नाहीत. त्यांची दत्तभक्ती बघुन मला तर ते स्वतः दत्तरूपात दिसतात.
लहान असताना माझा स्वभाव खूपच भित्रा होता. एकदा अशीच लाईट गेली आणि मी एकदम घाबरून अण्णांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या पाठीमागे जाऊन लपून बसले. बालमनाला एकच माहीत होतं जे दत्तभक्त असतात त्यांना दत्तमहाराज कधीच काही होऊ देत नाहीत. हे जे संस्कार बालमनावर घडले आहेत ना ते असेच कायम कोरले गेले आहेत आमच्या सर्वांच्याच मनावर.
असे खूप छान छान अनुभव, खूप दृष्टांत आहेत सांगण्यासारखे पण लिहिण्यावरही बंधनं असतातच ना ? त्यामुळे थोडक्यातच देते….
आमच्या वारकऱ्यांच्या दिंडीला पंढरपूर येथे राहण्याची सोय व्हावी म्हणून तिथे जागा घेऊन शंकराचे मंदिर बांधून तिथे धर्मशाळा उघडली. ह्या वर्षी तर योग पण खूप चांगला आला. त्यांचा वाढदिवस आणि महाशिवरात्री एकाच दिवशी म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
अण्णांनी व्यवसाय करता करता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने कितीतरी गरीब ग्राहकांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. कितीतरी लोकांना हॉस्पिटलच्या खर्चासाठी मदत केली. झाडूवाले, कचरा गोळा करणारे यांच्यासाठी सुद्धा ते कायम मदत करण्यास तत्पर असतात. अनेकानेक गरजूंसाठी ते नेहेमीच मदतीला धावून आले आहेत.
इतकेच नव्हे तर आपल्या मुलींप्रमाणेच त्यांनी आपल्या भावांच्या मुलींची देखील थाटामाटात लग्ने करून दिली आहेत. करोडपती, अब्जाधीश तर ही अशी कार्य सहज करतीलच हो पण स्वतःची परिस्थिती बेताची असुन देखील त्यांनी अशी खुप मोठी मोठी कामे केली आहेत याचाच अभिमान आम्हाला जास्त आहे.
जालना जिल्ह्यातील काजळा व विज्ञानेश्वर महाराजांचे आपेगाव या गावांमध्ये आमच्या महाराजांच्या बंधूनी, म्हणजे ते देखील स्वतः महाराज आहेत आणि भक्तांनी गोशाळा उघडून अनेकानेक गायींचे पालनपोषण केले आहे आणि करत आहेत. त्यासाठी सुध्दा देणगी रूपाने वडील खर्च देत असतात.
त्यांनी वेळोवेळी काही मुलांना काम लावून देऊन त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिलेली आहे. ती मुले आता मोठी होऊन त्यांची मुले पण मोठी झाली आहेत पण ती लोक माझ्या वडिलांचे ऋण कधीच विसरणार नाहीत असं नेहेमीच म्हणत असतात.
परवा तर एक उच्च पदावरची महिला पोलीस अधिकारी मुद्दाम वडिलांना भेटायला आली आणि म्हणाली की, मामा मला तुम्हाला माझ्या गाडीत बसून फिरवून आणायचे आहे. तुम्ही त्यावेळी माझ्या वडिलांना मदत केली नसती तर कदाचित मी या पोस्ट वर नसते, हे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. किती मोठा मान हा ! खरंच, आमची पण मान ताठ झाली हो हे ऐकून.
अजूनही माझ्या वडिलांचे ग्राहक कुठेही लांब राहायला गेले तरी मुद्दाम खरेदीच्या निमित्ताने म्हणून वडिलांना भेटायला येत असतात. सर्व ग्राहक माझ्या वडिलांना काटकर मामा म्हणूनच ओळखतात. अजूनही जुनी लोक येऊन भेटून जात असतात. त्या लोकांची मुले, सुना देखील आठवणीने माझ्या वडिलांना भेटायला येत असतात.
गेली कित्येक वर्षात खुप लोक जोडली वडिलांनी.
स्वभाव परिस्थिनुरूप रागीट जरी असला तरी एखाद्यावर दया पण पटकन येते त्यांना. माझ्या वडिलांना आम्ही कधीच रडताना पाहिलं नाही पण माझ्या लग्नात त्यांच्या डोळ्यातले अश्रू माझ्यापासून लपले नाहीत. अगदी लहान असतानाच त्यांचे वडील गेले. परिस्थिती अगदीच हलाखीची. त्यामुळे कष्ट नशिबाला आले पण त्यांनी कधीच हार मानली नाही.
पुण्यात ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले की त्याचबरोबर आमच्या महाराजांच्या दिंडीचे पण आगमन होत असते. त्यांची रहाण्याची खाण्यापिण्याची, काय हवं नको ते बघण्याची सर्व व्यवस्था माझे वडील आणि आमचं कुटुंब त्याचबरोबर त्यांचे सहकारी हे सर्व करत असतात. त्यादिवशी तर अन्नदानाचा खर्च वडिलच करत असतात. वडील जरी वयोमानानुसार थकले असले तरी माझी दोन्ही भावंड, माझ्या दोन्ही वहिन्या, बहिणी, भावजी आणि आम्ही सर्वंच जण अगदी वडील ज्याप्रमाणे काळजीने सर्व कार्य करायचे त्याचपद्धतीने वडिलांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत कार्य करत आहोत आणि पुढेही दत्तमहाराजांच्या आशीर्वादाने करत राहु.
आपल्या सहकाऱ्यांबरोबर ठिकठिकाणी अन्नदान, गुरुचरित्राचे पारायण, रघुनाथ बाबा यांचा समाधी सोहळा, दत्तजयंती, असे अनेकविध कार्यक्रम महाराजांच्या आशीर्वादाने वडील, माझ्या माहेरचे आणि सर्व भक्तमंडळी करत आले आहेत.
गुरुभक्तीत लीन होऊन आपल्याकडून जे जे करता येईल ते ते सत्कार्य त्यांनी केले.
आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याचे ऋण तर फेडता येणार नाहीतच पण आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी काहीतरी करायची त्यांची इच्छा होतीच. आणि ती आई कालिकेनी पूर्ण केली. कासार शिरूर येथील कालिका मातेची मूर्ती भंगली होती. तेंव्हा माझ्या वडिलांनी पुढाकार घेऊन गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे नवीन मूर्तीची स्थापना केली. अगदी जयपूर वरून मूर्ती आणण्यापासून ते मूर्ती स्थापना करताना गावात सात दिवस देवीचा उत्सव, तिचा सप्ताह चालू ठेऊन, भजन कीर्तन आणि गावजेवण हे सगळं वडिलांनी केलं. एवढं करूनही ते स्वतः म्हणतात की मी काही केलं नाही हे सगळं दत्तमहाराज करून घेतात.

आपल्या समाजाप्रती असलेले प्रेम तर त्यांनी वेळोवेळी पुण्यातील कासार देवीच्या मंदिरात देणगी स्वरूपात फुल ना फुलांची पाकळी देऊन दाखवलेच आहे.
समाजातच नाही तर समाजाबाहेरील लोकांना देखील त्यांनी खुप मदत केली आहे आणि करत आहेत. पण त्यांनी कधी या सगळ्या गोष्टींचा बोभाटा केला नाही किंवा त्याची जाहिरात पण केली नाही. एका हाताने दिलेले दान हे दुसऱ्या हाताला सुध्दा अजिबात कळता कामा नये असे त्यांचे नेहेमीच म्हणणे असते. पण त्यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असु शकेल आणि लेकीला तर आपल्या वडिलांचा अभिमान असतोच, वडिलांचे कौतुक करण्याची संधी योगायोगाने चालून आली आहेच या उद्देशाने हे सर्व लिहिण्याचा प्रपंच.
त्यांची समाजसेवा खूप मोठी आहे, पण मी खूप थोडक्यात लिहिली आहे. ते नेहेमी म्हणत असतात समाजसेवा ही समुद्रासारखी आहे आणि मी त्यातील फक्त एक थेंब आहे.
त्यांना सामाजिक कार्याबद्दल चार वर्षांपूर्वी पुरस्कार सुध्दा मिळाला आहे. मी त्यांची मुलगी असल्याचा मला खूप अभिमान तर आहेच पण गर्व सुद्धा आहे. त्यांच्या आयुष्यावर खुप लिहिण्यासारखं आहे. दत्तमहाराजांच्या कृपाशीर्वादाने तो योग लवकरच येईल.
आई वडिलांच्या संस्कारांची आणि प्रेमाची कवच कुंडले तर आम्हा भावंडांना आहेतच पण महाराजांचा आशिर्वाद आणि दत्तमहाराजांची कृपादृष्टी सुध्दा आमच्यावर आहे. हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतेच माझ्या वडिलांनी ऐंशीव्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यांना वाढदिवस साजरा करणं अजिबात पटत नाही पण औक्षण वगैरे करून घेतलं तेच आमच्यासाठी खूप आहे. वयोमानानुसार त्यांचा स्वभाव शांतही झाला आहे आणि या वयात मुलांचं थोडं तरी ऐकावं या हेतूने सुध्दा औक्षण करून घेतलं असेल. असो…
अजूनही त्यांची निर्णयक्षमता, विचार करण्याची पद्धत, आणि पटकन तोंडी हिशोब करण्याची हुशारी खुप चांगली आहे. अवघे चौथी शिकलेले माझे वडील एखाद्या सी. ए. ला लाजवतील इतक्या पटकन हिशेब करायचे आणि अजूनही करतात. पैसा हे सर्वस्व नाही पण पैसा आहे तरच सर्व स्व-कीय आप्त आपले असतात हे या सर्व परिस्थितीत आम्ही अनुभवलं आहे.
त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या, तशी कुणावरही वेळ येऊ नये म्हणूनच गरजवंताला मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे.
आईवडिलांचा आशिर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद, कुटुंबाची साथ, दत्तमहाराजांची कृपादृष्टी आणि समाजाची साथ या सर्वांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो असं ते नेहेमीच म्हणतात.
समाजसेवा ही रक्तातच असावी लागते ती जशीच्या तशी आमच्या पिढीला लाभली आहे. त्यांचा हात सदैव आमच्या डोक्यावर आहेच, आणि आम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे.
अण्णा आपणांस उदंड आरोग्यमयी आयुष्यासाठी, हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🎉
तुम्ही असेच आनंदी, निरोगी आणि उत्साही राहो ही आई कालिका चरणी प्रार्थना.

– लेखन : सौ. मंजुषा किवडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Khupch chan
मंजुषाताई किती भाग्यवान आहात तुम्ही की असे देवपण लाभलेल्या व्यक्तीची तुम्ही कन्या आहात! समाजाला अशा माणसांची खरोखरच खूप गरज आहे. अशी सेवाभावी,ध्येयवादी,श्रद्धावान माणसं हा मानवी जीवनाचा आधारअसतो.
माझे मन:पूर्वक वंदन!!
वाह! खूप छान आणि प्रेरणादायी.