जन्म घ्यावा मायबापा घरी,
बालपण जाई कौतुके लाडी,
आई-शाळा घडवी संस्कारी,
नात्यात जडे मायाळू गोडी,
तुळशीत रुजे कोवळे रोपटे,
नित्य नेमे जोपासून त्याले,
सजले वृंदावन बहरून मोठे,
अंगण भरले पाहण्यास तिले,
मुलगी असते परके धन,
विचार रूढी समाज मनाचे,
नांदूनी मिळो सुख समाधान,
अखंड आयु सासर जन्माचे,
सर्वस्व त्यागूनी परक्या जनात,
आठवे भातुकली गहिवरून मनी,
मन रमेना श्रीमंती सुखात,
ये भाऊराया माहेरी घेवूनी,
कसे विसरू जन्मदाते मायबाप,
दुरावली ती माय ऊबदार,
कुठे शोधू बालपण निष्पाप,
हरवले ते जीवन खेळकर,
दूर जाता संपते आपलेपण,
जाणवे मना सदा पाहुणचार,
माहेरी भासे नयनी परकेपण,
विना मायबाप मोकळे माहेर,
निसर्गचक्र जग चाले परंपरेत,
काळा संगे आयुष्य प्रवास,
भासून जाई आठवण हुचकीत,
वेडे मन फिरे माहेरघरास,

– रचना-सौ. वर्षा महेंद्र भाबल.
Heart touching ,written so well