Wednesday, September 17, 2025
Homeबातम्यासमस्त मालुसरेंचा होणार सन्मान

समस्त मालुसरेंचा होणार सन्मान

महाराष्ट्रातील समस्त मालुसरे परिवाराचा १२७ वर्षानंतर पुन्हा एकदा रायगडावर सन्मान होणार आहे.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे.

१२७ वर्षापूर्वी, २५ एप्रिल १८९६ रोजी लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. असिम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे परिवार पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाला सामोरा जात आहे.हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी साखर, एरंडवाडी, सातारा जिल्ह्यातील गोडोली, फुरुस, पारगड, पारमाची, किवे, आंबेशिवथर, लव्हेरी, जामगाव मुळशी, जळगाव, धुळे, बारामती, कासुर्डी गुमा (भोर), शिवथर, निगडे (भोर), हिर्डोशी अशा महाराष्ट्रातील ७० गावांतील मालुसरे परिवारातील ज्येष्ठ, मान्यवर व्यक्ती आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या उत्सवाची कहाणी
रायगड हा अखिल भारतातील एक दुर्भेद्य किल्ला ! १० मे १८१८ कर्नल प्रॉथरच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला. किल्ल्यावर एक घर व एक धान्याचे कोठार तेवढे इंग्रजांच्या अग्निवर्षावातून बचावले होते. शिवछत्रपतींचा राजवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला होता. शिवछत्रपतींची समाधी सुद्धा भग्न झाली होती.पण प्रयासाने ओळखू येण्यासारखी होती. ही पडझड जितकी इंग्रजांच्या तोफखाण्यामुळे झाली होती तितकीच विखुरलेल्या मराठेशाहीमुळे सुद्धा झाली होती. सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते, गडावरील रस्ते, हारीने असलेल्या सुंदर इमारती, मंदिरे भग्न झाली होती, रायगडावरील दफ्तरखाना जळून खाक झाला होता.

त्यानंतर रायगडचा उध्वस्त किल्ला जंगलखात्याच्या ताब्यात जाऊन तेथे वस्ती उरली नव्हती. रायगडचे राजकीय महत्व नष्ट झाले होते.पुढे १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याची नोंद नाही. इतके औदासिन्य लोकांत पसरले होते. तेव्हा मुंबईहून बोटीने नागोठणे आणि नंतर टांग्याने रडतखडत लोक रायगडावर पोहोचत असत. पाचाडचा मुजावर सैद महम्मद किंवा वाडी येथील श्रीधर भगवान शेठ सोनार यांपैकी कोणीतरी गड दाखविण्याचे काम करीत. १८८५ मध्ये वर्तमानपत्रातून काही तुरळक उल्लेख येऊ लागले. १८८७ मध्ये गोविंद बाबाजी वरसईकर जोशी यांनी रायगड किल्ल्याचे वर्णन असे पुस्तक लिहिले. जोशी यांनी छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धार सरकारी खर्चाने व्हावा असे लिहिले. यातूनच पुढे २५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर पहिला महोत्सव करण्यात आला. बारा मावळचे प्रतिनिधीसह महत्वाच्या जागी यावेळी माणसांची दाटी झाली होती. मेळ्याची पदे, विनायकशास्त्री अभ्यंकरांचे कीर्तन, शिवरामपंताचे भाषण, लोकमान्य टिळकांचे समारोपाचे भाषण, गंगाप्रसादाजवळ प्रसादाचे भोजन, छबिना इत्यादी कार्यक्रम व्यवस्थित झाल्यानंतर “तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आले. “इ.स. १८१८ पासून १८९६ पर्यंतच्या रायगडाच्या सुप्तावस्थेनंतरचा हा पहिला उत्सव होता.”

या कार्यक्रमाचा पूर्ण वृत्तांत त्यावेळी दैनिक केसरीमध्ये प्रकाशित झाला होता.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🌹proud to be 🌹

    Vice Admiral मुरलीधर पवार साहेब हे माझ्या खूप जवळचे ओळखीचे आहेत. 🌹
    The Real Hero of Indian Navy 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा