नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत ! काही काही गाणी ही एकदा रेडिओवर ऐकली की कवी, गायक आणि संगीतकार या त्रयींमुळे ती सर्वप्रथम आपले कान, नंतर ओठ आणि नंतर ह्रदयात स्थानापन्न कधी होतात तेच कळत नाही. काही काही गाण्यांमधून सर्वमान्य तत्वज्ञान सुध्दा अगदी सहजपणे सांगितलं जातं.
आज आपण पहाणार आहोत ज्येष्ठ कवी मधुकर जोशी यांनी लिहिलेलं हे गाणं,
ज्याचे शब्द आहेत –
“गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रूपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभोवती,
फिरते रूपया भवती दुनिया”
जगात आपल्याला अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळतं. तसंच साम्य ज्येष्ठ कवी मधुकर जोशी यांना दिसून आलं ते म्हणजे ही पृथ्वी गोल असल्याने त्या पृथ्वीवर वर्षानुवर्षे वास्तव्य करून असलेल्या मानवाची दुनिया ही आकाशात रोज सकाळी दर्शन देणाऱ्या सूर्याप्रमाणे गोल आहे. फक्त पृथ्वी जशी सूर्याभोवती गोलाकार फिरत रहाते तसाच या दुनियेतील मानव प्राणी देखील हा रूपया आपलासा करण्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी त्याच्याभोवती गोल गोल फिरतो आहे अर्थात कवीच्या म्हणण्यानुसार रूपया नावाचा सूर्य मिळवण्यासाठी ही दुनिया देखील वर्षानुवर्ष त्याच्या मागे फिरते आहे…. त्याच्यासाठी झुरते आहे !
फसवाफसवी करून लबाड्या
धनिकांच्या त्या चालती पेढ्या
हवेशीर त्या रंगीत माड्या
गरीबाला नच थारा वेड्या
नसता जवळी माया
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारं कर्ज जमीन सावकाराकडे गहाण ठेवून पैशाच्या रूपाने घेतलं जातं. पण जमिनीचे कागद बनवताना मात्र फसवाफसवी आणि लबाडीचा आश्रय घेतला जातो. दिलेल्या कर्जाची परतफेड करायची झाली तर त्यावर सावकार अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करतो. श्रम करूनही श्रमाचा मोबदला इतका कमी मिळतो की सावकाराच्या कर्जाची परतफेड करणं अशक्यप्राय होऊन बसतं. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात, त्यांचे आलिशान बंगले श्रीमंतीचं म्हणजेच पैशाचं लोभसवाणं दर्शन देत उभे असतात आणि सावकाराच्या पाशातून मोकळं होण्यासाठी स्वतःचं रहातं घरही विकण्याची वेळ आल्यामुळे गरीबाचा एकमेव आसराही नाहीसा होतो. पैशापाठी पळणाऱ्या दुनियेची ही अशी विचित्र कहाणी आहे.
मजूर राबती
हूजूर हासती
घामावरती दाम वेचिती
तिकिटावरती
अश्व धावती
पोटासाठी करिती
विक्रय अबला
अपुली काया
उन्हातान्हाची आणि पावसाची पर्वा न करता संसारासाठी, तान्ह्या लेकरांसाठी आणि पोटासाठी पडतील ती कामं अंगावर घेऊन मजूर घामाच्या बदल्यात दाम म्हणजेच पैसे मिळवू पहातात….हातावर पोट असल्यामुळे दाम मिळवण्यासाठी रोजच्या रोज घाम गाळायला लागतो, कष्ट करावे लागतात तेंव्हा कुठे त्या गोल रूपयाचं दर्शन होतं…त्यांचा मालक मात्र या मजुरांच्या श्रमांवर एसी लावलेल्या आलीशान ऑफिस मध्ये बसून सौख्याचा आस्वाद घेत असतो. तर काही जण विनाश्रम पैसे मिळवण्यासाठी रेसच्या घोड्यावर आपल्याकडचे थोडे पैसे लावतात आणि शरीराने एका जागेवर बसून असले तरी मनाने मात्र जास्त पैसा मिळवण्यासाठी घोड्यावर स्वार झालेल्या जॉकीच्या मागे धावत असतात. तर एखाद्या अबलेवर मात्र पैसा मिळवण्यासाठी शरीर विक्रय करायची वेळ येते.
नाण्यावरती नाचे मैना
अभिमानाच्या
झुकती माना
झोपडीतले बाळ भुकेले
दूध तयाला पाजायास्तव
नाही कवडी माया
या पैशापाठी कितीही जरी धावलात तरी तो सहजासहजी आपल्या हातात येत नाही. एखादी नर्तकी “या पावलीचं काय म्हणणं हाय?” असा सवाल विचारते आणि मोहक अदाकारी करत अशी काही लावणी सादर करते की तिच्या अदाकारीने मोहित होऊन पसंतीची पावती म्हणून या व्यक्तींच्या माना तर डोलतातच पण तेव्हढ्याच तत्परतेने त्या नर्तकीवर या व्यक्ती आपल्या जवळचे पैसेही उधळतात. त्याच वेळेस पैशाच्या पाठीमागे धावूनही पैसा हातात न आल्यामुळे एखाद्या गरीबाच्या झोपडीतलं तान्हं बाळ भुकेनं कळवळत असतं, पण त्या बाळाच्या दुधासाठी फुटकी कवडी देखील त्या घरात नसते.
गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे यांच्या मधूर आवाजात आपल्या भोवतालच्या परिसरात घडणाऱ्या या घटनांचं वर्णन ऐकताना मधुकर जोशी यांच्या काव्य प्रतिभेची साक्ष पटते.
– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर. विषयावर लिहीले आहे तो रुपया मोलाचा
त्याची साथ फिरवते आणि आपणही त्याची फिरत बघून हरखतो
धन्यवाद मित्रा 🙏
छान!
धन्यवाद जनार्दन 🙏
काही असले तरी हे जग रुपयाभवती फिरते हे भावे सरांनी या गाण्यातून सुंदर शब्दांत रसग्रहण केले आहे.
धन्यवाद निलाक्षी 🙏
विकास भावे आपण अत्यंत उत्तम लेख लिहिला आहे.
धन्यवाद प्रतिभा मॅडम 🙏
मधुकर जोशी यांनी त्यांच्या या गीतांमध्ये गरीबांची वेदना उत्तम पद्धतीने मांडली आहे. रोजच्या जीवनातील अनुभवांची सुरेख शब्दात मांडणी केली आहे. गोविंद पोवळे यांनी संगीत देऊन ते गायले आहे. अनेक मराठी गाण्यांपैकी माझं हे एक आवडत गाण. नेहमीप्रमाणेच रसग्रहण उत्तम झाले आहे.
धन्यवाद विवेकजी 🙏
छान
धन्यवाद गौरव 🙏