भारतातील संगणक प्रशिक्षण क्षेत्रात स्वकर्तुत्वाने स्वत:चे स्थान निर्माण करणारे सिड इन्फोटेक संस्थेचे प्रमुख श्री. श्रीकांत रासने यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनाने समाजाची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध…. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात श्री श्रीकांत रासने यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला होता. ते दहावीची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले होते. पुढे डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केल्यावर त्यांनी याच विषयातील पदवी प्राप्त केली. भारत सरकारच्या डिआरडीओ या प्रख्यात संस्थेत त्यांनी संशोधन सहायक म्हणून काही काळ काम केले. या सेवेत असतानाच त्यांनी मुंबईच्या आय आय टी या जगप्रसिद्ध संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स मधील एम टेक ची पदवी मिळवली. एम टेक पदवीनंतर त्यांना विदेशातील कुठल्याही प्रख्यात कंपनीत नोकरी मिळू शकली असती. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशवाशियांसाठीच झाला पाहिजे असा त्यांचा दृढनिश्चय होता. म्हणून त्यांनी १९९४ साली नरेंद्र बरहाटे या मित्रासोबत पुण्यात सिड इन्फोटेक ही संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. ४०० चौरस फूट जागा, ८ संगणक, १ लाख रुपये भांडवल आणि महत्वाचे म्हणजे प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर सुरू केलेल्या या संस्थेने पुढे केवळ देशातच नव्हे तर विदेशातही नावलौकिक मिळविला.
- संस्थेच्या पुण्याबरोबरच नवी दिल्ली, बंगलोर, इंदोर, भोपाळ, जयपूर या शहरांमध्ये , महाराष्ट्रातही विविध ठिकाणी शाखा सुरू झाल्या. आज या संस्थेत अध्यापक, अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचारी मिळून ६०० जण कार्यरत आहेत. तर दरवर्षी २५ हजारहून अधिक विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतात. श्रीकांतजींचे संस्थेच्या कामानिमित्ताने अमेरिका, चीन, सिंगापूर, हॉंगकॉंग या देशांमध्ये दौरे झाले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासन, मायक्रोसॉफ्ट, रेडहॅट, सॅप या नामांकित कंपन्यांचे पुरस्कार मिळाले होते. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ गुणांच्या मागे न लागता आपला कल ओळखून बहुआयामी कौशल्य विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांचे सांगणे असे. त्यांच्या मागे पत्नी देवयानी, मुलगी देवश्री, मुलगा रोहन आहेत. श्रीकांतजींचे योगदान, प्रगती कायमची लक्षात राहील अशीच आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– देवेंद्र भुजबळ.9869484800.
खूपच दुःखद बातमी ! एखाद्या उमद्या व्यक्तिमत्वाची अशी दुर्देवी Exit व्हावी , पण नियती समोर आपण पामर हतबल आहोत .
देवेन्द्र यांनी त्यांच्या कर्तत्वाचा थोडक्यात पण परिपूर्ण परिचय मांडला
” भावपूर्ण श्रद्धांजली “