संविधान किंवा राज्यघटना, हा, एखादा देश अथवा राष्ट्र चालविण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच असतो.
हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात.
थोडक्यात संविधान म्हणजे देशाच्या राज्य कारभारासंबधीच्या तरतुदीचा लिखित दस्तऐवज.
९ डिसेंबर १९४६ रोजी भारताची संविधान सभा
ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी स्थापन झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि २९ ऑगस्ट १९४७ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली,भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली.
संविधान सभेत एकूण २९९ सदस्य होते. डाॅ.राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा, विविध देशांच्या संविधानांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करुन, संविधानाचा मसुदा तयार केला. तो सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली.
त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा आणि मसुद्यात फेरबदल करुन तो अधिकाधिक निर्दोष करण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
अंतीम मसुदा २६ नोव्हेंबर१९४९ रोजी संविधान समितीने तो स्वीकारला.
त्या संविधानाचे राष्ट्रार्पण दिनांक २६ जानेवारी
१९५० रोजी करण्यात आले.
१९ नोव्हेंबर २०१५ रोजी भारत सरकारने
२६ नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून घोषित केले.
संविधान संपूर्ण रुपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधानाचे इंग्रजी आणि हिंदी भाषेत हस्तलिखित आहे. प्रेम बिहारी नाराईन राईजदा यांच्या सुंदर हस्ताक्षराने संविधान लिहिले गेले. नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून त्यामधली कलाकृती केली गेली.
१९५० सालचे संविधान हे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर आधारित होते. नागरिकत्व, निवडणुका आणि अंतरिम संसदे विषयीच्या आणि इतर तात्पुरत्या बाबी त्यावेळी तात्काळ लागू झाल्या.
सुरवातीला संविधानात २२ भागात ३९५ कलम आणि ८ अनुसूची होत्या. आज संविधानात प्रस्तावना, आणि २५ भागात ४४८ कलम १२ अनुसूची व ५ परिच्छेद आहेत. संविधानात आतापर्यंत १०३ दुरुस्ती झाल्या आहेत.
भारतीय संविधानाच्या ऊद्देशिकेप्रमाणे, भारत हे
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही
प्रजासत्ताक आहे. ही संविधानाची बैठक आहे.
त्यानुसार, संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी केलेली मूलभूत नियमावली.
जनतेकडून निवडून दिलेलेच लोकप्रतिनिधी सरकार स्थापन करु शकतात.
संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते.
संविधानात विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. संविधानातील तरतूदी अनेकविध आहेत. नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासक यांचे संबंध, निवडणुका, शासनाच्या मर्यादा,
राज्यांचे अधिकारक्षेत्र वगैरे बाबींबाबत संविधनात मार्गदर्शक सूत्रे आहेत.
इतिहास, समाजरचना, संस्कृती, धर्म, परंपरा या
सर्वांचा विचार भारतीय राज्यघटना निर्माण
करताना केला गेला आहे.
स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय,
लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे, हा संविधान निर्मितीचा मूळ उद्देश. एकतेत अनेकता जपणे हा दृष्टीकोन ! संविधान हा देशाचा अभिमान आहे.
या निमित्ताने एक आवर्जून सांगावेसे वाटते की, संविधानातील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवून त्यांना एक जागरुक नागरिक बनवणे हे पालक आणि
शैक्षणिक संस्थांचे आद्य कर्तव्य आहे.
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून अभिवादन. जयहिंद !!

– लेखन : सौ. राधिका भांडारकर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
