कोरोनाच्या कहरामुळे आता संचारबंदी लागलीय. पुन्हा ती शांतता. पुन्हा निर्मनुष्य रस्ते. हतबल परिस्थिती. त्यामुळे, ‘करोना आपली जबाबदारी’ हे लक्षात घेऊन सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करून ह्या संकटाला तोंड देऊ या . हे ही कठीण दिवस जातील. सर्वांनी मिळून ह्यावर मात करू व सुखरूप बाहेर पडू, हीच सकारात्मक विचारसरणी आजच्या काळाची गरज आहे. एकमेकांना साह्य करू ही संकल्पना मनात रुजवून आपल्या परीने एकमेकांना मदत करू.जे अपल्याकडे आहे व जे काही शक्य आहे ते गरजवंताना देऊ.आज आजूबाजूला अनेक जेष्ठ नागरिक आहेत त्यांना सहकार्य करू. सामान, औषध आणून देऊ. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करू. त्यांच्याशी छान गप्पा गोष्टी करू. आपला वेळ देऊ. त्यांचा अडचणी जाणून त्यांना मदत करू. घरातील मावशी, काही कामगार असतील अथवा काही गरीब गरजू लोक असतील तर त्यांना थोडा किराणा आणून देऊ. किमान त्यांचे खाण्याचे हाल होऊ नये. किमान दोन वेळा त्यांचे कुटुंब पोटभर जेवतील. प्रत्येकाने हा माणुसकीचा धर्म पाळला तर कोणीही उपाशी राहणार नाही. निदान त्यांचा गरजा भागतील.
ही माणुसकीची भिंत उभारू कारण हेच आपले संस्कार आहेत. हेच आपले प्रथम कर्तव्य आहे व हाच खरा मनुष्य धर्म आहे. कारण परमेश्वराचे अस्तित्व तर ह्या गरिबांमध्ये आहे.आज परमेश्वर बहुदा ह्या कोरोनाच्या काळात आपली परीक्षा घेत असेल. तो कोणत्या रूपाने येईल हे कोणीच सांगू शकत नाही, त्यामुळे एकमेकांना आवर्जून मदत करा, कारण सामान्य माणसाची असामान्य शक्ती असते. अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या अन्नदान करतात. गोर गरिबांना मदत करतात. त्यांचे दुःख थोडे कमी करतात. तेथे जमेल तसे सहकार्य केले पाहिजे. आज वेळ आहे व संधी देखील आहे .नुसता कंटाळा आला हे म्हणण्यापेक्षा वेळ सत्कारणी लावू या.
घरात बसून देखील मोफत ऑनलाइन क्लासेस घेऊ शकतो. आपल्यातील कला, आपल्यातील गुणांचा दुसऱ्याला जर उपयोग होत असेल तर अवश्य करू. त्यामुळे ती व्यक्ती अथवा मुलांना नवीन धैर्य मिळेल. ह्यातुन त्यांना भविष्यात आर्थिक हातभार लाभु शकतो. ती व्यक्ती स्वावलंबी बनेल कारण ज्ञान दान हे श्रेष्ठ दान आहे म्हणून तर गुरूंचे स्थान हे मोलाचे असते. मुलांनी सुट्टीत काय करावे हा प्रश्न आहे. ते सारखा मोबाईल अथवा टीव्ही तरी किती पाहणार? ह्या सर्वाचा त्यांनाही कंटाळा आला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात त्यांना मदत करू. त्यांना नवीन गोष्टी शिकवू.ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, काही कला आहेत त्यांनी आजूबाजुला रहात असलेल्या किमान दोन तीन मुलांना घेऊन चित्रकला शिकवू, गाणी शिकवू, यशस्वी लोकांच्या गोष्टी सांगू. थोरांच्या संघर्षमय कथा सांगू. चांगल्या विचारांची ज्योत निर्माण करू ज्यामुळे ते उद्याचे जबाबदार नागरिक होतील.
आजी आजोबांनी देखील मुलांना काही श्लोक शिकवावे. ह्यामुळे त्यांचा वेळ तर चांगला जाईल व समाधान ही लाभेल. आजूबाजुला असलेल्या ह्या नकारात्मक गोष्टीतून काही सकारात्मक गोष्टी शोधून काढू कारण म्हणतात ना दृष्टी तशी सृष्टी.आनंद द्या व आनंद घ्या ही संकल्पना मनात रुजवून अनेक नवीन गोष्टी करू. आजपर्यंत वेळेअभावी अथवा कौटुंबिक जबाबदारी मुळे मनात राहिलेल्या इच्छा, काही छंद जोपासू. कारण नवीन शिकायला अथवा करायला वयाचे बंधन नसते फक्त चिकाटी, प्रामाणिकपणा, जिद्द असली की अशक्य देखील शक्य करण्याचे सामर्थ्य असते. आज आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू. घरातील कामात मदत करू. घरातील स्त्रीला किमान एक दिवस सुट्टी देऊ.
बायको, आई अनेक त्याग करते. कधीही कोणालाही सांगत नाही. आपल्या वाईट वेळेत त्यांची भक्कम साथ असत्ते. त्या आठवणीना पुन्हा नव्याने उजाळा देऊ कारण तिला केवळ आपल्या कुटुंबाचे प्रेमाचे दोन शब्द हवे असतात. घर सुंदर सजवून तिला छान सरप्राईज देऊ. मस्त कँडल लाईट डिनर करू. किती आनंद होईल तिला हे पाहून ! सहज तिच्या डोळ्यात ते आनंदाश्रू येतील.खरे सांगू का स्त्रीचा आनंद ना ह्या लहान लहान गोष्टीत असतो. तर करणार ना प्रयत्न? करून पहा. तिच्यासाठी, तिच्या आनंदासाठी. आपल्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींच्या संपर्कात रहा. त्यांच्याशी मस्त गप्पा गोष्टी करा. हयातुन तुमचा एकटेपणा दूर होईल. हे अविस्मरणीय क्षण, ह्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतील.
आज अनेक नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. कोरोना वगैरे काही नाही, आम्हाला काहीही होणार नाही असं त्यांना वाटतं. त्यांना एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी आवर्जून त्या लोकांना विचारा ज्यांनी कोरोनामुळे आपल्या घरातील प्रिय व्यक्ती गमावली आहे. ज्यांना बेवारस मरण आले आहे. जे आंदोलन करतात विरोध करतात त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारला एकमताने व एकजुटीने सहकार्य केले पाहिजे. कारण पैशाचे नुकसान आज न उद्या भरून येईल पण आपली माणसं गमवल्याचे नुकसान कधीही भरून येणार नाही. कारण ती तर लाख मोलाची संपत्ती आहे. जसे सूर्यास्त झाल्यावर सूर्योदय ही होतो, जो ही पृथ्वी आपल्या लख्ख प्रकाशाने उजळून टाकतो. तसाच उद्या हा कोरोनारुपी राक्षस गेल्यावर आपण स्वातंत्र्याचा आनंद घेऊ. पुन्हा नव्याने सुरवात करू कारण “जान हे तो जहान हैं.
लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.