गझल या उर्दू काव्य सरितेचा ओघ महाराष्ट्रातकडे वळवण्याचं बरचसं श्रेय कवि माधवराव पटवर्धन ऊर्फ ‘माधव ज्यूलियन’ यांना जात असलं; तरी तिला सगुण-सौदर्यशाली मराठी वस्त्राभूषणांनी अलंकृत करणारा एकमेव कवि मी पाहिला तो सुरेश भट ! भट निधन पावल्यानंतर त्याच्याहून वरचढ गझल हल्लीच्या महाराष्ट्रात कुणीच लिहू शकलेलं नाही !
सन् १९६५ च्या वळणावर माझ्या ध्यानीमनी दडलेली प्रतिभा, एकाएकी ओठांतून प्रगटली आणि पुढील काही दिवसांतच मला ‘चालविशी हाती धरोनिया’ या वत्सलतेने चालवत मराठी साहित्य जगताशी हितगूज करू लागली आणि भाग्य असं बलवत्तर की; फार नाही फक्त दीड वर्षात मी भोपाळला भरलेल्या ४७ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात अग्रगण्य कवींच्या चक्रव्यूहात सापडलेला एक होतकरू कवी म्हणून व्यासपीठावर स्थानापन्न होतो, तिथेच स्वयंतेजाने तळपणा-या सुरेश भटांना प्रथमत: पाहिल॔, त्यांचा दोन मराठमोळ्या गझला ऐकल्या–
१. जगत मी आलो असा की;
मी जसा जगलोच नाही ।।
२. एक माझा प्रश्न साधा;
लाख येती उत्तरें ।।
त्या ऐकून मी त्यांच्या प्रेमात पडलो, त्याच भेटीत त्यांनीही मला अगदी सहजतेने जवळ घेतलं.
साहित्य संमेलन आटोपले. त्या दिवसांत माझा सख्खा वडीलभाऊ लग्नाच्या विचारात होता नि स्थळही नेमकं अमरावतीच्या ‘रुख्मिणी नगरा’ तलं. अमरावतीत कुणी ओळखीचं न पाळखीचं, स्थळाची चौकशी करावी कुणाकडे ? हा प्रश्न तिथे जाणा-या माझ्या दोन्ही भावांच्या मनात उद्भवला. मग मीच कविवर्य भटांच्या नांवे पत्र दिलं अन् भटही त्याला जागले, त्यांनी माझ्या भावंडांचं आदरातिथ्य तर केलंच; परंतु ती रेशमी लग्न-गांठ बांधून दिली. अलीकडे लोक रक्ताच्या नात्यांना जपतील याची फार शाश्वती देता येत नाही; मात्र भटांनी माझ्यासारख्या नवागत भक्ताच्या नात्याचं मोल जाणलं.

पुढील काही वर्षांत माझ्या कविता महाराष्ट्रातल्या लब्ध- प्रतिष्ठित मासिकांतून, दिवाळी अंकांतून थोरांच्या पंगतीत बसू लागल्या; ‘मेनका’ तील गझलांची निवड सुरेश भट करीत व त्यात माझी गझल हमखासपणे असेच ! हळूहळू आमच्यात एक सलगता निर्माण झाली. माझ्या विवाहानंतर १९७५ साली मी एकटाच नागपुरात दाखल होऊन भटांचा शोध घेता घेता, ते एक सायंकालिकाच्या कार्यालयात सापडले. वेळ रात्रीची, काम संपताच मला सोबत घेत ते काचीपु-याच्या दिशेने निघाले. त्या दिवसांत व पुढे पण त्यांच्या हाती साधारणशी सायकलच दिसे. आम्ही त्यांच्या निवास स्थानी (सोनक बंगला) पोचलो; तेव्हा २-३ खोल्यांच्या त्या घरात आमची वास्तपुस्त बघायला कुणीच नव्हतं. रात्रीचे निदान ११ वाजले असावेत अन् जेवणाची काहीच व्यवस्था दिसे ना ! मग त्यांनी गॅस पेटवला व त्यावर ‘कसे-बसे’ थोडे पापड भाजले, तेच आम्ही खाल्ले, त्याचवेळी भटांनी मला ‘सा.लोकप्रभा’ मध्ये आलेली त्याची ‘रस्ते’ कविता दाखवून विचारलं–
“बघ रे, कशी वाटते ही कविता ?”
म्हटलं “काही काही ओळी ब-या आहेत.”
पहिल्याच रात्री मला आणीबाणीची कविता ‘ओळख’ सुचली. आणीबाणीची पूर्वसूचना देणारी ती कुठल्याही भारतीय भाषेतली एकमेव कविता असावी ! परंतु त्यांना दाखवण्याच्या भानगडीत पडलो नाही. कुणी सांगावं ? एका मोठ्या कवीच्या कवितेचा मी वाचताक्षणीच मुडदा पाडलेला, माझी कविता पाहून तो माझं काय करेल त्याचा काय नेम ? मग मी ती कविता भल्या पहाटे मुकाट्याने टेबलच्या काचेखाली सरकवली. इथे एक खुलासा आवश्यक वाटतो. भटांशी आमना-सामना झाल्यापासूनच आमच्यातील नातं नेहमीच ‘अरे-तुरे’ चं राहिलं. मी त्यांना एकेरी ‘सुरेश’च संबोधित असे नि तेसुध्दा मला तितक्याच सहजपणे मला ‘बेडेकर’ अशी हांक घालत. तर दुस-या सकाळी सुरेशने माझी कविता वाचलीच असावी; पण तत्पूर्वीच हनुमान थिएटर, मुंबईचे मधुसुदन नेराळे दारात हजर. त्यांचं स्वागत करत, त्याने मला फर्मावलं–
“जारे बेडेकर, हा कडीचा डबा घे आणि टपरीवरून चहा आण.”
अन् मग तो नेराळ्यांकडे वळत म्हणाला–
“बेडेकरने फार उत्तम कविता लिहिली आहे; पण मी (तसा) बिनबाह्यांचा माणूस नाही.”
नेराळे निघून गेल्यावर आम्ही दै.लोकमतच्या कार्यालयात पोचलो, तिथे सुरेश माझा परिचय लोकमतचे मालक श्री.विजय आणि राजेंद्र दर्डा यांच्याशी करून देत म्हणाला–
“ही या बेडेकरची ‘ओळख’ कविता, ती यंदाच्या लोकमत दिवाळी अंकात, त्याच्याच हस्ताक्षरात छापून आली पाहिजे.”
दर्डांनी त्या शब्दांचं मोल जाणून माझी कविता १९७५ सालच्या दिवाळी अंकात माझ्याच हस्ताक्षरात दिली. यातच त्या दोघांच्या मनी-मानसी एकमेकांबद्दल असलेला अपार विश्वास दिसून आला.
अर्थात त्या भेटीत सुरेशच्या कुंडलीतल्या शनीचा, माझा राशिस्वामी असलेल्या रवीशी खडाष्टक-योग सुरू असावा, कारण ग्रीष्माने धगधगलेल्या नागपुरातलं ते उन्ह मला झेपलं नाही, कानशिलालगत एक मोठ्ठ गळू वाढता वाढता वाढे गतीने वाढून त्याचा ठणका सोसवेना. अशात मी तिथेच हांथरूण धरलं. तेव्हा सुरेशने लागोपाठ १५ दिवस दररोज दवाखान्यात जाऊन स्वखर्चाने माझं औषध-पाणी केलं. त्याचं ते ॠण मी कधीच फेडू शकलो नाही.
सहजच पुण्यातला एक प्रसंग स्मरला. त्या भेटीत गीतकार सुधीर मोघे व मी सुरेश भटच्या पायांत मांजरागत घोटायचे. त्या दिवसांत भट यांचा मुक्कम आपल्या सासुरवाडीत, मेहेंदळ्यांकडेच होता. त्या सुमारास सुरेशमध्ये मराठी नाटक संचारलेलं. त्याने “जेव्हा अफजलखानाला जाग येते” शीर्षकाने लिहिलेलं एक नाटक मला व सुधीरला वाचून दाखवलं. नाटकात शिवाजी महाराज क्रांतिकारी अन् अफजलखान पोलिस अधिकारी अशी थीम होती. सुधीर त्यातील बहुतेक वाक्यांना भरभरून दाद गेला, मी गप्प ! मग सुरेशने माझं मत विचारलं. त्यावर मी स्पष्ट ठणकावलं की; “तू समजतोस त्याप्रमाणे “नाट्यसंपदा” तुझं हे नाटक स्टेजवर आणेल असं मला वाटत नाही.” व झालं तसंच, ते नाटक नाट्यसंपदाने कधीच रंगभूमीवर आणलं नाही.
नाट्यवाचन संपताच सुरेश आम्हा दोघांना सोबत घेऊन हॉटेलमध्ये जेवायला निघाला नि माझ्या कानांत हळूच म्हणाला की– “जो होईल तो सारा खर्च तू कर, सुधीरला करू देऊ नको, तुझे पैसे मी नंतर तुला देईन.”
पुढे, म्हणजे १९८० अखेर सुरेश दंड थोपटून अकोला येथे भरणा-या ५५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत उतरला, विरुध्द बाजूने गोपाल नीलकंठ दांडेकर रिंगणात होते. त्या रणधुमाळीच्याप्रसंगी भटांनी मला ‘Urgent’ पत्र टाकलं–
~~~~~~~~~~~~~~~~
“प्रिय श्रीकृष्ण,
अकोल्यातील अध्यक्षीय निवडणुकीत मी उभा आहे. माझ्या वतीने मध्य प्रदेशात काम करणारा तुझ्याखेरीज कुणी वाली नाही म्हणून तुझी आठवण झाली !आयुष्यात अशी लढत वारंवार येत नसते. तुला माझ्यासाठी जबलपूरला जावे लागेल, तेथे ११ मते आहेत. मी निवडून यावे असे तुलाही वाटणार म्हणून मित्र- कार्यास्तव एवढे तडफेने कर. तुझ्यावर विसंबून आहे.”
“तुझा,”
“–सुरेश”
~~~~~~~~~~~~~~~~
अर्थात त्याच्या दुर्दैवाने म्हणा
किंवा दांडेकरांच्या सुदैवाने म्हणा, दांडेकरांना केशवराव कोठावळ्यांचा भक्कम पाठिंबा लाभल्यामुळे गो.नीं चाच विजय झाला.
त्याच कालावधीत अनुराधा पौडवाल यांनी म्युझिक इंडियाच्या बॅनरवर मी लिहिलेलं पहिलं गीत गायलं; त्यावेळी सुरेशने फोन लावून त्यांचं कौतुक केलं. तेव्हा सुरेश भटांचा पडाव आकाशवाणी मुंबई केंद्रासमोरील ‘आमदार निवासा’ त होता व मी त्याच्या सोबत खोलीवर असायचो.
माझ्या महत्त्वाच्या जबाबदा-या २-३ च असत.
१. सकाळी चहाबरोबर येणा-या खाद्य पदार्थांचा फन्ना उडवणं, सुरेशचा खाद्यबंबाळ- पणा ‘आ’ वासून पाहणं,
२. दिवसभर त्याच्या संगतीने मुंबईत भटकून, कधी आईस्क्रिम पार्लर, तर कधी खाणावळी, हॉटेल्समध्ये पुख्खा झोडणं आणि
३. सा-या भ्रमंतीनंतर खोलीवर परतल्यावर सुरेशच्या डोंगरल्या दुख-या पाठीवर उड्या मारणं.
अशाच एका भटकंतीत त्याने स्वरलावण्याने रस- रसलेल्या आशाताईं ना फोनवर सांगितलं की–
“मी बेडेकरला घेऊन प्रभूकुंजला येतोय. त्याच्या गझला तुम्ही ऐका, फार छान लिहितो.”;
परंतु नेमक्या त्याचवेळी त्या काश्मीरला जात असल्याने, आम्ही प्रभूकुंजला पोचून, माझ्या गझला कन्या वर्षाला ऐकवल्या होत्या.
त्यानेच आणखी एका पत्रातून चौकशी केली होती की–
“बेडेकर, तू मराठी चित्रपटांसाठी गीते कधी लिहू लागणार ?”
पण तशी गरज मराठी चित्रपटांना ‘कधी’ भासलीच नाही व ते सोनेरी युग अस्ताला गेलं.
भटांच्या निधनोत्तर आजवर महाराष्ट्रात कुणीसुध्दा त्यांच्या वरचढ गझल वा गीत-रचना लिहिलेली नाही ! मराठी भाषा, तिच॔ अंगभूत सौंदर्य, शुध्दलेखन, वृत्त-छंद यांची खिल्ली उडवणारी गझल-कुरणं जागोजागी माजली आहेत, त्याच्याबद्दल माझ्या कविमनात तिटकारा होताच !. अशा परिस्थितीत, 👍बहुधा भट त्या दिवसांत मावळतीपासून २-३ वर्ष दूर असताना मी आणि माझे जिवलग मित्र श्यामकांत कुळकर्णी (अलीकडेच ते पण गेले) भटांच्या भेटीस ‘वझलवार बंगल्या’ वर पोचलो. भट जेवत होते. जेवता जेवता गप्पा पुढे सरसावल्या अन् मी गुगली टाकली–
“सुरेश, मला तुझ्या दोन बाबी आवडत नाहीत ! एक तर तू अचाट खातोस व दुसरी बाब म्हणजे तू “गझलची बाराखडी” पुस्तिका काढून महाराष्ट्रातली एक पूर्ण नवी पिढी नासवली आहेस.”
माझ्या त्या विधानावर फारसं काही भाष्य न करता आमची चर्चा अवांतर विषयाकडे वळली.
आणि आता या स्मृति- लेखाचा डोळे भिजवणारा शेवट.
२००३ सालचा मार्च महिना मध्यावर येत असताना, १४ तारीख, रात्रीचे ८-८॥ वाजलेले. मी महाराष्ट्रातल्या ४० नामवंतांना पाठवायच्या निमंत्रणांवर सुवाच्य पत्ते घालत बसलेला. रात्रीच नेऊन ती स्टेशनच्या RMS ला टाकायची होती, तशात मी एक-एक पत्ता बारकाईने तपासत होतो व मध्येच “सौ.पुष्पा-श्री.सुरेश भट” हे नांव समोर आलं. का कुणास ठाऊक; तेवढं निमंत्रण बाजूला सारून मी बाकीची ३९ निमंत्रणं रात्रीच स्टेशनला पोचती केली. दुस-या सकाळी मुंबई दूरदर्शनवर सुरेश भटच्या छायाचित्राखाली, पहिली
बातमी होती–
“सुरेश भट यांचे निधन”
~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं, कारण सुरेश मला रात्री ८-८॥ वाजताच त्याच्या निर्वाणाची सूचना देत गेला होता की; यापुढे मी श्री. नसेन व हीदेखील, सौ.पुष्पा असणार नाही ! तरी निमंत्रण धाडू नको.

– लेखन : श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
