कविवर्य सुरेश भट यांचा आणि माझा इतका जवळचा संबंध येईल असे कधी वाटले नाही. पण माझे ज्येष्ठ मित्र डॉ. मोतीलाल राठी, अरविंद ढवळे, दादा इंगळे, रामदासभाई श्राफ यांच्यामुळे हा योग जुळून आला.
मी तपोवनात राहत असतांना दाजीसाहेबांनी व अनुताईंनी माझा लेखक स्वभाव लक्षात घेऊन मला एक पाच कक्ष असलेले अतिथीगृह निवासस्थानाव्यतिरिक्त उपलब्ध करून दिले होते. या माझ्या अतिथीगृहाचा सर्वात जास्त लाभ जर कोणी घेतला असेल तर त्यांचे नाव आहे कविवर्य सुरेश भट. त्यांच्या आदरतिथ्याला आम्ही कुठेही कमी पडलो नाही. सौ. विद्या, आमच्या कन्या प्राची व पल्लवी, माझे सहाय्यक श्री शिवनयन ठाकरे व श्री शिवदास भालेराव हे सदैव सुरेश भटांचे सहकारी असायचे.
भटसाहेबांचे टाईम टेबल वेगळे असे. ते इतरांसारखे नव्हते. त्यावेळेस लोकांची घरे फार मोठी नव्हती. उत्पन्न पण जेमतेमच होते आणि पाहुण्यांना हॉटेलमध्ये उतरण्याची संस्कृती नव्हती. आम्हाला सुरेश भटांचे आदरतिथ्य करण्याची संधी मिळाली हे मी माझ्या जीवनातींल अहोभाग्य समजतो.
सुरेश भट असले म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची बरसात असायची. त्यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये सौ विद्या कुठेही कमी पडली नाही. भट साहेबांना रात्री पोहे करून देणे, जेवण करून देणे, चहा करून देणे, त्यांच्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा पाणी करणे हे सगळं अग्निदिव्य आम्ही पार पाडलं. आमच्या दोन्ही कन्या तेव्हा प्राथमिक शाळेमध्ये शिकत होत्या. सुरेश भट यांना अंग दाबून घेण्याची खूप सवय होती. ते काम दादा इंगळे व मी करायचो. आमच्या घरी असताना आमच्या कन्या त्याच्या अंगावर नाचायच्या.
भटसाहेब म्हणायचे पल्लवी, प्राची असल्यामुळे माझी शरीरयष्टीची चांगली मरम्मत होते.
जेव्हा लढाईचा डंका रडाया लागला, जो तो आपापल्या तंबूमध्ये पळाया लागला… ही कविता सुरेश भट यांनी माझ्यासमोर लिहिली आहे. रात्रीचे दोन तीन वाजले असतील. आम्ही श्री अरविंद ढवळे व मीनाताई ढवळे यांच्याकडे मुक्कामी होतो. सुरेश भटांची तंद्री लागली होती. ते मला म्हणाले, “नरेश कागद-पेन घे आणि लिहावयाला सुरवात कर”. मला ते सांगू लागले आणि मी लिहू लागलो. अगदी अर्ध्या तासामध्ये ही कविता तयार झाली.
आम्ही प्रामाणिकपणे सुरेश भटांचे आदरतिथ्य केले. आता अनेक लोक सांगतात मी भटसाहेबांचे असे केले आणि भटसाहेबांचे तसे केले. हे सर्व सर्व खोटे बोलतात. कारण की माझ्या आयुष्याचा बराचसा काळ मी भटांबरोबर घालवलेला आहे. सुरेश भट म्हणतात
“काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक त्यांच्याही आसवात मी नसणारच” काही अति श्रीमंत लोकांनी सुरेश भटांना जी वागणूक दिली त्याबद्दल ते म्हणतात, “काही भिकारड्यांना दिलदार मानले मी, मेल्यावरी जगाचे उपकार मानले मी”
सुरेश भट यांनी सर्वात जास्त कोणाला पत्र लिहिली असतील तर तो प्राणी मी म्हणजे मी (नरेशचंद्र काठोळे) आहे. त्याचे लवकरच एक स्वतंत्र पुस्तक निघत आहे. माझ्या प्रत्येक सुख दुःखा मध्ये सुरेश भट सहभागी व्हायचे. मी प्राध्यापक म्हणून लागलो. माझी मान्यता यायची होती. अडचणी होत्या. सुरेश भट मला डायरेक्ट माननीय श्री रा.सू.गवई यांच्याकडे घेऊन गेले. रा. सू.गवई साहेबांनी फोन उचलला आणि काम झाले.
मला आठवते, सुरेश भट माझ्या भारतीय महाविद्यालयाचे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करायला येणार होते. आम्ही त्यांना टॅक्सीने घेऊन नागपूरच्या रविनगरपर्यंत आलो. तेव्हा अधिवेशन सुरू होते. सुरेश भटांना एकदम तंबाखू चुन्याची आठवण झाली. ते मला म्हणाले, नरेश आपण तंबाखू चुन्याच्या डब्या घरीच विसरलो आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे थांबतो. तू पटकन जाऊन तंबाखू चुना घेऊन ये. मी दादांना म्हणालो, दादा आपण घरापासून दहा किलोमीटर दूर आलेलो आहोत. ही टॅक्सी वापस नेली तर जो खर्च होईल त्या खर्चामध्ये इथे डझनभर तंबाखू चुन्याच्या डब्या मिळतील ! सुरेश भट म्हणाले, अरे हे बरोबर आहे. पण आता मुख्यमंत्र्यांचे नाव काढलेच आहे तर सुधाकररावांना भेटू. तेव्हा सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो. वाटेत सुरेश भटांचे एक मित्र मिळाले. खान त्यांचे नाव. त्यांचे मुख्यमंत्र्याकडे काम होते. सुरेश भट म्हणाले, चल मी आताच करून देतो. पण ते खानसाहेब अक्षरशः पळाले. ते म्हणाले, साहेब मला माफ करा. मुख्यमंत्री फार मोठा असतो. मी क्लास टू ऑफिसर आहे. त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाही. ते खान साहेबांना म्हणाले, तुझी ऑर्डर निघाल्याशिवाय मी हैदराबाद हाऊस सोडणार नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचलो .मुख्यमंत्री नव्हते. पण श्री. दिनेश अफझलपूरकर नावाचे प्रधान सचिव होते. त्यांनी भट साहेबांना विचारले, काय काम आहे ? मुख्यमंत्री नाही आहेत. लगेच सूत्रे फिरली आणि आम्ही खाँसाहेबांची शिक्षण उपसंचालक अशी पदोन्नतीची ऑर्डर घेऊनच बाहेर पडलो.
भटसाहेबांनी खानसाहेबांकडून कधी आयुष्यात चहादेखील घेतला नाही.
मित्रांनो, असा हा दिलदार माणूस. किती लिहावे तेवढे कमीच आहे. आमच्या जिवलग ज्येष्ठ मित्र कविवर्यांना आणि महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला मनापासून मानाचा मुजरा.🙏

– लेखन : प्रा.डाँ. नरेशचंद्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस अमरावती
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
काठोळे सरांनी सुरेश भट यांच्या सांगितलेल्या आठवणी ते प्रसंग डोळ्यासमोर उभे करतात