“आज या वेड्या मनाचा
जोगिया गावून झाला,
दूरच्या हाके प्रमाणे
ऐकतो आता स्वतःला”
कवी सुरेश भट म्हणजे मराठी काव्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न ! भावप्रधान काव्यरचना करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कविता, गीते, मुक्तक अश्या अनेक प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. गझल या काव्य प्रकाराचा मराठी रसिकांना मुक्त आस्वाद घेता आला तो गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुळेच. त्यांच्या काव्याने, गीताने मराठी मनांवर निर्विवाद राज्य केलं.
सामाजिक, शृंगारिक आणि आत्मचिंतनपर विषय त्यांनी आपल्या गझलांमधून अतिशय सुबक शब्दांमध्ये मांडले. त्यांची शृंगार काव्ये तर आजही मनाला वेड लावतात. ‘तरुण आहे रात्र अजुनी ‘ असो, ‘ मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे ‘ असो किंवा ‘ मेंदीच्या पानावर ‘ असो, यातील हळूवारपणा अंगावर रोमांच फुलवतो. ‘ गे मायभू तुझे मी ‘, ‘ उषःकाल होता होता ‘, ‘ जय जन्मभू जय पुण्यभू ‘ या रचना ऐकताना हे तेच सुरेश भट आहेत का असा प्रश्न पडतो आणि ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ किंवा ‘जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेंव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी’ यात एक विरक्त योगी दर्शन देतो.
सुरेश भटांची गझल, त्यातील शेर हे प्रत्येक वेळी नवे अर्थ उलगडून दाखवतात.
एखादी बाग ओस पडलेली असते, तिथे फुलं नसतात, हिरवळ नसते पण एक पर्जन्य वृष्टी अशी होते की अंकुर अन् अंकुर प्रफुल्लीत होतो. विलक्षण सुंदर फुले फुलतात. अगदी त्याप्रमाणे काहीशी मागे पडलेली मराठी गझल लावण्यवती होवून सामोरी आली ती सुरेश भटांच्या दैवी शब्द स्पर्शामुळे. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग, रसवंतीचा मुजरा अश्या त्यांच्या काव्य संग्रहात ह्या अभिव्यक्तीच्या बादशहाचे दर्शन घडते.
‘हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती…
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले ?’
किंवा
‘मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते ‘
मानवी मनात चालणारी उलघाल अशी शब्दात व्यक्त करायची आणि ती देखील इतकी सौंदर्यपूर्ण पद्धतीने की आनंदी असण्याचे आणि रहाण्याचे गोडवे गाणाऱ्या लक्ष कवितांना हा ‘सल ‘ हवा हवासा वाटावा, ह्या विखाराचा हेवा वाटावा आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे ह्या शब्दसृष्टीच्या ईश्वराचा स्पर्श !
भट साहेबांची मला आवडणारी एक कविता किंवा एक गझल असं काही निवडायचं तर अशक्य आहे. त्यांच्या प्रत्येक काव्याने मी तितकीच मोहून, भारावून अगदी नादावून जाते परंतु एक कविता जी श्वासात वहाते अशी सांग म्हटलं तर ती म्हणजे ‘रोपटे‘
सामाजिक, वैयक्तिक, अध्यात्मिक कोणत्याही संदर्भावर ही कविता वाचणाऱ्याचे आकाश उजळून जाते.
‘मी आता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे…
जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो’
हे लिहिताना भट साहेब प्रत्येकाच्या मनातील लक्षावधी तुरुंगांना स्पर्शून जातात. एकेक शब्द, एकेक ओळ जी स्फुरली असेल, ती भावनांच्या कल्लोळाचे उसळते समुद्र घेवून. किंबहुना त्या समुद्रांनीच ह्या गगनचुंबी लाटा उठवल्या असतील.
‘का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो ?
मी तुम्हासाठीच तेंव्हा कोरडा बहरून गेलो’
गझल सम्राट,
असं नका हो म्हणू…
हा शेर मी लक्ष वेळा वाचला असेल, पण डोळ्यात पाणी न येता एकदाही वाचू शकले नाही. पुढच्या पिढ्यांतले माझ्यासारखे अनेक जण असे आहेत, जे आपले शब्द पुन्हा पुन्हा वाचतात, आणि अनुभूतीचा प्रयत्न करतात.
गझल सम्राट, आपले वर्णन आम्ही काय करावे. आपण म्हटले आहे, ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ परंतु मराठी ऐकता बोलताना जे आपले शब्द आम्हांस लाभले ते आमचे अहोभाग्य आहे. आपल्याला आमचे कोटी कोटी प्रणाम !
माझी, आदरांजली पर असलेली प्रस्तुत कविता आपले चरणी अर्पण…
ह्या कवितेत गझल सम्राटांना उद्देशून एकवचनी संबोधन वापरण्याचा गुन्हा मी करते आहे. जेथे जेथे परमोच्च श्रद्धा, भक्ती आणि स्नेह असतो तेथे संबोधनांचे नियम गळून पडतात.ज्या मनाच्या गाभाऱ्यात ह्या ओळी उमटल्या तेथेच ‘तुजवीण शंभो मज कोण तारी’ असाही जप चालतो. सदर काव्यातील एकवचनी संबोधन हे तितकेच शुद्ध आहे. हा तोच भाबडेपणा आहे, हे तेच भारावलेपण आहे. ह्या माझ्या काव्यदैवताला उद्देशून आलेले हे एकवचनी संबोधन ! त्या ओळी उमटल्या तेंव्हां ते संबोधन घेवूनच आल्या. गझल सम्राटांबद्दल असलेल्या निस्सीम भक्तीचे ते प्रतीक आहे. त्यामागचा शुद्ध भाव रसिक समजून घेतील आणि मला क्षमा करतील अशी आशा बाळगते 🙏
रंग सारे उधळूनही अस्माना इतका उरतोस,
देखणे पेरून काव्य खोल अंतरंगात मुरतोस.
नसे केवळ काव्य तुझे; काळजाचे हे तर ठोके,
वैफल्य ही रेशीम लेवून शब्द तरुंवर घेते झोके.
रंग खेळतो हरी कधी; कधी झुलतं मेंदीचं पान,
कधी मशाल आयुष्याची उरी माय मराठी मान.
योद्धे शृंगार, वीर, करुण तुला शरण गेलेले,
एका एल्गाराने तुझ्या त्रिभुवन जिंकून नेलेले.
गझल तर पूरी फ़िदा, अशी टिपली तू तिची अदा,
करी रदीफ़ क़ाफ़िया पोरके एक तुझा अलविदा.
सुन्या सुन्या मैफिली होती तुझ्या इथून जाण्याने,
अंतरिक्ष दुमदुमत असेल आता तुझ्या गाण्याने.
देवलोकी तव गझलेचा नंदादीप जळत असेल,
स्वर्ग म्हणजे काय ते आता त्यांना कळत असेल.
त्या दीपाचे चार किरण हृदयी माझ्या रुजू दे,
ठाव मनाचा घेतील असे ओठी शब्द सजू दे.
भिक्षा मागत प्रेरणेची व्यर्थ मी कशास फिरू ?
तूच माझा गुरू आणि तूच माझा कल्पतरू !
लीन तुझ्या चरणी मी ; अनुग्रही मज एक वर,
जो वेगळा रंग तुझा त्याचा अंश बहाल कर !

– लेखन : डॉ. गौरी जोशी-कंसारा.
न्यु जर्सी, अमेरिका
– संपादन: देवेंद्र भुजबळ. +91 9868484800.

सुरेश भटांच्या कवितांविषयी आम्ही पामर काय बोलणार?
गौरी जोशी कंसारा यांनी भटांच्या साहित्याचा आढावा अगदी मार्मिक.
त्यांना समर्पित कविताही फार सुँदर!
अतिशय सुंदर लेख लिहिला आहे
सुरेश भट म्हणजे खरोखरच एक मूर्तीमंत हिरवळ. त्यांच्या काव्यप्रवाहात विहार म्हणजे स्वर्गसुखच..
गौरी कंसाराने त्यांच्या कावाय प्रवासाचा घेतलेला आढावा अतिशय सुरेख…
गौरी जोशी यांनी सुरेश भट यांच्या गझलांचा सविस्तर आढावा घेतला आहे