गझलसम्राट सुरेश भट यांची आज, १५ एप्रिल रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण….
मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवणारे सुरेश श्रीधर भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला. सुरेश भट अडीच वर्षांचे असताना त्यांना पोलिओ झाला व त्यांचा उजवा पाय अधू झाला.
भट यांच्या आईला कवितांची आवड होती तसेच संगीताची आवड होती. त्या हार्मोनिअम वाजवत असत. भट यांचे वडील डॉ.श्रीधर रंगनाथ भट यांना सुध्दा संगीताची आवड होती. पोलिओमुळे अपंग झालेल्या सुरेशला संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून आई – वडिलांनी प्रयत्नं केला. त्यामुळे सुरेश भट बासरी वाजवू लागले. ते उत्तम गायक होते. ते ढोलकी व तबलासुध्दा चांगला वाजवत होते.
भट यांचा एक पाय अधू झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन बाकीचे शरीर मजबूत बनवले. ते सायकल उत्तम चालवत असत. ते हू तू तू, हॉलिबॉलही खेळत असत. ते नेमबाज होते. तसेच भालाफेक करत असत. ते पतंग तयार करत असत, पतंगासाठी लागणारा मांजासुध्दा घरी करत असत.
१९५५ साली बी.ए. झाल्यानंतर ते शिक्षक म्हणून नोकरीस लागले. त्याच दरम्यान ते कविता करू लागले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. द.भि.कुलकर्णी यांनी केशवसूत, बोरकर, तांबे, मर्ढेकर यांच्याबरोबरच सुरेश भट यांचा “युग प्रवर्तक कवी” असा उल्लेख केला आहे. मराठी गझल क्षेत्राचे “अनभिषिक्त सम्राट” म्हणून सुरेश भट यांचे नाव अजरामर झाले आहे. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग इत्यादी कविता संग्रहाने सुरेश भट यांचे नाव अजरामर झाले आहे.
भट यांना एक मुलगी विशाखा व दोन मुलगे हर्षवर्धन व चित्तरंजन होते. त्यापैकी हर्षवर्धन याचे अपघाती निधन झाले.
“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही !” असे म्हणणाऱ्या सुरेश भट यांनी १४ मार्च २००३ रोजी या जगाचा दैहिक निरोप जरी घेतला, तरी ते त्यांच्या गझलांमुळे अजरामर झाले आहेत.
गझलसम्राट सुरेश भट यांना विनम्र अभिवादन.

– लेखन : दिलीप गडकरी. कर्जत-रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.