भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात १ मार्च १९८६ ते २१ ऑक्टोबर १९९१ अशी सेवा करून मी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवेत अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग १ म्हणून २२ ऑक्टोबर १९९१ रोजी रुजू झालो.
जून १९९३ मध्ये माझी बदली मंत्रालयात झाली.
दूरदर्शनचा पूर्वानुभव असल्याने माझ्याकडे जास्त करून तेच काम सोपविल्या जायचे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक, शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. या नाम विस्तारासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्ष निर्णय जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्रात यथायोग्य वातावरण निर्मितीसाठी विविध मान्यवरांची मनोगते १४ जानेवारीच्या काही दिवस आधी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून दररोज प्रसारित करण्याचं ठरविले. यात मान्यवरांच्या मनोगतांचे चित्रीकरण, संकलन माहिती खात्यामार्फत होत असे. तर प्रसारण दूरदर्शनवरून संध्याकाळी बातम्यांचा आधी होत असे. त्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली.
दूरदर्शनमध्ये असतानाच मी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातुन १९८८-८९ या वर्षात मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम चा कोर्स केला होता. त्या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्य कर्तृत्वावर आधारित “ज्ञानपुंज डॉक्टर बाबासाहब” हा माहितीपट दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ६ डिसेंबर १९८८ रोजी रात्री ९ वाजता हिंदी भाषेत व मुंबई दूरदर्शन केंद्रावरून संध्याकाळी ६.३० वाजता मराठी प्रसारित झाला होता.
औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठातील वास्तव्यामुळे व या माहितीपटाच्या निर्मितीतील सहभागामुळे मला बाबासाहेबांचा शैक्षणिक मोठेपणा फार भावला होता. त्यामुळे जेव्हा माझ्यावर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या अनुषंगाने दूरदर्शन समन्वयाची संवेदनशील जबाबदारी सोपविण्यात आली, त्यावेळी मी ती आनंदाने स्विकारली.
श्री प्र. स. महाजन साहेब हे तेव्हा आमचे (माहिती खात्याचे) संचालक होते. तर दुरदर्शनकडून सहायक केंद्र संचालक वसंतराव भामरे हे प्रसारण विषयक काम पहात होते. मराठवाडा विभागातील मंत्री महोदय, प्रसिद्ध साहित्यिक, बुद्धीवंत, विविध पदाधिकारी अशा मान्यवरांच्या मुलाखती काही दिवस दररोज प्रसारित करावयाच्या होत्या. आणि त्या नियोजनानुसार व्यवस्थित प्रसारित झाल्या.
पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासह डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला मिळालेली ती मानवंदनाच होती.
ज्या विद्यापिठात आपण शिकलो, ज्यांच्या शैक्षणिक कार्य कर्तृत्वावर आधारित माहितीपटाच्या निर्मितीत आपला सहभाग होता, त्या मराठवाडा विद्यापिठाचे नामांतर “डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे झाले, त्या प्रक्रियेत आपणही खारीचा वाटा उचलू शकलो, ही व्यक्तिशः माझ्यासाठी नेहमीच आनंदाची आणि अभिमानाची बाब राहिली आहे.
या माझ्या आठवणींच्या अमूल्य ठेव्याबद्दल मी दूरदर्शन आणि माहिती विभागाचा कायमचा ऋणी आहे.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
सेवानिवृत्त संचालक (माहिती) +91 9869484800.
भुजबळ सरांच्या आठवणी नेहमीप्रमाणे अनेक मुद्यांचा परामर्श घेणा-या