भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांना महाराष्ट्र आण्णासाहेब कर्वे म्हणून आदराने संबोधतो अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाची आज १६४ वी जयंती ! १०४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य महिलांच्या शिक्षणासाठी वाहिलेली भारतातील ही एकमेव व्यक्ती ! महर्षी ही उपाधी सर्वार्थाने सार्थ ठरवणारा महामानव !
मी खूपच भाग्यवान की, महर्षींचा पावन स्पर्श मला लाभला. ती अक्षरशः पांच ते दहा मिनिटांची भेट होती, मी सहा-सात वर्षांची असेन, अजाण वय होतं. माझे वडील साने गुरुजींचा प्रदीर्घ सहवास लाभलेले आणि स्वातंत्र्य सैनिक, त्यामुळे अशा अनेक महान व्यक्तींचे मला दर्शन घेण्याची सुवर्ण संधी मिळाली.
एकदा आम्ही कोथरूडला अण्णांच्या आश्रमात गेलो होतो, तेव्हा त्या परिसराचे नांव कर्वेनगर नव्हते. नीटसा रस्ताही नव्हता. खूप गर्द झाडी होती. वातावरण शांत होते. तिथे एका मोठ्या वृक्षाच्या भोवती पार बांधला होता. त्यावर अण्णा संध्याकाळी बसत. माझ्या वडिलांनी वाकून अण्णांना नमस्कार केला. त्यांची मुलगी म्हणून अण्णांनी माझ्या डोक्यावर अतिशय ममतेने हात ठेवला. त्यांची मूर्ती मला पुसटशी आठवते. पांढरे शुभ्र धोतर आणि सदरा, हातात आधाराला काठी. डोळ्यांवर चष्मा होता. इतकंच आठवतं, परंतु त्या वेळेस एका महान व्यक्तीचा बहुमोल आशीर्वाद आपल्याला लाभत असल्याची जाणीव त्या अजाण वयात नव्हती.
भारतीय डाक विभागाने एखाद्या महान व्यक्तीच्या आयुष्यात त्यांच्याच सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित करण्याचे इतिहासातील एकमेव उदाहरण म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. अण्णांनी जीवनात अनेक देशांना भेटी देऊन आपल्या शिक्षण संस्थेसाठी देणग्या मिळवल्या आणि जपान विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठाची स्थापना केली.
अण्णांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा दैदिप्यमान सोहळा मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम वर संपन्न झाला, असे वाचल्याचे आठवते. या देशाचे पंतप्रधान महर्षींच्या कार्य कर्तृत्वावर झुकले विनम्र झाले. ते म्हणाले “या महर्षींना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करणारे आम्ही कोण ? मी त्यांच्या पुढे खुजाच आहे. उलट त्यांचेच आशीर्वाद घ्यायला मी आलो आहे.”
या महान उत्तुंग व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र विसरला की काय अशी शंका मला वाटते. कारण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत फक्त त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होतो. प्रसार माध्यमं अनभिज्ञच दिसतात. मोठी प्रतिष्ठित वृत्तपत्रे सुद्धा या उदासीनतेला अपवाद नाहीत. महर्षींना आदरांजली म्हणून त्यांचा फोटो, लिखाण काहीच आढळत नाही. या गोष्टीची खंत वाटते आणि ती व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही.
महर्षी कर्व्यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार अभिवादन !

– लेखन : आशा कुलकर्णी
महासचिव, हुंडा विरोधी चळवळ. मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
स्त्री शिक्षणात महान कार्य केलेल्या म.कर्वे यांच्या आठवणी हेलावून टाकणा-या आहेत.
महर्षी कर्वे ह्यांच्या बद्दल आशाताईंचा लेख छान आहे. प्रसार माध्यमांनी त्यांना दुर्लक्षीत केल्याची खंत आशाताईंसारखी मलाही वाटते.