समुद्रावर गेल की समुद्राच्या मऊशार वाळूत चालत जायच, तो मऊ मऊ स्पर्श, किंचित ओलसर स्पर्श अनुभवावा अस सगळ्यांनाच वाटत. ओल्या वाळूत उमटणाऱ्या आपल्या पाऊलखूणा निरखत जाण्याचा सर्वांनाच छंद असतो नाही ? जणु जमीनिशी घट्ट नात दृढ करणारा ..आतल्या ओलाव्याला धरू पाहणारा.
मनातल्या रंगांना क्षितिजापार उधळणारा असा आगळा अनुभव. समुद्रावरून येणारा गोड वारा अंगांगाला पुलकीत करत असतो. स्वतःशी संवाद साधायला मौनाचा अर्थ जाणून घ्यायला उद्युक्त करत असतो. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा जीवन एकीकडे किती क्षणभंगूर आहे तर त्याबरोबरच विशाल आहे ह्याची साक्ष पटवत राहतात. त्याची सतत येणारी गाज आपल्यासोबत ही वैश्विक शक्ती सतत आहे याची जाणीव करून देतात.
नीळशार आभाळ आपल्यवर छाया धरून आहे याचा सतत भास देतात. आला दिवस प्रसन्न चित्ताने घालवून मावळतीच्या आकाशात रममाण व्हाव आणि चांदण्यांच्या बहरण्याची वाट पहात झोपी जाव. सकाळी जाग यावी ती दूर बहरणाऱ्या कांचनरंगी सुवर्णरेखेने, समुद्राच्या हलक्या गाजेने अन् वाऱ्याच्या मंद झुळूकीने. अहाहा ! एक शांत अनुभव हीच शांती मिळवायला आपण जीवाच रान करत असतो. त्याच्या पाठी धावता धावता शांत झाल्यावर कस वाटत हेच विसरून जातो.
शहरात महत्प्रयासाने न मिळणारी ही शांती समुद्रकिनारी अशी अचानक गवसते. नुसत हात फैलावून पाण्यात उभ राहिल तरी तो पाण्याचा प्रवाही स्पर्श चित्तवृत्ती फुलवून जातो. भरून घेतलेला श्वास नवी उभारी देतो. समोरची अथांग क्षितिज रेषा पाहता मनोविकास घडतो. चित्तवृत्ती दंग होतात. साऱ्या तनामनाला विशालतेचा परिसस्पर्श जाणवतो. आपण हळुहळू या आसमंतात विलिन होतोय असा भास होऊ लागतो.
सकाळची कोवळी किरण, आभाळातील शतरंगांची उधळण, मंद शीतल झुळझूळ वारा अंगाशी लगट करू लागला की चैतन्याची बरसात होऊ लागते. मन प्रफुल्लित होऊ लागत.
जाणीवा सजग होऊन चालू लागल की सर्वत्र भरून राहीलेला निसर्गाचा जीवनाविष्कार अचंबित करू लागतो.
वाळूत दडलेले नानाविध शंख , शिंपले दिसले की काय वैविध्य अवतीभवती ठासून राहीलय याची खूण पटू लागते. त्यांचे रंग, आकार सारच लोभस. कुठे गोल गरगरीत तरीही रेखिव आकार तर कुठे निमूळता होत जाणारा .. किती वेचू अन् किती नाही अस होऊन जात. एका रंगाची तारीफ करावी तर दुसरा लखलखणारा शंख वा शिंपला समोर येतो. जणू हा अनुभव देण्यासाठीच की काय तो इतका वेळ अदृष्य असतो. मनभावन रंगांचा तो सोहळा किती मनोहारी !
लाटांनी मानवासाठी आणलेला जणू सुंदर आहेरच भासतो मला तो. निसर्ग असाच आपल्याला भरभरून देत असतो.
आपणच कोत्या वृत्तीने हातपाय आणि मन सुद्धा जखडून बसतो मग तो तरी काय करणार? शंख शिंपले न्याहाळतानाही कितीही छान काही मिळाल तरी अजून हव हा शोध थांबतच नाही. मिळालय त्याच समाधान क्षणात विरत आणि सुरू होतो तो जीवघेणा शोध, अनाकलनिय तृषा भागवण्याचा .. निसर्गापासून दूर जाण्याचा … मानवी जीवन परिपूर्ण न करता .. भलत्याच सुखाच्या मागे लागण्याचा …. हळव्या जाणीवा बोथट करणारा … त्या निर्मात्याच्या सृजनशिलतेपासून दूर जाण्याचा ….
असो .. स्वभावाला औषध नाही. अनुभवांच्या खाणीत असा निवांत क्षणाचा, निसर्गाशी तादात्म्य पावण्याचा अनुभव मिळतोही क्वचित् पण आपण क्षणभरच त्यावर विसावते आणि पुन्हा पुढची वाटचाल करतो.. अशाच एका क्षणी थांबण्यासाठी .. मागे वळून पाहण्यासाठी ..

– ✍️शिल्पा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.