मातेसमान, प्राचार्या डॉ.सिंधुताई मांडवकर यांना श्रीमती सूर्यकांता देवी रामचंद्र पोटे चॅरिटेबल ट्रस्टचा यावर्षीचा “साहित्यव्रती पुरस्कार” जाहीर झालेला आहे. सिंधुताईंनी आता नव्वदी गाठली आहे. पण त्या नियमितपणे व्यायाम करतात. संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणीमुळे आजही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एक मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त होतो आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर या समारोहामध्ये पुरस्कार प्राप्त सर्व साहित्यिकांचे मनापासून अभिनंदन…
या पुरस्काराचे वितरण आज, २० एप्रिल २०२२ रोजी अमरावतीला होत आहे. त्या निमित्ताने ही स्मरणयात्रा…
सिंधुताई मांडवकर यांचा आणि माझा परिचय जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा मी नुकताच महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश केला होता. डॉ. भाऊ मांडवकर, सिंधुताई मांडवकर, मधुकर केचे सुरेश भट, बाबा मोहोड, सुदाम सावरकर, शरच्चंद्र सिन्हा ही त्या काळातील दिग्गज लेखक कवी मंडळी.
योगायोगाने या सर्वांचा माझा ऋणानुबंध घट्ट होत गेला. डॉ.मोतीलाल राठी, अरविंद ढवळे, रामदासभाई श्राफ, वल्ली सिद्दिकी, दादा इंगळे यांच्यामुळे या साहित्यिक मंडळीबरोबर भेटीगाठी व्हायला लागल्या. त्यात सर्वात जास्त अंतकरणापासून आपल्या घराची दारे जर कोणी उघडून दिली असतील तर त्या व्यक्तीचे नाव आहे सिंधुताई मांडवकर आणि भाऊ मांडवकर.
खरं म्हणजे त्या काळात आम्हाला राहायला घरही नव्हतं. पण भाऊसाहेबांनी व सिंधुताईंनी त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी सताड उघडले. त्याला खूप मोठं मन लागतं आणि ते मन त्यांच्याजवळ होतं. भाऊसाहेबांचे घर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ असं समीकरण केल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
अमरावतीच्या बसस्थानकापासून जवळ असलेल्या विजय कॉलनी मध्ये भाऊसाहेब आणि सिंधुताई राहत होते. सर्वात महत्त्वाचं त्यांच्याच इमारतीमध्ये मागच्या बाजूला जयसेवा वाचनालय होतं. ते आजही आहे. या वाचनालयाने आम्हाला बौद्धिक खाद्य पुरविले. आमच्या अनेक सभा, अनेक कार्यक्रम मांडवकर दाम्पत्याच्या घरी झालेले आहेत. छोटा कार्यक्रम असला तर पहिल्या मजल्यावर, मोठा कार्यक्रम असला तर गच्चीवर !
भाऊसाहेबांचे घर हे आम्हाला आमचं घर वाटत होतं. आमच्याकडे पाहुणे आले म्हणजे आम्ही सरळ
भाऊसाहेबांचा पत्ता देऊन त्यांना तिथं बोलवायचो. ग्रंथालयाच्या अतिथीगृहात राहण्याची, आंघोळ करण्याची सोय होती. त्यामुळे आम्हाला ते सोयीचं पडत होतं. कोण्या पाहुण्यांना हॉटेलमध्ये थांबवण्याची आमची आर्थिक परिस्थितीही नव्हती. आमच्या साहित्यिकांचा कट्टा हा भाऊसाहेबांच्या घरी सतत असायचा.
मी तर त्यांचा मानसपुत्र होतो. मला आठवत नाही की मी सिंधुताईकडे गेलो आणि काही न खाता परत आलो ! ते मातृहृदय त्यांच्या ठिकाणी त्यावेळेसही होते आणि आजही आहे. चिवडा असो, पोळी भाजी असो, शिरा असो. जे असेल ते. मला सिंधुताई जबरदस्तीने डायनिंग टेबलवर बसवायच्या. तू खूप काम करतोस. तुला जेवण करायला वेळ मिळत नाही. हे दोन घास पटकन खाऊन घे. हे दोन घास म्हणजे पूर्ण जेवण असायचं.
भाऊसाहेब – सिंधुताई तेव्हा अमरावतीला माजी राज्यपाल श्री रा.सू. गवई यांच्या संस्थेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापक होते. त्यांच्या नाव लौकिकामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा फार मोठा नावलौकिक होता. भाऊसाहेबांच्या नावावर कितीतरी पुस्तके आहेत. नुसतं पुस्तक छापून ते थांबले नाहीत तर त्यांनी आमच्यासारखे अनेक लेखक तयार केले. त्यांच्यातील लेखक वृत्तीला खतपाणी घातले. आणि त्यांना मोठे केले.
आज आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा सिंधुताईंना आणि भाऊसाहेबांना आमच्या जीवनातून वजा केले तर शून्य उरेल. कारण आमच्या जडणघडणीत त्यांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे. युगंधर, ललाम, पवन ही त्यांची मुले. आम्हीही त्यांची मुले केव्हा झालो हे आम्हाला कळलंच नाही. आज आम्ही सत्तरी गाठली तरी सिंधुताईनी आम्हाला आईची ममता दिली ती कायमची आमची शिदोरी झालेली आहे.
माझ्या अनेक मित्र मैत्रिणींना मी सिंधुताईंचा परिचय करून दिला. त्यांच्याकडे साहित्यिकांना नेण्याचं एक कारण होतं ते म्हणजे सिंधुताईं ह्या प्रत्येकाला वेळ देत. त्यांची चौकशी करत आणि त्यांना प्रोत्साहन देत. त्यामुळे अमरावतीमध्ये कोणीही नवीन लेखक आला तर आमचे पाय नकळत सिंधुताईच्या विजय कॉलनीमधील युगंधर घराकडे वळायचे.
सिंधुताईंचे सर्वात महत्त्वाचं काम मला असं वाटते की, त्यांनी त्या काळात गावोगावी वाचनालय काढण्याचा सपाटा लावला होता. आम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली वलगाव व नया अकोला येथे वसंत वाचनालयाची स्थापना केली. खेड्यापाड्यांमध्ये वाचनालय स्थापन करून ग्रंथालयाची चळवळ अमरावती जिल्ह्यामध्ये पसरवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. ग्रंथालय निर्मितीसाठी लोकांना प्रोत्साहित करणे, त्यांना आवश्यक ती सामग्री, पुस्तके पुरवणे, त्यांचे दस्तावेज तयार करणे ही सगळी कामे सिंधुताई आणि भाऊसाहेब करायचे.
आमची “साहित्य संगम” नावाची साहित्यिक लोकांची संस्था आहे. डॉ. मोतीलाल राठी हे या संस्थेचे अध्यक्ष होते. डॉ. मोतीलाल राठी म्हणजे अमरावती शहराचे भूषण. त्यांना साहित्यामध्ये प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी आमची सदैव पाठराखण केली. सुरुवातीला साहित्य संगमचे कार्यक्रम अमरावतीच्या मालटेकडीवर नाही तर नेहरू मैदानातील मनपाच्या गार्डनमध्ये व्हायचे. पण सिंधुताई मांडवकर व डॉ. मोतीलाल राठी आमच्या जीवनात आल्यामुळे आमचे कार्यक्रम त्यांच्याकडे व्हायला लागले.
सिंधुताईंनी एक मोठे काम अजून केले आहे, ते म्हणजे मराठी प्राध्यापक परिषदेची स्थापना. मराठी शिकवणाऱ्या अध्यापकांची एक संस्था असली पाहिजे ही त्यांची तळमळ. या तळमळीतून मराठी प्राध्यापक परिषदेची निर्मिती झाली. आज ही संस्था तीस वर्षाची झालेली आहे. अमरावती विद्यापीठातील मराठी विषय शिकवणारे जवळपास सर्व प्राध्यापक या संस्थेचे सदस्य आहेत .
सिंधूताईंनी जेव्हा मराठी प्राध्यापक परिषदेची स्थापना केली तेव्हा फारसा प्रतिसाद नव्हता. मी कार्यकारिणीत होतो. संस्था वगैरे काढणे प्राध्यापकांना एवढे रुचले नव्हते. पण आज नॅक आले आणि आम्ही मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठी प्राध्यापक परिषदेला चांगले दिवस आले.
आता नुकतेच मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशन दिग्रस येथे झालेआहे. मराठी शिकवणाऱ्या अध्यापकांनी वर्षातून एकदा तरी एकत्र यावे, विचार मंथन करावे, परस्पर परिचय करावा व यातून नवनिर्मितीला प्रोत्साहन द्यावे हा या निर्मितीमागचा उद्देश होता आणि तो बऱ्याच प्रमाणात आज सिद्धीला जात आहे.
डॉ. भाऊसाहेब मांडवकर म्हणजे बहु आयामी व्यक्तिमत्व. तेव्हाच्या विपरीत परिस्थितीत भाऊसाहेबांनी राजकारण, साहित्यकारण, विद्यापीठ, प्रकाशन संस्था, ग्रंथालय चळवळ ह्या बाबी सातत्याने राबविल्या. त्यामध्ये सन्माननीय सिंधुताई मांडवकर यांचा मोलाचा वाटा आहे. तेव्हा दळणवळणाची साधने नव्हती. फारशी आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि चळवळ करणाऱ्या प्राचार्यांकडे प्राध्यापकांकडून सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा समाजाचा कलही नव्हता. आज मात्र एखादा प्राध्यापक सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत असेल तर त्याला मान सन्मान प्राप्त होतो याला सिंधूताई कारणीभूत आहेत, याचा आम्हाला आनंद होतो.
पुढे सिंधुताईंनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे इंदिरा महाविद्यालयाची स्थापना केली. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी त्या काळात महाविद्यालय स्थापन करणे, महाविद्यालय चालवणे म्हणजे ही तारेवरची कसरत. पण सिंधुताईंनी समर्थपणे ती पेलली. आज इंदिरा महाविद्यालय अमरावती विद्यापीठातील एक नामवंत व क्रियाशील महाविद्यालय म्हणून नावलौकिकास आलेले आहे.
मला आठवते महाविद्यालयात तेव्हा टंकलेखन मशीन नव्हते. मी माझ्याकडचे टंकलेखन मशीन महाविद्यालयाकडे सोपविले. इंदिरा महाविद्यालयाच्या कार्यालयातील पहिले पत्र मी दिलेल्या टंकलेखन मशिनवर टंकलिखित झाले याचा मला अभिमान आहे.
आज सिंधुताई मांडवकर यांना साहित्यव्रती पुरस्कार प्रदान होत आहे. माझे विद्यार्थी, माजीमंत्री श्री प्रवीण पोटे यांनी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. प्रा.डॉ. शोभा रोकडे यांच्या पुढाकाराने त्यांनी स्वर्गीय सूर्यकांता देवी रामचंद्र पोटे साहित्य पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केलेली आहे. हे निश्चितच गौरवास्पद आहे. आपल्या भागातील मराठी लेखकांना गौरवले पाहिजे. त्यांचा मान सन्मान केला पाहिजे ही त्या मागची भूमिका स्वागतार्ह आहे. या निमित्ताने मी त्यांना धन्यवाद देतो.

– लेखन : प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी. अमरावती
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सिंधुताईंच्या कार्याचा नेटका आढावा
🌹अभिनंदन 🌹
काय बोलणार मी फार छोटा पडतो मनोगत व्यक्त करायला
धन्यवाद
अशोक साबळे
अंबरनाथ