Wednesday, September 17, 2025
Homeयशकथाहेमा राचमाळे : हे विश्वची माझे घर !

हेमा राचमाळे : हे विश्वची माझे घर !

अमेरिकेतील डेट्रॉईट येथील श्री. अविनाश आणि हेमा राचमाळे हे दाम्पत्य खरोखरच एक आदर्श आहे.

अविनाश राचमाळे यांनी अमेरिकेत आल्यावर १९९४ मध्ये इंजिनियरिंग कंस्ट्रक्शनच्या व्यवसायाला सुरवात केली आणि चांगलाच जम बसवला. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे अवॉर्डही मिळाले होते.

आपल्याला झालेल्या नफ्याचा उपयोग नवयुवकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व्हावा यासाठी अविनाश राचमाळे ज्या ‘Wayne State University of Detroit’ मधे शिकले, तेथील प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी व विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी त्यांनी पाच मिलियन डॉलरहून अधिक देणगी दिली आहे. ते आता या तिथे बोर्ड मेम्बरही आहेत.

हेमा राचमाळे सांगतात, “माहेरीं मी सर्वात मोठी मुलगी होते. त्यामुळे घर सांभाळणे, धाकट्या भावंडांना सांभाळणे ही कामे मला नेहेमीच करावी लागायची. आई वडील नोकरीसाठी बाहेरगावी असताना धाकट्या भावंडांची मी आईच व्हायची. यातून मातृत्वाची भावना आपोआपच माझ्या रुजत गेली.”

हेमा राचमाळे या मूळच्या लातूरच्या. त्यांनी अहमदपूर येथून बीएससी (केमिस्ट्री) ही पदवी मिळवली.पुढे औरंगाबादला कायदा व पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्या दाखल झाल्या. तिथे हेमाताई एस. बी. होस्टेलला रहात होत्या.
होस्टेलमधील अनेक मुलींच्या मानसिक आणि इतर समस्या त्यांनी पाहिल्या. काही मुली रडायच्या, काही तणावाखाली असायच्या. त्या सर्व मुलींना समजावयाच्या. खरं तर त्या स्वतःही लहानच होत्या. पण मुलींच्या अडचणीं पाहून मदतीसाठी धावून जायच्या. यामुळे एस. बी. होस्टेलचा “सोशल वर्कर ऑफ द इयर” हा किताब सलग तीन वर्षे त्यांना मिळाला.

पुढे वकिली करताना त्यांच्या लक्षात आले की या व्यवसायात खोटेनाटे बोलणाऱ्यांची काही कमी नाही. स्वतःचे खिसे भरण्यासाठी अशिलांची दिशाभूल करणारे वकीलही आहेत. घटस्फोटाच्या केसेस त्या हाताळत पण त्यात आनंद मिळत नव्हता. घटस्फोटितांना त्या समजवायच्या, त्यांनी विभक्त होऊ नये असे त्यांना वाटायचे. वकील होण्यापेक्षा आपण जज्ज व्हावे व सत्याच्या बाजूनेच असावे असे त्यांना वाटू लागले. वाटले.त्यांची जज्ज म्हणून निवडही झाली पण तेवढ्यात अविनाश राचमाळे यांनी अमेरिकेला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि जड अंतःकरणाने त्यांनी मायदेश सोडला.

अमेरिकेत आल्यावर हेमाताईंनी इन्व्हायरमेन्ट इंजिनीयरिंगमध्ये डिग्री घेतली आणि इन्व्हायरमेन्ट केमिस्ट म्हणून सहा वर्षे नोकरी केली.

हेमाताई अमेरिकेत येऊन रुजल्या खऱ्या पण मराठी माणसांच्या भेटीगाठींची आस त्यांना असायची. आपली भाषा आणि संस्कृती याशिवाय जीवन पूर्णत्वाने जगल्यासारखे वाटत नव्हते. म्हणून त्यांनी महाराष्ट्र मंडळ, डेट्रॉईटचे सभासदत्व घेतले. पुढे त्या मंडळाच्या कार्यकारिणीतही काम करू लागल्या. १९९१ पासून त्या मंडळाच्या सदस्य आहेत.

अमेरिकेत जाणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक कलाकार, तंत्रज्ञ, चित्रकार, संगीतकार, गायक मंडळींचे हेमाताई आपल्या भल्या मोठया वास्तूत सततच आदरातिथ्य करत असतात. डेट्रोईटमधे दोन दिवसांचा नाट्यमहोत्सव झाला तेव्हा महाराष्ट्रातील ३०-३५ कलाकार, तंत्रज्ञ मंडळींचा दोन्ही दिवस मुक्काम त्यांच्या घरीच होता.

नुकतीच ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची संपूर्ण टीम सुबोध भावेंसह अमेरिकेत १५ प्रयोग करण्याकरिता गेली होती. डेट्रॉईट येथे प्रयोग असताना या टीमचा मुक्काम हेमाताईंकडेच होता.

गेल्या १० वर्षांपासून हेमाताईंकडे सुरु असलेल्या
‘किड्स मुव्ही नाईट’ या कार्यक्रमांतर्गत ८ ते १८ वर्षांच्या मुलांचे गेट टुगेदर होत असते. तिथे त्यांना एखादा सुंदर चित्रपट दाखवणे, एकत्र खाद्यपदार्थ बनवणे, एखाद्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेणे अशा उपक्रमातून मुलांची जडणघडण केली जाते. हेमाताईंची मुले लहान असताना हे कार्यक्रम सुरु झाले तेव्हा सुमारे ८० मराठी मुले जमत असत. आता राचमाळे परिवाराची मुले मोठी होऊन व्यवसायासाठी घराबाहेर पडली असली तरी आजही सुमारे ४० मुलांसाठी हेमाताईंनी हा उपक्रम सुरूच ठेवला आहे.

समाज कार्याची मुळातच आवड असल्याने २००० साली हेमाताई मंडळाच्या अध्यक्ष झाल्या. २०१७ साली डेट्रॉईटजवळील ग्रँड रॅपिड्स या ठिकाणी अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांची शिखर समिती असलेल्या बीएमएमचे अधिवेशन झाले. त्यावेळी को-कन्व्हेनर म्हणून त्यांची निवड झाली. कालांतराने त्या बीएमएमच्या सुद्धा सदस्य झाल्या. २०१९ साली डॅलस येथे झालेल्या बीएमएम अधिवेशनाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीत त्यांनी काम केले. यंदा न्यू जर्सी येथे होत असलेल्या बीएमएमच्या अधिवेशनामधे सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आहेच. जगभरातून बीएमएमला संपर्क करण्यासाठी bmmonline.org ही वेबसाईट काम करीत आहे. अधिवेशनासंबंधी अद्ययावत माहिती या वेबसाईटवर ठेवलेली आहे. प्रत्येक टर्मसाठी या वेबसाईटची जबाबदारी एक्झिक्युटिव्ह कमिटीमधील कुणावर तरी सोपवली जाते. २०१७-२२ या टर्मसाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली असून त्या ती नेटाने पार पाडीत आहेत.

A national hero recognition by NCAIA and India Hub in Washington DC.

डॉ विद्या जोशी बीएमएमच्या अध्यक्ष झाल्यावर त्यांनी नॉर्थ अमेरिकेतील अनेक विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक यांना काही मदत लागली तर ती करावी म्हणून
बीएममच्या अध्यक्ष डॉ विद्या जोशी यांनी
‘दीपस्तंभ’ ही संस्था सुरू केली. त्यांनी स्वतःबरोबर मदतकार्याची आवड असणाऱ्या हेमाताईंनाही या कार्यात सामील करून घेतले.

‘दीपस्तंभ’ संस्था सुरु झाली आणि नेमके त्याच वेळी कोविडचे थैमान सुरु झाले. त्यामुळे या संस्थेचा मोठाच उपयोग झाला. काही मुलांचे आईवडील लॉकडाऊनमुळे अमेरिकेतच अडकून पडले होते. त्यांना औषधं लिहून द्यायला कुणी नव्हतं. अमेरिकेत मिळणारी औषधे त्यांना परवडत नव्हती. अशात काही डॉक्टर, स्वयंसेवकांनी ‘दीपस्तंभ’ च्या माध्यमातून भारतातून तिथे औषधे पाठवायची सोय करून दिली.

लॉकडाऊन मध्ये कधी विद्यार्थ्यांना धान्य पुरवावे लागे तर कधी ट्रान्सपोर्ट. दुर्दैवाने कधी एखादा विद्यार्थी कोविड व्यतिरिक्त कारणांनी दगावला तर त्याचे शव मायदेशी पाठविण्याचे आव्हान उभे रहायचे. ती प्रोसिजर किचकट असायची पण ‘दीपस्तंभ’ ने ते दिव्य पार पाडले.

ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, अडचणीत आलेले विद्यार्थी यांचा ‘दीपस्तंभ’ हा मोठाच आधार ठरला.
बीएमएम एक्झिक्युटिव्ह मेम्बर हेमा राचमाळे यांचे मदत कार्याबद्दल सर्वांनी आभार मानले.

या बरोबरच हेमाताईंनी वैयक्तिक पातळीवरही खूप कार्य केले. त्यांनी गरजूंना मास्क आणि सॅनिटायझर्सचा पुरवठा केला. तसेच विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ शिक्षण व प्रतिबंधक आरोग्य सेवेच्या शिक्षणाची सोय केली. ऑक्सिजनभावी अनेक मृत्यू होत होते. व्हेंटीलेटर्सची पण कमतरता जाणवत होती. मृत्यूचे प्रमाण वाढले होते. अशा वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या लोकांच्या मदतीला धावून गेल्या.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि व्हेंटीलेटर्स पुरवण्यासाठी देणग्या गोळा केल्या. जगभरातील उदार लोकांनी त्यांना देणग्या दिल्या. तसेच अडचणीत आलेल्या लोकांसाठी इमिग्रेशन आणि इमर्जन्सी व्हिसा मिळवून देण्याचे कामही त्यांनी दीड वर्ष केले. त्यांच्या मैत्रिणी त्यांना कौतुकाने ‘अमेरिकेच्या प्रति ९११’ म्हणू लागल्या !

युक्रेन मधून सुटका झालेले विद्यार्थी

युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरु झाले. या काळात युक्रेनमधे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत परतायचे होते. कॉन्सुलेटशी बोलून या विद्यार्थ्यांची सुटका करणे हे कामही हेमाताईंनी केले. कमिटीला देशविदेशातून फोन येत असत. काहींचे नातलग युक्रेनमधे होते. त्यांना अन्नपुरवठा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नव्हता. मानवतेच्या भावनेतून हेमाताईंनी त्यांना मदत केली. कोरोनाच्या काळात आणि आता युक्रेन युद्धात बीएमएमने केलेले सामाजिक कार्य जगाच्या निदर्शनास आले.

राचमाळे दाम्पत्याला तीन मुले आहेत. आपल्या तीनही मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिले. आकाश आणि आदर्श ही दोन मुले उद्योगपती झाली आहेत तर मुलगी रुची एम. डी. झाली आहे.

मी आणि माझे घर एव्हढेच स्वतःचे विश्व मर्यादित न ठेवता “हे विश्वची माझे घर” ही उक्ती सार्थ ठरविणाऱ्या हेमा राचमाळे यांचा आदर्श सर्वांनी ठेवला, त्या प्रमाणे कार्य केले तर हे जग सुखी होण्यास निश्चितच मदत होईल !

मेघना साने

– लेखन : मेघना साने.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +91 9869484800.

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. हेमाताई ,विद्याताई दोघींच्या कार्याला सलाम ,आणि त्यांच्या कार्याची ओळख करुन दिल्याबद्दल मेघनाताई तुमचे आभार

  2. हेमाताई राचमाळे यांच्यावर मेघनाताई साने यांनी लिहिलेला लेख अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इतक्या लांब जाऊन त्या एवढं सुंदर कार्य करीत आहेत, त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.
    विशेषतः दीपस्तंभच्या माध्यमातून त्यांनी आणि विद्याताई जोशी यांनी केलेलं काम अत्यंत मोलाचं आहे. तो काळ सर्वांचीच परीक्षा घेणारा होता. त्या काळात त्यांनी हे अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…!
    … प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा