Thursday, September 18, 2025
Homeलेखसंध्याछाया

संध्याछाया

समोर अस्ताला जाणारा सूर्य पाहून मनात कालवाकालव होते. आपल काहीतरी हिरावून घेतल्याची रूखरूख मनाला टोचू लागते. ते उधळणारे केशरी रंग, शेवटचे तर नसतील अशी अनामिक भिती डेकावते. आज आपल्या सोबत जे जे आहेत ते उद्या असतील का ? अशी मन चिरून जाणारी जाणीव वर येते. कोणास ठाऊक काय दडल असेल या मावळणाऱ्या प्रकाशात ? लोप पावणाऱ्या तेजात ? मन विदीर्ण करणारी भावना त्रास देऊ लागते. हुरहूर दाटून येते. काही केल्या ती जाणीव नाहीशी होत नाही.

मन नकळत तो संधीप्रकाश केविलवाण्या नजरेने पहात राहत. नक्की काय टोचतय तेच कळेनास होत.
संध्याछाया भिववू लागतात. उर धपापू लागतो. पण कळतच नाही हे अस का होत ? कुठल नकोस स्पंदन नाही ना मनाला स्पर्शुन गेल ? का ही तगमग ? फार फार विचित्र वाटू लागत. आपल मनच आपल वैरी होत तशातली गत. मन ना विनाकारण दुःख ओढवून घेत असत.

सारं सुखात चालू असल की, अस कस काय ? अशी आतून विचारणा होते. सारू म्हणता सारता येत नाही असे विचार. हळू हळू छाया गडद होऊ लागतात. सूर्याचं शेवटच दर्शन घडत आणि एका निमिषात सारी अवनी अंधाराच्या पांघरूणात गुडूप होते. हे कधी घडत ते ही कळत नाही. रेजचाच सारा खेळ पण रोज काहीतरी नवं घेऊन येणारा. रोज नवी जाणीव देणारा. माणसाचं माणूसपण टिकवून ठेवण्यासाठी हे घडत असाव का ? तुझ्यावर कोणाची तरी सत्ता आहे हे सांगण्यासाठीचा हा प्रपंच तर नव्हे ? आपली बुद्धी विचार सार थिटच पडत त्या अमर्याद, असीम सत्यापुढे. भितीची जागा आता असाहयता घेते. डोळे सलणाऱ्या जाणीवेने भरू लागतात. कारण मात्र कळत नाही.

समोर इवलीशी चंद्रकोर उगवते आणि थोडी उभारी मिळते. सारच काही संपल नाही अशी आशा मनात जागते. तारे लुकलूक करू लागतात आणि सर्रकन जाणीव होते आपल्या हातात काही नाही. जे आहे जसे आहे ते फक्त पहाणे. जमल्यास आनंद घेणे. आनंदही खरा नाही आणि होणार दुःखही ! एक स्थितप्रझ स्थिती येऊ लागते पण आपली ती ही पेलण्याची तयारी नसते.

इतका संवाद आपण आपल्या मनाशी करतोच कुठे ? सतत स्वतःला कशात तरी गुंतवत असतो. कशासाठी ? प्रश्न अनुत्तरीतच राहतो ! अस्वस्थतेची जाणीव थोडी कमी होते. आपण व्यवहारी जगात येऊ लागतो आणि चक्क गुणगुणू लागतो,

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया
आता मधुचे नाव कासया
लागले नेत्र हे पैलतिरी

एका मनाच्या अवस्थेतून दुसऱ्या किंचीत उत्फूल्ल भासणाऱ्या जाणीवेत आपण केव्हा शिरतो समजतच नाही. रोज चा खेळ, रोजचे विचारमंथन ! कधीतरी यातूनच विलक्षण काही सुचत असाव विलक्षण काही घडत असाव.
आपण मात्र गलितगात्र होण्यापासून ते काहीतरी विलक्षण गवसण्याच्या प्रक्रियेत हिंदोळत असतो. घुटमळत असतो.
कधी जीव घुसमटतो, कधी विलक्षण काही सापडत. वाट पहाण आपल्या हातात असत. शांत चित्तानं पहाण आपल्या हातात असत. येणाऱ्या जाणीवांच्या लाटात स्वतःला शोधत राहणं हे मात्र आपण करू शकतो.

काळोखाचीही सवय होऊ लागते. आपण सरावू लागतो आणि रात्रीच्या गर्भातून उमलणाऱ्या उषःकालाची कधी वाट पाहू लागतो कळतही नाही. कदाचित् कुणी अनामिक शक्ती आपल्या बरोबर हा सारा प्रवास अनुभवत असते. धीर देत असते. काटा स्थिर ठेवायचा ? आशेच्या पारड्यात महत्प्रयासान खेचून आणायचा की निराशेच्या गर्तेत खोल रूतत ते पारड जड करायच ? नक्की कोणती अवस्था स्विकारायची ? इथेच मग जाणीव आणि अनुभवांची सीमारेषा झुलू लागते. जीवघेणी रस्सीखेच होऊ लागते. पुन्हा एकदा अनंत पसाऱ्याची जाणीव होऊ लागते जी आपण टाळू पहातो. वाटत नकोच ते !

स्वतःच्या बाबतीत आपण कोणताही धोका पत्करायला तयार नसतो पण मनःपटलावर काहीतरी घडत मात्र असत. अगदी नको नकोस. नाकारता येत नाही आणि स्विकारताही.
यालाच जीवन म्हणत असावे. काही झाल तरी वाटताल करावी लागतेच. मग सुरू होते सुखाचा शोध जे खरतर जाणीवांच्या पलिकडे असत अगदी अज्ञात !

शिल्पा कुलकर्णी

– लेखन : शिल्पा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा