सिनियर सिटीझन क्लब, ठाणे नॉर्थ या संघाने
‘बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका’ या विषयावर एक निबंध स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक प्राप्त निबंध न्यूज स्टोरी च्या वाचकांसाठी देत आहे…
– संपादक
“बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका” हा विषय निवडून आयोजकांनी आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याच्या मुद्द्याला हात घातला आहे. या निमित्ताने अनेक अंगांनी या विषयावरील विचार पुढे येतील.
कुटुंबव्यवस्था बदलली आहे हे आपण सर्व जाणतोच. नोकरीमुळे म्हणा, घर लहान आहे म्हणून म्हणा, एकमेकांशी पटत नाही म्हणून म्हणा पण आता आई-वडील, सर्व भाऊ, सर्व अविवाहित बहिणी एकाच घरात रहाण्याचे दिवस आता नाहीत. निदान शहरांपुरते तरी. खरं म्हणजे दुसरं घर घेणं शहरात स्वस्त नाही, तरी माणसं वेगळी रहातात. अर्थात सर्वच घरे अशी नसतात. गुण्यागोविंदाने किंवा नाईलाजाने म्हणून एकत्र रहाणारी कुटुंबेही आहेत. तर अशा कुठल्याही प्रकारच्या कुटुंबांमध्ये ज्येष्ठांनी काय भूमिका घ्यावी ?
ज्येष्ठ म्हणजे वय वर्षे साठ ओलांडलेली व्यक्ती असे आपण म्हणतो. बरोबरच आहे ते. परंतु माझ्या मते, या ज्येष्ठपणात सुद्धा वयाचे वेगवेगळे टप्पे असतात. साधारण साठ ते पंच्याहत्तर हा एक टप्पा, पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हा दुसरा आणि पंच्याऐंशीच्या पुढे असा तिसरा टप्पा होय. या टप्प्यांना आपण अनुक्रमें तरुण ज्येष्ठ, मध्यम ज्येष्ठ आणि उत्तरज्येष्ठ म्हणूया. असे टप्पे करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या प्रत्येक टप्प्यात आपली मानसिकता बदलत जाते. अर्थात, वयानुरूप दिलेल्या या टप्प्यांच्या मर्यादा व्यक्तीनुसार थोड्या थोड्या मागे पुढे होतातच. या टप्प्यांच्या संदर्भात निबंधाच्या विषयाची चर्चा करायला हवी.
तरुण ज्येष्ठ हे नोकरीतून नुकतेच निवृत्त झालेले असतात. त्यांची शारीरिक अवस्था बऱ्यापैकी चांगली असते. म्हणजे अजूनही काही काम करण्याचा त्यांच्यात शारीरिक जोश असतो. बौद्धिक तर असतोच असतो. जरी त्यांना एखाद दोन वर्षे आधीपासूनच निवृत्तीचे वेध लागलेले असतात, तरी मानसिकदृष्ट्या पहायचं तर हा एक धक्काच असतो. कारण, निवृत्तीनंतर काय ? याचा विचार व आखणी जरी केलेली असली, तरी नोकरीत असलेलं रुटीन अचानक निवृत्तीच्या पहिल्या दिवसापासून पूर्ण बदलून जातं. ते कसं अंगावर घ्यायचं यात ते थोडे बावरून जातात.
पण हळुहळू सवय होऊ लागते. घरातलेही त्यांना सांभाळून घेऊ लागतात. आणि हीच ती वेळ आहे की त्यांनी सावध रहायला हवं. दिवसभर घरी रहाण्याची जशी त्यांना सवय नसते तशी घरातल्यांनाही ते दिवसभर घरात असण्याची सवय नसते. त्यामुळे त्यांच्या आणि घरातल्यांच्या काही गोष्टी, सवयी, आवडी परस्परांना खटकू लागतात. अशा वेळी, काळ, वेळ, प्रसंग ओळखून नमतं घ्यायचं की नाही, घ्यायचं तर किती घ्यायचं याचा तोल सांभाळणं हे फार फार महत्वाचं होऊन जातं. उत्तम उपाय म्हणजे मुलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यावं. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे, त्यांनी मागितल्याशिवाय सल्ला द्यायला जाऊ नये. आपली मुलं/सुना ही आपल्या निर्जीव मालमत्तेसारखी नाही (जशी की कार) की आपल्याला हवे तसे आपल्या हुकूमावर चालतील.
साधारणपणे पुरुषांपेक्षा स्त्रिया संसारात, घरात, मुलाबाळांत अधिक गुंतलेल्या असतात, अगदी नोकरी करत असताना सुद्धा. अशा वेळी त्यांच्या किंवा “ह्यांच्या” निवृत्तीनंतर सारं बदलतं. प्रवाशांनी भरलेली बस शेवटच्या स्टॉपवर पूर्ण रिकामी व्हावी तसं होऊन जातं. इतका सगळा वेळ हाताशी आहे त्याचं काय करायचं असं वाटू लागतं.
नोकरीत असताना करायच्या किंवा अजमावून पहायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी करण्याची ही सुवर्णसंधीच असते. “तरुण ज्येष्ठ” हा खरंच सुवर्णकाळ असतो आपला. जबाबदाऱ्या जवळपास संपलेल्या असतात. वेळ भरपूर असतो जो नोकरीत कसाबसा मिळतो. पैसेही बऱ्यापैकी साठवलेले असतात. तेव्हा, आपण आपल्या आवडीचा एखादा छंद असेल त्यात मन गुंतवावे हेच बरे. बरेच जण असं करतातही. किंवा नवरा-बायकोने मिळून एखादा आवडीचा छोटा व्यवसाय सुरु करावा.
काही छंद नसेल तर आपल्याला झेपेल अशा समाजकार्यात आपली शक्ती लावता येते. मुलांनाही बरं वाटतं की आपले आई वडील नुसतेच बसून नाहीत, तर काहीतरी, छोटंसं का होईना, पण मन रमेल असं काम करत आहेत.मुलं, सुना, नातवंडं घरात असतील तर छानच. पण बऱ्याच मध्यमवर्गीय घरांमधे मुलं परदेशी गेलेली असतात. कायमची ! किंवा देशातच दुसऱ्या शहरात गेलेली असतात. त्यामुळे घरात दोघेच असतात. ही उत्तम अवस्था आहे. मुलांवर असलेले आपले प्रेम दूर राहूनही पुरेसे व्यक्त करता येते याचा मी स्वतः अनुभव घेत आहे. अर्थात प्रत्यक्ष भेटी, सहभोजने साधारण दर दोन महिन्यात होत असतात. त्यानेच नाती अधिक घट्ट होतात / रहातात. झूम मिटिंग, गूगल मीट, व्हाटसप विडिओ कॉल, मोबाईल हाताळणी वगैरे गोष्टी आत्मसात करून घ्याव्यात. हल्लीच्या मुलांना या माध्यमातून संवाद साधणं आवडतं.
मध्यम ज्येष्ठ अवस्थेत तब्येतीच्या तक्रारी निर्माण होतात किंवा असलेल्या वाढू लागतात. आता वेगळीच आव्हाने उभी असतात आपल्यापुढे. आपला बराच वेळ स्वतःला आणि/किंवा जोडीदाराला जपण्यात जातो. परावलंबित्व वाढते. जर आधीच्या अवस्थेत आपण मुलांवर जास्त बंधनं लादली नसतील तर या अवस्थेत ती आपली काळजी घेण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे, आपला आपल्याला अंदाज घेऊन पुढे जावे लागते.
कधी कधी आपल्याला मुलांकडे रहायला जाऊन तिथे स्वतःला नव्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. कधी, आपल्याला एकटं तर एकटं पण आपल्या घरात, आपल्या सवयीनुसार जगणं आवडतं. तर कधी कधी वृद्धाश्रमात राहिलेले बरे असते. पण, एकंदरीत, अडजस्टमेन्ट ही आपल्यालाच अधिक करावी लागते.
आणि उत्तर ज्येष्ठ अवस्थेत तर आपण अधिकच परावलंबी होतो. अर्थात, परत एकदा, त्यालादेखील अनेक अपवाद आहेत. यात आपल्याला फारसा चॉईस उरत नाही. मुलं जे करतील, जसं करतील ते आणि तसं स्वीकारावं लागतं. मुलं चांगलं वागवणार नाहीतच असं मानणे सुद्धा चूक आहे. पण वृद्धाश्रमात कदाचित आपल्याला अधिक स्वातंत्र्य मिळतं.
कुणा कुणाचे संसार उशिरा फुललेले असतात. त्यांना मुलांची शिक्षणे, नोकऱ्या, लग्ने या जबाबदाऱ्या अजून पूर्ण करायच्या असतात. त्यांना मात्र विवंचनेतून पूर्ण सुटका नसते. किंबहुना ती थोडी वाढतेच कारण उत्पन्नाचं साधन बंद आणि मुलांच्या नोकरीच्या रूपाने अजून नवीन साधन निर्माण झालेलं नाही ही स्थिती चिंतेचीच असते. पण तरीही मुलांवर राग न काढता, त्यांच्या नोकरीच्या प्रयत्नांना होईल तितकी सावधपणे (हल्ली नोकरी देतो सांगून फसवणारे खूप असतात) मदत करणे जास्त विचारी भूमिका ठरेल.
पूर्वी घरात ज्येष्ठांचा खूपच जास्त सन्मान होत होता. मी म्हणेन की जरा अतिरेकच होता सन्मान देण्याचा. त्यांचा दरारा असे. अगदी टोळीच्या सरदारासारखा! अजूनही काही घरांमधून हे पहायला मिळते. त्यांच्या अनुभवाचाही खूप फायदा होत असे. पण आता अनुभवाची मातब्बरी जरा कमी झाली आहे. कारण तरुणांना सर्व काही मोबाईलवर माहित होते. पटापट बदलणारी परिस्थिती ज्येष्ठांपेक्षा तरुणांच्या अंगवळणी पडलेली आहे.
त्यामुळे एकंदरीतच, मुलांना समजून घेऊन अड्जस्ट करून राहण्यातच ज्येष्ठांचे श्रेष्ठत्व सामावले आहे असं वाटतं. त्याने आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती छान राहण्यास मदतच होते. आणि आपली कमीत कमी सेवा मुलांना करायला लागली तर त्यांचीही चिडचिड होत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, निवृत्तीनंतर आपली ही भूमिका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रेमाने समजावून सांगितली तर मुलांचीही भूमिका आपल्याला अनुकूल अशी होते. आणि विसंवाद, गैरसमज आणि त्यातून मनातल्या मनात साठत जाणारी कटुता या गोष्टी टळतील आणि आपलं व घरातल्यांचं मानसिक, शारीरिक आरोग्य छान राहील.
अर्थात हे सर्व विवेचन शहरी, मध्यमवर्गीय ज्येष्ठांसाठी आहे. ग्रामीण आणि इतर आर्थिक वर्गातील ज्येष्ठांच्या जीवनाविषयी मला नीटशी कल्पना नाही.
– लेखन : हेमंत साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००
लेख आवडला. ज्येष्ठांची वयपरत्वे केलेली वर्गवारी आणि टीसनच्या समस्या योग्य रीतीने मांडल्या आहेत आणि त्यांनी वेळ घालविण्यासाठी करावे लागणारे नियोजनही भावले.
लेख आवडला. सत्य परिस्थीती लिहीली आहे. पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. जेष्ठांना दिलेल्या सूचना पटण्यासारखा आहेत.
Very nice analysis of old age. Breaking it into three parts is engineering brain. Letting go and no more dominating is the main idea.
Good article
ठाण्यातील एका निबंधस्पर्धेतील पारितोषिक विजेत्या लेखातून हेमंत साने यांनी सध्याच्या समाजव्यवस्थेत विविध कुटुंबांतून ज्येष्ठ नागरिकांची भूमिका किती महत्वाची असते हे सविस्तरपणे सांगितली आहे.
छंद, समाजकार्यात मन लावणे अशा अनेक गोष्टींचा सहजपणे उहापोह केलेला हा लेख फार आवडला.
हेमंत सानेजी अभिनंदन