चंद्रशेखर आझाद – ३
काकोरी ऍक्शन प्लॅनच्या सर्व आरोपींचा अनन्वित छळ सुरू झाला. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, अश्फाकउल्ला खान यांना फाशीची सजा झाली. फाशीच्या आदल्या दिवशी अश्फाकउल्ला खानने भाच्यास पत्र लिहिले, “हिंदू प्रजेने कन्हैयालाल नि खुदिराम यांच्यासारखे आदरणीय वीर मातृभूमीस अर्पण केले, हे विसरू नकोस. कित्येक शतकांपासून या मातीने आपल्या पिढ्या पोसल्या आहेत. आता तिलाच ‘मादरेवतन’ (मायभूमी) समजणे योग्य! मुस्लीम प्रजेस गौरव प्रदान करण्याची संधी देणाऱ्या खुदाचा मी शुक्रगुजार (ऋणी) आहे. माझी शहादत (हौतात्म्य) दुख:द प्रसंग नव्हे तर गौरवप्रद प्रसंग समजून आनंदाने साजरी करा.”
फाशी जाणाऱ्या प्रत्येकाने फाशीच्या दोरास फासीका फंदा न समजता प्रेमहार समजून त्याचे चुंबन घेऊन गौरव केला. फाशीच्या तख्ताकडे जाताना रामप्रसाद बिस्मिल निर्भय स्वरात जेलरला म्हणाले, “मातृभूमीच्या सेवेसाठी आम्ही वारंवार जन्म घेऊ आणि तुमच्या क्षमतेची वाट लावू !” इतरांनीही जुलमी सरकारशी डोळा भिडवून आव्हान दिले, ‘आमच्या बांधवांच्या मातृप्रेमाची नि सरफरोशीची तमन्ना तुम्हास वारंवार विचारील किती काळ तुम्ही जुलूम करू शकाल ?’ प्रत्येकजण मातृभूमीची सेवा केल्याच्या समाधानात फाशी गेला.
काकोरी ऍक्शन प्लॅनच्या इतर अपराध्यांना काळ्या पाण्याची सजा झाली. ते अंदमानला रवाना झाले. दोन अपराध्यांना अटक झाली नाही. सरकारला आझाद सापडले नाहीत. वीरभद्र तिवारीस मच्छर समजून सरकारने दुर्लक्ष केले. वीरभद्रने सरकारला कटाची इत्थंभूत माहिती दिली असल्यानेच तो सुटला, अशी आझाद खात्री व्यक्त करत होते. आपल्या तार्किकतेवर त्यांचा होता दृढ विश्वास ! ते सतत म्हणत, ‘तो माफीचा साक्षीदार आहे. त्याला संपवला नाही तर तो अनेक समर्पित क्रांतीवीरांना संपविल !’ पण कुणाला ते पटले नाही. वीरभद्र पुळचट आहे, असे सर्वांचे म्हणणे पडले. त्यास संपवणे साऱ्यांनी अर्थहीन ठरवले. बहुमतासमक्ष आझाद झुकले. तरी नंतरच्या कोणत्याही ऍक्शन प्लॅनमध्ये त्याचा समावश केला नाही. योजना घडत असताना त्याची चाहूलही त्यांना खपत नसे. पुढे आझादांचे म्हणणे खरे ठरले.
वीरभद्र तिवारीच्या फितुरीमुळेच सरकारी अधिकारी आझादांपर्यंत पोहोचू शकले. वीरभद्रला न मारण्याचा आग्रह धरणारे मग खूप हळहळले. तरी आझादांच्या ‘आत्मसमर्पणानंतर’ हे रांडपण आल्यावर येणारे वांझ शहाणपण ठरले.
काकोरी ऍक्शन प्लॅननुसार सरकारी खजिना लुटून आझाद क्षणभरही काकोरीत रेंगाळले नाहीत. ते महाशय नाव धारण करून भरधाव धावत सुटले. झाशीपर्यंत त्यांनी ना विसावा घेतला की पळण्याचा वेग कमी केला ! शचिन बक्षी कधीपासून झाशीस होते. त्यांनी महाशयचा मास्टर रुद्रनारायण, वैशंपायन, माहोर तसेच सदाशिव मलकापुरकर यांच्याशी परिचय करून दिला. तिथली प्रजा मास्टर रुद्रनारायण यांचा समर्पित देशसेवक म्हणून प्रचंड आदर करत असे. त्यांनी ओरछा नजीकच्या हनुमान मंदिरात महाशयची व्यवस्था केली. मूळचा चंद्रशेखर तिवारी, मग चंद्रशेखर आझाद, क्वीक सिल्व्हर, नंतर महाशय आणि हनुमान मंदिरात वास्तव्य करताना हरिशंकर ब्रह्मचारी परिचय पावला !
त्याकाळी सुसंस्कृत खानदानी रईस, साधू-संतांना आदराने घरी नेत. त्यांना पोसणे, पुण्याचे काम समजत! तसे ठाकूर मलखानसिंग यांनी हरिशंकर ब्रह्मचारीस घरी नेले. ठाकूरवाड्याच्या व्हरांड्यात या साधू महाराजांचा (?) मुक्काम असे. झोपण्यासाठी त्यांना खुली गच्ची आवडे. कोंबडा आरवताच ते उठत. हजार दंड, पाचशे बैठका काढत. मग मुद्गल जोडी घेऊन महेनत केल्यावर ठाकूरवाड्यातील तरुणाईस व्यायामाचे प्रशिक्षण देत. झाशीच्या निवडक सक्षम तरुणाईस ते नजीकच्या जंगलात तिरंदाजी शिकवत. कुमारवयात भिल्लांकडून ते तिरंदाजी शिकले होते. गंमतीखातर केलेले कामही जीव ओतून करण्याची त्यांना सवय ! त्यामुळे त्यांनी तिरंदाजीत प्रावीण्य मिळवले. सर्व कार्यात त्यांना समविचारी साधू (?) मदत करत. साधू सहकाऱ्यासह झाशीहून ओरछास परतत असताना, त्यांना दोन पोलिसांनी हटकले, “तुम आझाद हो क्या ?”
“हा बिरादर ! हम आझादही है !” आझाद आपल्या सोबत्याकडे पाहून शांतपणे म्हणाले, “साधू आझादही होगा! उसपर बंधन कौन डालेगा ? और डालेगा तो साधू अपनी आझादी छोडेगा क्या ? हम तो अपनी मर्जीसे जीनेवाले हनुमानजीके आझाद सेवक है !”
छोट्या प्रश्नाचे लंबेचौडे उत्तर ऐकून पोलीस वैतागला. त्याने दुसऱ्या साधूस दमात घेतले. त्याने आझादांची री ओढली. तरी त्याने दोघांना गोऱ्या साहेबास भेटल्याविना मंदिरात जाता येणार नाही, अशी जरब दिली. दोघांना ठाण्यावर नेण्याची तो जबरदस्ती करू लागला. हरिशंकर ब्रह्मचारीने (?) डोळे वटारले.
“तुम्हारी किटकिटकी वजहसे हमे हनुमानजीको चोला चढानेमे देर हो रही है. तुम मानो गोरे दारोगा-फारोगाका हुक्म! तुम्हारे दारोगासे हमारे हनुमानजी काफी बडे है. हमपर उन्हीका हुक्म चलता है. याद रख्खो, हम तो आझाद रहनेवाले आझाद है !” पोलीसांची प्रतिक्रिया न बघता, सोबत्याचा हात धरून ते तरातरा चालू लागले !
झाशीच्या तरुणाईस प्रशिक्षित करण्यात मस्त असताना त्यांच्यावर गुलाबी आक्रमण झाले. ठाकूरवाड्यात सतत पाहुण्यांचा राबता! एकदा एक तरुण विधवा पाहूणी आली. तिला आझाद आवडले. त्यांच्यासंगे संसार मांडण्याची तीव्र इच्छा झाली.
एका रात्री घरातील पुरुषमंडळीस एका समारंभास जायचे होते. ते गेल्यावर आझाद गच्चीवर झोपायला गेले. तरुण विधवेची इच्छा आकाशास भिडली. ती एका छोट्या पोरीसह गच्चीवर गेली. त्या मुलीस तिने आपण गच्चीत झोपणार असल्याचे सांगितले. आपण गच्चीत गेलो की गच्चीचे दार बंद करून खाली जाण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे गच्चीस कडी लावून मुलगी निघून गेली.
आझाद पलंगावर गाढ झोपेले होते. हळूच पलंगावर बसून ती त्यांना जागे करण्यास प्रेमराग आळवू लागली. आझादांनी तिला आपण बाल ब्रह्मचारी असल्याचे वारंवार सांगितले तरी ती बधली नाही. प्रेम भावनेने झपाटलेल्या तिने मग स्त्रीत्वाचे भांडवल करत अश्रुंचे शस्त्र उगारले. तरी आझादांवर परिणाम न झाल्याने ती संतापली. गच्चीचे दार बंद असल्याचे सांगितले. वर प्रतिसाद न दिल्यास बोंबाबोंब करून त्यांना बदनाम ती करू शकेल, अशी जरब दिली. आझाद धमक्यांना भीक घालणारे नव्हते. त्यांनी तिला अधिक लघळपणा संधीच दिली नाही. तिला उमज पडण्यापूर्वी, त्यांनी गच्चीचे टोक गाठून झटक्यात उडी टाकली. लगेच ते हनुमान मंदिरात गेले. परतलेल्या ठाकूर मलखानसिंगास यांना हकिकत कळली. ते साधू हरिशंकरजींची (?) माफी मागायला हनुमान मंदिरात गेले. साधुमहाराजांपाशी त्यांनी खूप काकुळत केली.
आझाद क्षमाशील ! त्यांनी ना ठाकुरांना दोष दिला की तरुण विधवेस! चितेवर जाण्याचा प्रसंग नजरेच्या टप्प्यात आलेला विधूर लग्न करू शकतो नि तरुण विधवेवर समाज एकाकीपण लादतो, हे गैर आहे, असे ते म्हणाले. ती पाहूणी गेली की ठाकूरवाडीत परतण्याचे आश्वासनही दिले.
झाशी सोडल्यावरही एकदा त्यांच्यावर स्त्रियांनी आक्रमण केले. त्यांचे स्त्रियांकडे दुर्लक्ष करणे, स्त्रियांना आवडत नसे. म्हणून एकदा काही स्त्रिया अचानक त्यांच्यावर धावून गेल्या. त्यांनी दुर्लक्ष केल्याने अधिक चवताळून त्यांनी आझादांची बंदूक हिसकावून घेऊन त्यांना खूप बदडले. आझाद स्त्रियांवर हात उचलत नसत. म्हणून मार खातानाही सतर्क राहिले. चातुर्याने स्त्रियांचे कडे भेदून त्यांनी पळ काढला.
ओरछाच्या तरुणांच्या मनात त्यांनी देशप्रेमाचे बीज पेरले. तरुणाईच्या मनात स्वातंत्र्याची आस निर्माण केली. आता ते काम पुढे नेतील या खात्रीनिशी त्यांनी ओरछा सोडले. साधूच्या भूमिकेत संघटनेचे भरीव काम करणे अवघड होत असल्यानेही ते ओरछाबाहेर पडले. हनुमान मंदिराशी ज्या कुटीत काही काळ त्यांचे वास्तव्य होते, ती कुटी तिथल्या प्रजेने प्रेमाने जतन केली आहे. सरकारने यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला नाही. तरी ही प्रेमळ प्रजा त्या कुटीस राष्ट्रीय स्मारकाचा मान देते. तिथे आझादांचे तैलचित्र आहे. त्यास रोज पुष्पहार अर्पण करून नि उदबत्ती प्रज्वलित करून जनता आझादांच्या देशभक्तीस मानाचा मुजरा करते.
ओरछाचा निरोप घेऊन निघालेले आझाद, मास्टर रुद्र नारायण यांचा भाऊ बनले. ब्रह्मचारी शब्द दूर करून त्यांनी फक्त हरिशंकर नाव धारण केले. हरिशंकर ड्रायव्हर मेकॅनिकचे काम करत असे. सदरबाजार, बुंदेलखंड आणि झाशी या परिसरात ते मोटार चालवणे आणि दुरुस्त करण्याची कामे करत. तिथे रामानंद नावाचा वाहनचालक त्यांचा सहकारी होता. तो काल-परवापर्यंत बऱ्याच क्रांतीवीरांच्या आठवणी आत्मीयतेने सांगत असे. फणींद्र घोष फितूर झाल्यावर त्याने जाहीर केलेल्या क्रांतीवीरांच्या यादीत या रामानंदचे नाव अग्रभागी होते. गोरे अधिकारी भूमिगत आझादांना अटक करण्यासाठी रामानंदला तगडे अमीष दाखवून खूप हिंडले. त्या काळात बरेचदा आझाद नि पोलीस आमने सामने आले. पण पोलिसांसोबत असलेल्या रामानंदच्या देहबोलीतही चलबिचल झाली नाही. बऱ्याच दिवसांनी गोऱ्यांनी हा प्रयत्न थांबवला.
एक मोटार दुरुस्त करताना फार प्रयत्न केले तरी गाडी चालू होईना. (सन १९२७) आझाद बलवान! त्यांनी जबरदस्त जोर लावला. गाडी सुरू झाली पण या अघोरी कृत्यात त्यांच्या मनगटाची हाडे मोडली. हात अपार सुजला. अशा अवस्थेत मालकाने हरिशंकरला इस्पितळात भरती केले. डॉक्टर ऑपरेशन करावे लागेल, असे म्हणाले. ऑपरेशनवेळी भूल देतात, हे जाणून असल्याने आझाद ऑपरेशन नाकारू लागले.
पण ऑपरेशनला पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी निक्षून सांगितले. भूल दिल्यावर भलती माहिती ओठी येण्याची शक्यता होती. आझादांना ती नकोशी वाटली. ते भूल न देता ऑपरेशन करण्यास तयार झाले. भूल न देता ऑपरेशन करणे अशक्य असल्याने साऱ्यांनी त्यांना घट्ट धरून ठेवल्यावर डॉक्टरांनी जबरदस्तीने क्लोरोफॉर्म दिला. खरोखर आझाद बेहोशीत सत्य बरळले. पण डॉक्टर आणि इस्पितळाचे कर्मचारी समंजस ! त्यांनी समस्या निर्माण केली नाहीच, उलट आझाद शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांनी आत्मीयतेने समस्त कर्मचारीवर्गाची भावना ओठी आणली, “सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी हमी देतो. हात लवकर बरा होऊन या हाताने खूप पराक्रम करावा, यासाठी आम्ही शक्यतेच्या पलिकडील जाऊन प्रयत्न करण्यास तयार आहोत ! साहसी देशभक्तांचा सांभाळ करणे, सर्व नागरिकाचे कर्तव्य आणि त्याहीपेक्षा आनंद असायला हवा !” डॉक्टर आणि इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांनी या ‘हरिशंकर’ ची खूप काळजी घेतली.
आझाद झाशीपासून लाहोरपर्यंत क्रांतीवीरांच्या कड्या जोडत साखळी तयार करत होते. माहोर आणि वैशंपायन झाशीस येताच, झाशीचा परिसर त्यांच्या सुपूर्द करून आझाद ग्वाल्हेरला गेले. आग्रा तसेच आसपासच्या गावात वेगाने जनजागृती करत ते पुढे जात होते. या भटकंतीत ते वारंवार पोलीसांसमोर आले. सरकार दरबारी त्यांची तस्वीर नव्हती. ते कसे दिसतात, ते कुणास ठाऊक नव्हते. तरी कुणी संशय व्यक्त केलाच तर पोलीसांना गुंगारा देण्यात ते माहिर होते. पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी एकदा वापरलेली युक्ती पुन्हा वापरत नसत. म्हणून पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत.
– लेखन : स्मिता भागवत. कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००
खूप खूप आभार.
वाह स्मिताताई…! तुम्ही चंद्रशेखर आझाद यांचं प्रत्यक्ष चित्र , चरित्र आणि चारित्र्य डोळ्यांसमोर उभं केलंत…!
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007