वर्धा जिल्ह्यासह सेवाग्रामची ओळख ही देशातच नव्हे तर विदेशातही भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची राजधानी अशीच आहे.
सेवाग्रामची पायाभरणी बापू ३० एप्रिल १९३६ वर्धा येथून पायदळ सेवाग्रामला मुक्कामी गेले, त्या क्षणापासून झाली. ८६ वर्षांपूर्वीचा हा क्षण सेवाग्रामला नवीन ओळख देणारा ठरला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा दिवस महत्त्वाचा असून या दिवसाच्या अमृतक्षणाची ओळख पुसट होऊ न देण्याचे आव्हान आहे.
गांधीयुगाच्या तबकातील भारतमातेच्या पूजेकरीता सदैव तत्पर राहिलेल्या हजारो व्यक्ती सेवाग्रामच्या संस्कारातून घडल्या.
देहनिष्ठा ही देशनिष्ठेला समर्पित करणारे गांधीविचारक बापूंचा सेवाग्रामला पायदळ जाण्याचा क्षण आठवत कोठलाही गाजावाजा न करता, वर्ध्यातून सेवाग्रामला जायचे. बापूकुटीसमोर क्षणभर उभे राहून बापूंचा आठव करायचे. त्यांना कॅमेऱ्यातून उधळलेला लख्ख प्रकाश अंगावर घेण्याची संवयच नव्हती.
जमनालालजी बजाज यांच्या आग्रहामुळे गांधीजी पहिल्यांदा २३ सप्टेबर १९३३ रोजी रेल्वेने वर्ध्याला आले. बापू आल्यानंतर काही दिवस सेवाग्राम मार्गावरील महिला आश्रमात थांबले.
बजाजवाडी, मगनवाडीत त्यांचा काही दिवस मुक्काम होता. त्यावेळी सेगाव (आताचे सेवाग्राम) येथे एका साध्या कुटीत ब्रिटीश अॅडमिरलची मुलगी मिस स्लेड उपाख्य मिराबेन राहात होत्या. त्या बापूंनी दिलेल्या ग्रामसेवेच्या व्रताचे पालन एका साध्या कुटीत राहून करीत. बापूंनीही त्यांच्या पुढील मुक्कामाकरीता सेगाव निवडले.
३० एप्रिल १९३६ ला पहाटे, बापू वर्ध्यापासून ८ किलोमीटर अंतरावरील सेगावकडे पायदळ जायला निघाले. त्यावेळी ६७ वर्षांच्या बापूंसोबत जमनालालजी बजाज आणि बलवंतसिंह होते. सेगावला पोहोचल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांसोबत चर्चा करीत सेगावला मुक्कामी येण्याचा उद्देश सांगितला. नंतर ५ मार्च १९४० ला बापूंनी `सेगाव` चे नामकरण `सेवाग्राम` केले.
बापू मुक्कामी आल्यानंतर बापूंच्या सूचनेनुसार स्थानिक साधनांच्या वापरातून ५०० रुपयांच्या आत खर्च करीत त्यांच्या निवासाकरीता आदीनिवास उभारले गेले. आदिनिवासातील एका कोपऱ्यात बापू, एका कोपऱ्यात बा, एका कोपऱ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर एका कोपऱ्यात सरहद्द गांधी अब्दुल गफ्फारखान राहायचे.
पुढे भेटणार्यांची संख्या वाढल्याने बापूंनी मिराबेनच्या कुटीत मुक्काम हलविला. तिचे पुढे नामकरण बापूकुटी झाले. सेवाग्राम आश्रमातील कुटीतून बापू स्वातंत्र्यलढ्याचे नियोजन करीत. संवादाच्या मर्यादित साधनातही देशाच्या कानाकोपऱ्यात सेवाग्रामातून निघालेला बापूंचा संदेश जायचा. १९४० चा वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव वर्ध्यातच मंजूर झाला. १५ आणि १६ जानेवारी १९४२ ला भारतीय काँग्रेसची बैठक इथेच झाली. यात भारत छोडो प्रस्तावाचे समर्थन करण्यात आले. यानंतर ६ ते १४ जुलै १९४२ पर्यंत काँग्रेस वर्किंग कमिटीची सभा वर्ध्यात झाली. त्यातली ८, ९, १० जुलैची सभा सेवाग्राम आश्रमात झाली. त्यावेळी बापूंसह काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलम आझाद, पं.जवाहरलाल नेहरू, डॉ.राजेंद्र प्रसाद, सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फारखान, आचार्य कृपलानी, गोविंदवल्लभ पंत, सरोजिनी नायडू, पट्टाभी सितारामय्या आदी उपस्थित होते. १४ जुलै १९४२ ला बजाजवाडीत ७०० शब्दांचा भारत छोडोचा ठराव मंजूर झाला.
बापूंच्या सेवाग्राम येथील मुक्कामातच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नियोजन झाले. पण त्याची पायाभरणी ३० एप्रिल १९३६ ला बापूंच्या सेवाग्रामला मुक्कामी जाण्याच्या क्षणाने झाली होती. बापू सेवाग्राममधून २५ ऑगस्ट १९४६ ला दिल्लीकरीता गेले. त्यांना पुन्हा २ फेब्रूवारी १९४८ ला सेवाग्रामला यायचे होते पण ते परत येऊच शकले नाही.
सेवाग्राम आश्रमात बापू असताना नेताजी सुभाषचंद्र बोस, पं.जवाहरलाल नेहरू, डॉ.राजेंद्रप्रसाद, खान अब्दुल गफ्फारखान, आचार्य कृपलानी, यांच्यासह देशातीलच नव्हे तर विदेशातील नेते येत, बापूंसोबत बापूकुटीत बसून चर्चा करीत. पण बापूंच्या दिनचर्येला सांभाळून तसेच आश्रमव्रतांना पाळून त्यांना या स्वातंत्र्यलढ्याच्या राजधानीत वावरावे लागायचे.
गांधीजी वर्धा शहर आणि सेवाग्रामात एकूण २६८८ दिवस राहिले. त्यातील १९१६ दिवस त्यांचा मुक्काम सेवाग्रामला होता. विविध कामांनी बापू वर्ध्याला यायचे, पण पायदळ ! त्यावेळी जमनालालजी त्यांना घोडागाडीने जा म्हणायचे, पण बापू पायदळच वर्ध्याला
यायचे. काँग्रेसच्या बैठकीला ते खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहात.
असे हे सेवाग्राम !

– लेखन : प्रकाश कथले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००
🌹खूपच छान माहिती दिली आपण या लेखातून. 🌹अभिनंदन सर आपले
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
वर्धा जिल्ह्य़ातील सेवाग्रामची माहीती दिली असा उल्लेख करावायचा राहिला.क्षमस्व.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची राजधानी अशी ज्याची ओळख आहे ,त्या वर्ध्याच्या अनेक महत्त्वपूर्ण आठवणींना उजाळा प्रकाश कथले यांनी घेतला आहे.हार्दिक अभिनंदन.
वर्धा, शहरा नजिकच्या “सेवाग्राम,” बाबत मा.प्रकाश कथले साहेबांनी संक्षिप्त स्वरुपात खूप छान माहिती,दिली. प्रकाश कथले साहेबांचा,वर्धा जिल्ह्यातील, ज्येष्ठ, अतिशय अभ्यासू आणि निर्भिड पत्रकार म्हणून लौकिक आहे.
कृषि विभागात असताना 2005-07या कालावधीत मी वर्धा जिल्ह्यात,अधीक्षक कृषि अधिकारी,म्हणून काम केले,त्या कालावधीत सेवाग्राम येथे अनेकदा जायचा योग आला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची, कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, तत्कालीन कृषि मंत्री शरद पवार,इत्यादी अनेक केंद्रीय मंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यातील,काही गावांना भेट देवून,प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा केली होती.या सगळ्या नेते मंडळींनी दुपारचे अगदी साधे जेवण आणि विश्रांती सेवाग्राम मध्ये घेतली,होती,हे मला लख्ख आठवते,
या भेटीच्या वेळी,मी शरद पवार साहेबांचा,संपर्क अधिकारी होतो,ही भेट शेती प्रश्र्ना संदर्भात असल्याने,पवार साहेबांनी माझ्याकडून,या जिल्ह्यातली पीक पद्धती , प्रमुख पिकांची उत्पादकता आणि दर हेक्टरी निव्वळ उत्पन्नाची,माहिती माझ्याकडून घेतली होती,
या प्रसंगी डॉ,मनमोहन सिंग साहेबांनी मला दुपारच्या जेवणानंतर,”टूथ पिक” मागितली होती, ती दिल्यानंतर,आवर्जून त्यांनी Thank you म्हटल्याचेही आठवते,,