“काय वसंतराव ! आहात का घरात ?
कोण श्रीकांतराव ? अरे या या ! आज कसे काय अचानक ?
“अहो काही नाही याबाजूला एका कामासाठी आलो होतो, म्हटल डोकावून जाऊया “.
बर झाल आलात ! बरेच दिवसात चहा आणि गप्पा नाही झाल्या आपल्या. अग जरा चहा टाक ग !“
हा संवाद अर्थातच काही वर्षांपूर्वीचा आहे. पण किती सहज आहे ना ? काहीही आधीपासून जमवून आणलेल नाही. जे काही आहे ते अगदी सहज जुळून आलेलं.
काही वर्षांपूर्वी काहीही न कळवता अचानक कोणाच्याही घरी डोकवायची पद्धत होती आणि त्याने यजमानांच्या कपाळालाही आठी चढत नसे. आलेल्या माणसाच नीट स्वागत होत असे. आता असा संवाद आणि सहज जाण येणही फार दूरापास्त झालय.
नक्की काय झालय माहित नाही पण आपली मानसिकता आजकाल फार झपाट्याने बदलतेय. हे एक फक्त उदाहरण आहे. पण सर्वच गोष्टीतली सहजता आपण हरवत चाललो आहोत असे वाटते. यावर पाश्चात्य परिणाम म्हणावा तर काही अंशी पाश्चात्य जीवनशैलीचा पगडा कारणीभूत असावा अस वाटत.
इतकी वर्षे अमेरिकेत काढल्यावर इथे कसे सर्व कार्यक्रम अगदी आखिव रेखिव, घोटून घोटून सराव केलेले असे असतात. मग त्यातले विनोद, हसण सारच कस कृत्रीम वाटू लागत. तसच काहीस आपल जीवन होत चाललय. जेवढी साधनं आपल्या दिमतीला वाढत आहेत तेवढेच आपण मनातल्या संवादापासून, अकृत्रीम आयुष्यापासून दूर जातोय.
हल्ली सहज काही कारण नसताना एकमेकांकडे जाण म्हणजे, असं कसं जायचं ? फोन करून विचारू तरी, ‘आहात का’ ? त्यांची वेळ घेऊन मगच जाऊ. असे विचार डोकावतात. हे घरच्या बाहेरच्या सर्वच माणसांच्या बाबतीत होऊ लागलं तर उद्या एखादा आगंतूक पाहूणा दारात आला तर आपली तारांबळच उडेल. असही कोणी येऊ शकतं याची आपली सवयच जाईल कदाचित्. अचानक कोणाकडे जाण हे असंस्कृतपणाचं लक्षणही काही जणांना वाटत.
प्रत्येकानी आपल आयुष्य दैनंदिनीच्या पानांवर एवढ भरून टाकलय की अचानक जमलेला गप्पांचा फड, रंगलेली संगीतमय मैफल या साऱ्याला जीवनाच्या पानांमधे जागाच राहिलेली नाही. अशा वेळी पु.ल नी रंगवलेली “वाऱ्यावरची वरात” मधली रविवारची सकाळ आठवते. लेखकाची प्रतिभा आजुबाजूची वैशिष्ठ्ये लिखाणात उतरवत असते. समाजजीवनाचा आरसा त्यात पहायला मिळतो.
आजकाल मात्र कमालीची कृत्रीमता प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यात डोकावते. आपण एखाद्या ठिकाणी जातो, तिथे जवळच आपल्या ओळखीचं कोणी रहात असत पण आपली सहज म्हणून त्यांच्याकडे जायची तयारी नसते. एक अर्धा पाऊण तास अचानक एखाद्याकडे जाण्याने त्यांच्या किंवा आपल्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे ? पण आपल्याला फाटे फोडण्याची नवी सवय लागते आहे.
मग मेसेजच करू, पुन्हा कधी जमवू, अस अचानक नको नीट ठरवून भेटू एकदा … वगैरे वगैरे ! पण या साऱ्यात एखाद्याला भेटण्याची ओढही आपण मारत असतो आणि अचानक भेटल्यावर होणारा त्याचा आनंदही.
आजकाल लोक स्वतःतच गुरफटलेले असतात पण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि माणसाने माणसाला भेटले पाहीजे, बोलले पाहीजे हा विचारच नामशेष होत चालला आहे. काहींना तो पटतो पण बोलण्याची हिंमत नसते. जगरहाटी दुसरं काय ?
असे म्हणून सारे गप्पच बसतात पण अशाने सार काही ठरवून, रितसरच करायच हा नवा पायंडा पडतो.
अचानक जर कोणी घरी आल तर काय बोलायच हा देखील कित्येकांना प्रश्न पडतो. याच कारण अमुक व्यक्ती आल्यावर काय बोलायच, कोणते विषय हाताळायचे याचा अभ्यास झालेला नसतो. पूर्वी म्हणत असत थोड जास्त कराव, अचानक कोणी आल तर खोटी नको.
आजकाल स्वयंपाक करताना उरायला नको, अन्न वाय जाते असे अनेक फाटे निघतात. ते चूकही नाहीच पण हीच जनता बाहेर मागवलेल्या अन्नापैकी अर्धे अधिक वाया घालवत असतात. त्याचे सोयरसुतक नसते.
आणखी एक भावना दृढ होत चालली आहे ती म्हणजे ‘आमचे आम्ही‘. चार जणांचे कुटूंब असेल तर आमचे आम्ही मजा करू. त्यात आणखी कोणाला सहभागी करून घ्यायचच नाही. असा विचार असतो. अशानी काका, मामा, मावशी ही नाती फक्त कागदावरच राहतील काही वर्षानी. आओ जाओ घर तुम्हारा इतकं अघळपघळ नसल तरी हम दो हमारे दो इतक सिमितही नसाव. अस सुचवावस वाटत.
एकाने कृत्रीम वागायला सुरवात केली किंवा त्या वागण्याच बोचण कमी झाल की मग ही कृत्रिमता आपल अख्ख जग व्यापून टाकायला कमी करणार नाही. आपलं वागण आपण स्वतःच पारखू शकतो किंवा पारखाव. बूंद बूंद से सागर या उक्तीप्रमाणे एकाने सुरवात केली किंवा होऊ घातलेल्या पायंड्याचा विरोध केला तरी पुष्कळ फरक पडेल. शंका कुशंकांनी आपल मन व्यापून घेण्यापेक्षा जे आहे जसे आहे ते घडाघडा बोलावे, मनात आले तर करावे. मला खात्री आहे अजुनही समाजात काही मंडळी तरी अशी आहेत ज्यांना सहजता हवी आहे. अकृत्रिमपणे आपले विचार व्यक्त करण्याची संधी हवी आहे.
प्रत्येकाने अंतर्मनाला स्मरून आपले वागणे ठेवले तर नक्कीच सकारात्मक परिणाम पहावयास मिळतील.
साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी हा विचार मनात प्रत्येकाने करण गरजेच आहे. आज फक्त एकमेकांकडे येण्याजण्याबाबतीत असणारी कृत्रिमता, उद्या महास्वरूप घेऊ शकते हे कुठेतरी रुजलं जाण आवश्यक आहे. सोशल मिडीआवर मित्र मैत्रीणी गोळा करण्यात चूक काहीच नाही पण त्याचवेळेला खऱ्या जीवलगांच्या बाबतीत काय घडतय हे त्यांच्या पोस्टवरून वा हस्तेपरहस्ते कळण्याची वेळ स्वतःवर येऊ नये याची खबरदारी आपण सर्वांनीच घेऊया. सहजता जपूया.

– लेखन : शिल्पा कुलकर्णी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ +91 9869484800
खूप चांगला, विचार करायला लावणारा लेख! 👌👌खरेच आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे👍👍
प्रती शिल्पा कुलकर्णी
एकदम सहमत आहे लेखाशी , बाहेर राहिल्यानंतर तर भारतातील झालेला फरक खुप जाणवतो . सर्व दुःखाचे कारण पैसा आहे . हल्ली कोणाला काही सांगण्याची सोय नाही . मस्त लेख आहे .
खुप छान विचार मांडला, खरचं गरजेचा आहे.
माणूस हा सनमाजप्रिय आहे.माणसाने माणसाला भेटले पाहिजे,बोलले पाहिजे हा विचारच नामशेष होत चालला आहे.
आमचे आम्ही ही संस्कृती वाढत चालली आहे.
शिल्पा कुळकर्णींंनी मांडलेलंंहे मत पटतं.पण आजकाल असे झाले आहे खरे!