Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यक्रांतीवीरांच्या कथा ( ५ )

क्रांतीवीरांच्या कथा ( ५ )

चंद्रशेखर आझाद : ४
काशीस बैजनाथ मोहल्ल्यातील कोळशाच्या वखारीत असताना पोलीसांना ते या मोहल्ल्यात असल्याची खबर मिळाली. लगेच पूर्ण मोहल्ल्यास पोलिसांचा वेढा पडला. तरी त्यांच्या चतुर साथीदारांनी त्वरीत ही खबर त्यांना कळवली. लगेच आझाद कोळशाच्या कोथळ्यात शिरले. वखारीच्या मालकिणीने तत्परतेने त्यांच्यावर कोळसे ओतून कोथळा शिवण घालून बंद केला. थोड्या वेळाने पोलीस आले. पोलीसांनी प्रत्येक कोथळ्याची शिवण उकलून आत कोळसेच असल्याचे तपासले. वखारीतील सर्व कोथळ्यांचे परीक्षण संपण्यास वेळ लागला. सारा वेळ आझाद तपस्व्याप्रमाणे कोथळ्यात बसून प्राणायाम करत होते. पोलीस मोहल्ल्याच्या बाहेर पडल्याची खात्री पटताच मालकिणीने आझादांच्या कोथळ्याची शिवण उकलली. कोथळ्याबाहेर आलेले आझाद इतके भयाण दिसत होते की त्यांचे मित्रही त्यांना ओळखू शकले नसते ! अंगावरील कोळशी झटकून त्यांनी भरलेला कोथळा डोक्यावर घेतला. वखारीत कामकरणाऱ्या मजुरागत ते सहज वखारीबाहेर पडले.

सतत वेगाने पळणारे आझाद फार वजनदार ! कानपूरला रामचंद्र मुत्सद्दी यांच्याकडे त्यांचे ‘आग्रावाले सेठ’ नावाने वास्तव्य होते. रामचंद्र मुत्सद्दी सर्व प्रकारच्या देशभक्तांना मदत करत. त्यांच्याकडे अहिंसा आलदोलानात भाग घेणारे, साम्यवादी आणि क्रांतीकारी, सर्वांचा राबता असे. एकदा अत्यंत थकलेले आझाद आराम करत होते. तेव्हा अहिंसा आंदोलक प्रभातफेरी संपवून आले. त्यांना जागा करून देण्यास आझाद सावरून बसले. पण थकव्यामुळे त्यांना सावरण्यास जरा वेळ लागला. लगेच अपरिचित आंदोलक म्हणाले, “क्या भाईसाब दोंद फुलाए बैठे हो ? हमारी पदयात्रामे शामील हो जाओ. एक महिनेमें चरबी छट जाएगी !” आझाद शांत स्वरात म्हणाले “हम है बालबच्चेवाले ! हमे देशकी नही, अपने परीवारकी फिकर हैं !” लगेच देहास आराम लाभेल असे ते ऐसपैस पसरले.

आझादांचे जाडेपण त्यांच्या मित्रात चेष्टेचा विषय ठरे. एकदा मित्र म्हणाला, “भैय्या आप सचमुच बहुत मोटे हैं. आपकी फासीके लिये सरकारको मजबूत रस्सी – नही रस्सा बनाना पडेगा !” ते हसत उत्तरले, “फासीका फंदा आपको मुबारक ! हम आझाद हैं, आझादही रहेंगे. रस्सी हो या रस्सा, हमे उससे लेना-देना नही !”
अनेकदा प्रयत्न करूनही गाधीजींनी त्यांना भेटण्यास नकार दिला. पण मोतीलाल नेहरू, पंडित मदनमोहन मालवीय, पुरुषोत्तमदास टंडन, श्रीप्रकाश वगैरे आझाद तसेच इतर क्रांतीकारी देशभक्तांचा आदर करत. भेट घडली तर क्षेमकुशल विचारून चर्चा करत. जमल्यास आर्थिक मदतही ! जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्रात आझादांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख आहे. “प्रथमदर्शनी ते अत्यंत सामान्य व्यक्ती वाटले. पण समाजवादाच्या संदर्भात त्यांनी मांडलेला तर्क आणि गांभीर्याने केलेला विचार अनोखा असल्याचे कबूल करावे लागेल.”

आझादांचे ब्रह्मचर्य साथीदारांच्या आदराचा विषय ! तरी अनौपचारिक गप्पात जिवलग मित्र चेष्टेने लग्नाचा विषय काढत. एकदा गंमतीत तरी गंभीर स्वरात आझाद उत्तरले, “असलमे सचमुच मुझे शादी करनी थी. पर मैं जैसी बिवी चाहता था, वैसी मिलीही नही !” साऱ्यांनी आझादांना कशी पत्नी हवी, ते विचारत कालवा केला. कुणी तशी स्त्री शोधण्याची हमी दिली. गालात हसत आझाद म्हणाले, “मैं ऐसी महेबुबा चाहता हुं, जो एक कांधेपे रायफल और दुसरे पर कारतुसोकी बोरी लादकर पहाडोमे घुमती हो. वैसी औरत सिर्फ फ्रंटियर मेल हो सकती हैं. इसलिये मैने मेरी पिस्तोलसेही शादी कर ली. अब येही मेरी चिरसंगिनी हैं. मेरे अंततक वही मेरा साथ निभाएगी !” खरोखर त्यांच्या चिरसंगीनीने शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना साथ दिली.

आझादांना पकडण्यास सरकार शर्थीचा प्रयत्न करत होते. काँग्रेसचे काही पुढारी त्यांना ओळखतात, अशी खात्री असल्याने गोरे अधिकारी आझादांना पकडण्यात त्यांची मदत घेण्यास फार प्रयत्न केले. पण समंजस नेत्यांनी ताकास तूर लागू दिला नाही. गोरे अधिकारी फार खनपटीस बसले तेव्हा मवाळ स्वरात ते म्हणाले, “त्यांची विचारसरणी अहिंसा नि असहकार आंदोलनास पोषक नाही. आमच्यात टोकाचे तात्विक मतभेद झाल्याने त्यांनी फार पूर्वी आमच्यापासून फारकत घेतली. तेव्हापासून आमची त्यांची भेट नाही. आम्ही त्यांच्या भानगडीत पडत नाही ! त्यांच्यात काडीचा रस नसला तर आम्ही त्यांच्या संपर्कात का राहू ?” असे विचारून त्यांनी सरकारची बोलती बंद केली. सरकारने काँग्रेस नेत्यांचा पिच्छा सोडला.

आझादांच्या नावाने सरकारी पकडवॉरंट होते. तरी ते निर्भयपणे सर्वत्र फिरत. प्रसंगी त्यांच्या काळजीत हैराण झालेले साथीदार वैतागत. “भैया सरकारने तुमपर सिर्फ वॉरंटही नही निकाला. तुम्हारी खोज करनेवाले के लिये तगडा इनाम रख्खा हैं. और आप हैं की दिनके उजालेमे सरे बाजारमे घुमा करते हो !” याचा आझादांवर परिणाम होत नसे. ते सहकाऱ्यांना एक शेर ऐकवत, “जबसे सुना हैं की मरनेका नामही जिंदगी हैं, सरको कफन बांधे हम अपने कातीलको ढुंढते हैं.” मरणाचे नाव जिंदगी असल्याचे समजताच स्वत:च्या खुन्याचा शोध घेण्यास निघालेल्या आझादांना भगतसिंग खूपदा रागवत असे. वस्तुत: आझाद दोनच वर्षांनी भगतसिंगहून मोठे ! तरी त्यांचे भगतसिंगवर पुत्रवत प्रेम ! त्याच्या कुटुंबियांने देशासाठी केलेल्या समर्पणाचा ते आदर करत. तरी त्यांच्यात एकमेकांची चेष्टा चालू असे.

सँडर्सच्या हत्येवेळी लाहोर पोलीसठाण्याचे निरीक्षण करायला निघाले असताना रस्त्यात कन्याशाळेची बस थांबली. आझाद भगतसिंगच्या कानात गुणगुणले, “बसमें हमारे रणजीतसे शादी करे ऐसी कोई देखू क्या ?” लगेच भगतसिंग म्हणाला, “भैया मेरी शादी आपने फासीके फंदेसे तय की हैं ! अब मैं कैसे मुकर जाऊ ?”
तरी भगतसिंगला फाशी जाहीर झाली ते त्यांना सहन झाले नाही. ते उद्गारले,  “होय. मीच त्याची शादी ठरवली. त्याचीच नव्हे तर सर्व क्रांतीवीरांची ! हे जिगरी दोस्त एकदम शादी करतील, या योजनेस मी मंजुरीही दिली. पण आता माझ्या डोळ्यांना या शादीची बारात बघणे नाही सहन होणार ! माझे डोळे आधीच मिटावेत !” तसेच घडले ! हे तिघे फाशी जाण्यापूर्वी वीरभद्र तिवारीच्या फितुरीमुळे गोरे आझादांपर्यंत पोहोचले.

पोलिसांशी झालेल्या खुंखार सामन्यात बंदुकीत एक गोळी शिल्लक उरेतो त्यांनी पोलिसांना काव आणला. शेवटची गोळी स्वमस्तकात उतरवून या खेळीयाने आझाद नाव सार्थ करत देशासाठी समर्पण केले.
आझादांचे साहस, शौर्य आणि संघटनशक्ती अनोखी ! त्यांच्या शब्द-स्वरातील गारुड त्यांच्या समर्पित देशप्रेमाचे फलित ! क्रांतीवीर आझाद म्हणतील ते करण्यास सदैव तत्पर असत. म्हणूनच त्यांच्या अनुस्थितीत हिंदुस्तान सोश्यालीस्ट रिपब्लिकन आर्मी (HSRA) वा हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र सेनेचे (हिसप्रसचे) कमांडर इन चीफ म्हणून त्यांची एकमताने निवड झाली. लगेच ती अंमलात आली.

त्यांचे समर्पित काम, बुद्धी आणि वेगाने साधक-बाधक विचार करून तत्काळ निर्णय अंमलात आणण्याचे कौशल्य, साऱ्यांचा साकल्याने विचार करून आदराने त्यांना पार्टीचे प्रमुखपद दिले. शिरावर पक्षाची जबाबदारी आल्यावर मात्र वाटेल ते साहस बिनधास्त करणारे आझाद, थोडे नरमले. अर्थात थोडेच ! मूळ पिंड धाडसी ! खुर्चीत बसून योजना घडवणे त्यांना आवडणार नव्हते. वाटेल ते साहस झटक्यात करण्याचा पूर्वीचा बिनधास्तपणा कमी केला तरी सावध सतर्कतेने ते साहस करतच असत.

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी कशी टाळता येईल, हा ज्वलंत प्रश्न होता. वारंवार विनंती करूनही गांधीजी, आझाद वा कोणाही क्रांतीवीरास भेटण्यास होकार देत नव्हते. ब्रिटीश सरकारने त्यांना गांधी-इर्विन कराराची बोलणी करण्यास बोलावले होते. तेव्हा या संदर्भात गांधी व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांची समजूत पटवण्यास तयार झाल्यास तर या मौल्यवान तरुणांचा जीव वाचवणे जमण्याची शक्यता होती. म्हणून १९३१ च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते सीतापुर जेलमध्ये काकोरी योजनेतील राजकैदी गणेश शंकर विद्यार्थी यांच्या भेटीस गेले. गणेशजींनी अलाहाबादेस पंडित नेहरूंना भेटण्याचा सल्ला दिला. नेहरू गांधींना पटवू शकले तर काम होईल, असा गणेशजींना विश्वास वाटला.

सत्तावीस तारखेच्या सकाळी आझाद नेहरूंना भेटले. नेहरूंना न पटलेले मुद्दे आझादांनी कौशल्याने पटवले. फाशी जाणारे तरुण निखळ देशभक्त असल्याचे नि सतत देशहितासाठी झटत असल्याने या तिघांचे जीवन देशासाठी बहुमोल असणे नेहरूंनी मान्य केले. महात्माजींना हे पटवण्याचा प्रयत्न करण्याची हमीही दिली. क्रांतीवीरांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे कळताच त्यांनी १२०० रुपये दिले. एकूण भेट समाधानकारक झाली.

अलाहाबादचे काम संपवून उलट पावली परतणे त्यांना योग्य वाटले नाही. त्यांनी सुखदेव राज निरालास भेटण्यास सकाळी दहाच्या सुमारास आल्फ्रेड पार्कमध्ये बोलावले होते. म्हणून नेहरूंना भेटून त्यांनी आल्फ्रेड पार्ककडे मोहरा वळवला. आझादांचे कान नि डोळे सतर्क होते. थॉर्नहिल रोडवर मेयर कॉलेजपाशी त्यांना वीरभद्र तिवारी टिवल्या-बावल्या करताना दिसला. वीरभद्र माफीचा साक्षीदार बनल्याची त्यांना खात्री होती. त्याची टहेल निरुद्देश नसेल, या विचाराने त्यांना सावध केले.

श्री. योगेश चटर्जी In search of Freedom या पुस्तकात आझादांचा अंत नमूद करताना लिहिले आहे, ‘वीरभद्र तिवारी जुना क्रांतीवीर असल्याने त्यास काकोरी कटात सामील केले होते. त्याच्या विरोधात सरकारकडे पुरावा होता. तरी ना त्यास अटक झाली की शिक्षा! म्हणून आझादांना तो माफीचा साक्षीदार असल्याची खात्री वाटत असे. अस्तनीतील निखारा वेळीच विझवला नाही तर तो सारे बेचिराख करतो, असे म्हणत आझादांनी पार्टीच्या प्रणालीनुसार वीरभद्रला संपवण्याचा विचार मांडला होता. पण साऱ्यांना ते पटले नाही. लोकाग्रहास्तव आझादांनी त्यास मोकळा सोडला. पण त्याच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही; तरी पार्टी प्रमुखास शोधण्यात तो शत्रूस मदत करील, असे खुद्द त्यांनाही वाटले नसावे. त्याला मेयर कॉलेजपाशी पाहून आझादांच्या मनात संशयाचा किडा वळवळला तरी….’

स्मिता भागवत

– लेखन : स्मिता भागवत. कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा